घरकूल

◆◆◆
गेल्या 8 महिन्यापासून तो ग्रामपंचायत ऑफिस मध्ये येऊन चौकशी करतो आहे, त्याला घरकूल मंजूर होते की नाही म्हणून

त्याच्या घराच्या पोपडे आलेल्या मातीच्या भिंती कोणत्याही क्षणी कोसळतील,
त्याच्या घराचे छत पावसाळ्यात तग धरत नाही, आणि घरात साचते तळेच- तळे
तिकडच्याच कुठल्याशा ओल्यासुक्या कोपऱ्यात काढते रात्र त्याचे अख्खे कुटुंब
मी बघितले आहे, त्याच्या घराच्या सारवलेल्या भिंती घुशीने पोखरलेल्या आहेत. आणि कोपऱ्या- कोपऱ्यात मातीचे ढीग साचलेत

त्याच्या दोन एकर शेतीत दहा पंधरा हजारांचे उत्पन्न निघते वर्षाला कसेबसे
म्हणून तो जातो मोलमजुरीने त्याच्या बायकोसोबत.

एके दिवशी बायकोसोबत मोलमजुरीला जातांनी मला भेटला तो त्याच्या नेहमीच्या रस्त्यावर
म्हणाला "साहेब, आपल्या घरकुलावर लक्ष ठेवा बरं.. खूपच गरज आहे आम्हांला, तुम्ही एकदा येऊन बघा ना आमचे सध्याचे घर"

मी एके दिवशी वेळ काढून गेलो तो राहतो तिथल्या शेतावरच्या घरी.
तो दाखवत राहिला त्याच्या गरिबीची लक्तरे,
मधून मधून गाळत राहिला आसवे.

मी बघितले आणि माझे मलाच वाईट वाटले.
तुम्हांला लवकरच घरकूल मिळण्यासाठी प्रयत्न करू असे सांगून आलो त्याला.
पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या घरकुलाच्या यादीत त्याचे नाव 44 नंबरला आहे, निदान अजून 4 वर्ष तरी लागतील त्याला घरकूल यायला
काल तो लगबगीने आला माझ्याकडे.
"साहेब मी ऐकलं की, आणखी 300 घरकुलं मजूर झाले म्हणून?"
"हो झालीत की"
"कोणा-कोणाला मिळणार आहेत?"
"महाराष्ट्रातल्या 300 आमदारांना घरकूल मिळणार आहेत."
" म्हणजे साहेब, ते माझ्यापेक्षाही गरीब आहेत?"

मी काहीच बोललो नाही. 'मी शासकीय कर्मचारी आहे. शासकीय कर्मचाऱ्याने शासन धोरणाविरुद्ध बोलायचे नसते!' मी मनातल्या मनात म्हणालो.
© राजेश खाकरे
२६ मार्च २०२२

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...