माझ्या आजोबांची सही

माझ्या आजोबांची सही
◆◆◆
त्या दिवशी ग्रामपंचायतीचे जुने दप्तर व्यवस्थित बांधून ठेवतांना एक जुने रजिस्टर सहज बघितले. त्यावर सभेत उपस्थित लोकांच्या सह्या होत्या. "वामन पाटीलबा" हे नाव व त्यापुढील त्यांची सही बघून खूप छान वाटले. ती माझ्या आजोबांची सही. ग्रामपंचायतीच्या कुठल्या मिटींगला हजर असतानाची ती सही. ती सही बघितली आणि जुने दिवस माझ्या नजरेसमोर तरळले.
मला माझा शाळा प्रवेशाचा दिवस आठवला. मी त्यावेळी सहा वर्षाच्या आसपास असेल. माझे नाव शाळेत दाखल करण्यासाठी माझे आजोबा मला त्यादिवशी शाळेत घेऊन गेले होते. एका लाकडी टेबलापलीकडे लाकडी खुर्चीवर कोळगे गुरुजी बसलेले होते. टेबलाच्या समोर उजव्या बाजूला माझे आजोबा बसले होते. त्यांच्या शेजारी एका पत्र्याच्या पेटीवर मी बसलो होतो.समोरच वर्गातली लहानमोठी मुले त्यांच्या अभ्यासात, कुजबुजणाऱ्या गप्पात मग्न होती. मनात भीती होती,कुतूहल होते. कारण हा एका वेगळ्या जगात प्रवेश होता.
एखाद्या मुलाचे वय शाळा प्रवेशास योग्य झाले की नाही याची एक पद्धत कोळगे गुरुजीकडे होती. ती म्हणजे विद्यार्थ्यांचा हात डोक्यावरून त्याच्या दुसऱ्या बाजूच्या कानाला लागला की, तो पहिलीच्या वर्गास पात्र. माझाही हात गुरुजींनी कानाला लावून बघितला. तो दुसऱ्या बाजूच्या कानाला लागला आणि माझा पहिलीत प्रवेश निश्चित झाला. बाकी माहिती सांगून आजोबा मला शाळेत गुरुजींच्या हवाली करून निघून गेले. गुरुजींनी मला तिथे पहिलीच्या रांगेत बसवले. थोडा वेळ मी तिथे बसलो असेल, त्यानंतर मात्र मला हे सगळे विचित्रच वाटायला लागले. एखाद्या बंदिस्त जागेत कोंबून ठेवल्याप्रमाणे. खेळण्यात, हुंदडण्यात मजा वाटणाऱ्या मला ही शाळा म्हणजे एखादा पिंजरा वाटायला लागला. कुतूहल म्हणून एखाद्या ठिकाणी डोकावयाला जावे आणि खोल गड्ड्यात पडावे असे मला वाटू लागले. माझी चुळबूळ वाढली. परंतु पळून जाणे शक्य नव्हते. कोळगे गुरुजी कडक शिस्तीचे होते, हे शाळेत असणाऱ्या नसणाऱ्या पोरांसोबत सगळ्या गावाला माहीत होते. सुट्टी होईपर्यंत कसाबसा तो दिवस मी काढला. मात्र खरी गंमत दुसऱ्या दिवशी झाली.
'मला अजिबात शाळेत जायचे नाही' असा आक्रमक पवित्रा मी दुसऱ्या दिवशी घेतला. शाळेपेक्षा बाहेरचे जग मला खूपच सुखद वाटत होते. त्यात कुठले बंधन नव्हते. खेळण्याला मर्यादा नव्हत्या. लिहिण्या वाचण्याचा धाक नव्हता. सगळे आकाश खुले होते. असे असताना त्या चार भिंतीच्या गोंगाटात आणि वरून गुरुजींची भीती या सगळ्यांसोबत राहण्याची माझी अजिबात तयारी नव्हती. सकाळपासून मी रडून, आक्रंदून घरी बराच कहर केलेला होता. आणि आईच्या हातचा प्रसादही खाल्ला होता. काहीही करून मला शाळेत जायचे नव्हते.
कसे कोण जाणे पण थोड्याच वेळात शाळेतली एक टीम माझ्या घरी धडकली. ती चार जणांची टीम होती. आणि त्या टीममध्ये वरच्या वर्गातली चांगली धडधाकट मुले होती. त्यांना आधीच ऑर्डर दिलेली असावी. आल्या आल्या त्यांनी कुठलीही बातचीत न करता दोघा जणांनी माझे दोन पाय व दोघांनी माझे दोन हात पकडून मला उचलले. एखादी झोळी चौघांनी उचलावी तसे ते शाळेच्या दिशेने मला घेऊन निघाले. मी रडत होतो, गडबडा लोळण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु त्यांनी मला गच्च पकडून शाळेत आणले. शाळेत आणले तरीही मी शांत झालेलो नव्हतो, उलट माझा आक्रोश अजूनच वाढला होता. मी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु गुरुजींनी शाळेचा दरवाजा लावून घेतला. मी असहाय्य होऊन ओरडत होतो. वर्गातील सगळी मुले माझ्याकडे बघत असावी; कारण त्या गोष्टीकडे बघायलाही मला वेळ नव्हता. काहीही करून मला तिथून निसटायचे होते. शेवटी कोळगे गुरुजी माझ्याजवळ आले. मी प्रचंड भेदरून गेलो होतो. त्यांच्या हातात एक लाकडी रूळ होता. माझी भीतीने पाचावर धारण बसली. ते माझ्यावर जोराने खेकसले. "तू जर पळून गेला तर तुला कोलदांडाच घालीन..." यासारख्या दोन चार वाक्यानंतर मी भीतीने शांत झालो. त्यानंतरच्या काही दिवसानंतर मी शाळेत रमायला लागलो. मला शाळा आवडायला लागली. शाळेतही माझी प्रगती व्हायला लागली. त्यानंतर मी कधी शाळा बुडवली नाही. आणि शाळेने मला बुडवले नाही. मला तारले.
ज्या शाळेत माझ्या आजोबांनी त्यांचे बोट धरून मला दाखल केले. ज्या गावात माझे बालपण गेले. ज्या गावात मी वाढलो. त्याच गावच्या ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक म्हणून काम करण्याची संधी गेल्या दीड- दोन वर्षांपासून मला मिळाली. आज आजोबांची सही बघितली आणि सगळा चित्रपट नजरेसमोरून गेला. आजोबांची आठवण आली.
आज कोळगे गुरुजी कधीकधी माझ्याकडे ग्रामपंचायत ऑफिसला येतात. माझ्यासोबत गप्पा मारतात.बऱ्याचवेळा फोनही करतात. आपला विदयार्थी असल्याचा त्यांचा अभिमान मला त्यांच्या डोळ्यांत दिसतो. आणि मला वेगळीच अनुभूती येते.

- राजेश खाकरे (३० ऑगस्ट २०२०)

पोळा

पोळा हा कृतज्ञतेचा सण आहे. जो बैल रात्रंदिवस आपल्या शेतात राबतो. आपल्याला शेती करण्यासाठी मदत करतो. शेतीची मशागत करतो. माल वाहतूकीला मदत करतो. त्याला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करण्याचा दिवस म्हणजे पोळा. त्याने आपल्यासाठी केलेल्या कष्टाची जाणीव आपल्याला आहे, हे त्याला सांगण्यासाठी त्याच्यासाठीचा वर्षातला एक दिवस त्याला प्रेमाने अंघोळ घालायची. ज्या खांद्यावर तो आपल्या जबाबदारीचे जू ओढतो त्यावर उबदार स्पर्शाने खांदेमळणी करायची. त्याला नवीन घागरमाळ (घुंगराची माळ), रंगीबेरंगी गोंडे लावायचे, त्याची शिंगे हेंगूळाने रंगवायची. त्याच्या अंगावर वेगवेगळी नक्षी काढायची. त्याला विविध आकाराची फुगे लावायचे. वाजतगाजत त्याची मिरवणूक काढायची. प्रेमाने ओवाळणी करून त्याला पुरणपोळी, धान्य खाऊ घालायचे. हा सगळा उत्सव अगदी आनंदाने करायचा. हा केवळ शेतकऱ्यांचा उत्सव नाही तर माणूस म्हणून मानवतेला वेगळ्या उंचीवर नेणारा उत्सव आहे. तुझ्या उपकाराची मला जाणीव आहे, हे बैलाच्या डोळ्यांत बघून त्याला मूकपणे सांगणे म्हणजे पोळा.
- © राजेश खाकरे
१८ ऑगस्ट २०२० पोळा

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...