चारोळ्या बिरोळ्या-३२-पाऊस

चारोळ्या बिरोळ्या-३२
■■ पाऊस ■■
मेघराजाच्या प्रेमाला
येते जेव्हा भरती
हिरवीगार सजते
अखंडित ही धरती

पावसाचे अन धरतीचे
घट्ट किती नाते
धुव्वाधार बरसे तो
ती धरी हृदयाते

पाऊस तो बरसणारा
कधी बेधुंद कधी शांत
कधी लहर वाऱ्याची
कधी उत्साह सर्वांगात

आर्त झालेल्या धरेला
सांगा कोणी शांत केले
कुणी पाऊस म्हणे त्याला
कुणी जीवन नाव दिले

काल एक थेंब
पडला धरणीवर
शहारली धरती अन
डोळे लागले अंबरावर

किती युगांचा ऋणानुबंध
झाला ना कधी कमी
येता हा 'सात' जून
त्याची बरसण्याची हमी

तिने पाहिले स्वप्न वेडे
त्याच्या लवकर येण्याचे
त्यानेही मग ठरवले
तिला थोडे छळायचे

काल उन्हाळा गेला
कुणी महिमा न गाईला
चाहूल नुसती पावसाची
कसा मनात राहिला

आर्ततेच्या उरातूनच
फुटतात धुमारे प्रीतीचे
म्हणूनच होते गाणे
धरती अन पावसाचे

का कधी तो राहिला
अन डोळ्यांतून वाहिला
मनीचा भाव वेडा
पावसापरी साहिला

न बोलता तिला कळाली
त्याच्या प्रेमाची भाषा
मृदगंध पसरला चहूकडे
सांगत धरतीची मनीषा

नाही सतावणे, नाही बतावते
ती तर चाल प्रेमाची
नाही समजणार कुणा कधी ही
प्रीत धरती पावसाची

नको अलंकार नको दागिने
काही ओले थेंब दे
नको विरह, नको दुरावे
पर्जन्याचे देणे दे

तप्त जळाली तुझ्या आठवणीत
तिला जलाचे दान दे
बळीराजाने तुज नभी शोधिले
जगण्याचे त्यास साधन दे

वीज बिचारी उगाच तळपे
धरती-पावसाच्या मिलनाने
ढगांचे ढोल वाजत सुटले
सहन ते न झाल्याने

विजेने मग राग काढला
झाडावर कधी माणसांवर
नाही बघितले पडताना
जातो कोण सरणांवर
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...