लव्ह यु कविते, लव्ह यु जिंदगी

लव्ह यु कविते..लव्ह यु जिंदगी..!
●●●
आज एका मित्राने सहज विचारलं, "एवढ्या व्यापात कविता कशी सुचते?"
मी नुसतं स्मितहास्य केलं.
खरं तर कविता सुचायला व्यापच लागतो. मनात एक अस्वस्थता निर्माण व्हावी लागते. उन्हाच्या काहिलीसारखी तगमग झाली की कविता बाहेर येते. चरख्यात ऊस पिळवटून निघाल्यावर रस बाहेर यावा, तसे कळत नकळत मन पिळून, पोळून निघाले की कविता अवतरते. बोलतांना, सांगतांना शब्दांना मर्यादा येतात. आपली भावना समोरच्याला सांगतांना ती त्यांच्यापर्यंत हवी तशी पोहचतेच असे नाही. किंबहूना बरेच बोलूनही मनात खूप काही मागेच राहून जाते. शब्द फाफटपसारा निर्माण करतात. कवितेचे तसे नसते. ती बाहेर येते तीच परिपूर्ण होऊन. अगदी कमी शब्दांत खूप काही पोहचवते समोरच्यापर्यंत. कविता अनेक पैलूंनी पोहचते सगळ्यांपर्यंत. कविता भावनेत ओथंबून निघते. तिला कायदे कानून समजत नाही. कवितेला युक्तिवाद समजत नाही, तिला मनाचा सच्चेपणा समजतो. भावनेचा ओलावा समजतो. म्हणून कविता वाचल्यावर काही क्षण माणूस शांत होतो. स्वतः च्या आत डोकावतो. त्याला एक तृप्ततेची अनुभूती येते.
कविता शब्दांची ओळ नसते. ती एक अभिव्यक्ती असते. कवितेला जन्म देऊन कवी मातृत्व प्राप्तीची अनुभूती घेत असतो. ती अनुभूती अवर्णनीय असते. कारण कविता जन्मण्यापूर्वी कवीने प्रसववेदना सहन केलेल्या असतात. त्या कराव्याच लागतात. त्याशिवाय मजाच नाही. कवितेचे सीझर करता येत नाही. तिला प्रसवूच द्यावी लागते नैसर्गिकपणे; त्याशिवाय कवित्वच नाही.
कुणी चांगले म्हणेल म्हणून आई मुलाला जन्म देत नाही, तिला आनंद वाटतो म्हणून ती मुलाला जन्म देते. कवितेचेही तसेच, कविता कुणाला आवडेल म्हणून कवी कविता लिहीत नाही, तो त्याच्या आनंदासाठी लिहितो. हा आनंदाचा मार्ग आहे.
लुच्चेगिरीने भरलेल्या या जगातून कधी दमून भागून मनाच्या पायथ्याशी बसलं की, कविता तिच्या कोमल हातांनी अंतःकरणाला अलगद स्पर्श करते आणि आतला सगळा कचरा झाडून पुसून दूर होतो.  एखाद्या पाऊस पडून गेल्यानंतर स्वच्छ झालेल्या रस्त्याप्रमाणे मन स्वच्छ होते. सगळ्या भावभावना उचंबळून बाहेर येऊ बघतात. संघर्षाच्या विजा कडकडू लागतात. धो-धो कोसळणाऱ्या पावसाप्रमाणे मन बरसू लागते आणि त्याची एक सुंदर कविता होते. सगळं कसं प्रसन्न प्रसन्न होतं, पाऊस पडून गेल्यासारखं..
लव्ह यु कविते...लव्ह यु जिंदगी..!
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...