विश्वास....



विश्वास....
       किती छोटा शब्द ना... जो श्वासाप्रमाणे जपणे आवश्यक आहे तोच विश्वास असतो, आणि म्हणूनच त्याला वि-श्वास म्हणत असावे कदाचित... जशी श्वासाची हमी नाही कि तो केव्हा बंद होईल तसेच हल्ली विश्वासाचे झालेले आहे, कोण कधी तुमचा विश्वास तोडेल याचा ही काहीच नेम नाही.
       आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो म्हणजे काय करतो, तर ही व्यक्ती मला कधीच फसवणार नाही, कधी आणि कुठल्याच परिस्थितीत दगा देणार नाही, याची आपल्या मनाशी खुणगाठ बांधून ठेवतो, आपण विश्वास ठेवतो म्हणजे आपण समोरच्याच्या चांगल्या वागण्याची खात्री आपल्या मनाला देत असतो.मानवी मन हे खूप भावनाशील असते, संवेदनशील असते, ते विश्वास ठेवते पण हा जो दाखवलेला विश्वास जेव्हा कुणी मोडतो तेव्हा त्याचा सर्वात जास्त त्रास हा मनाला होत असतो, कारण विश्वास ही भावनिक बाब आहे. मग प्रश्न पडतो की या जगात कुणावर विश्वास ठेवू कि नये, आणि जर ठेवावा तर कितपत?   
      आम्हाला रोज जीवन जगत असतानाही कुणावर आणि कुणावर विश्वास ठेवावाच लागतो, कारण त्याशिवाय आम्ही आमचे दैनंदिन व्यवहार ही करु शकणार नाही. त्यामुळे विश्वास तर ठेवावा लागतो, मग कोण विश्वासपात्र आहे कसे ओळखणार...? असे म्हणतात कि, पानीपत च्या युध्दात “विश्वासराव” गेले तेव्हापासून जगात विश्वास राहिला नाही, आणि ही खरी गोष्ट आहे, विश्वास ही अशी पातळी असते की, तुम्ही अगदी निश्चिंत असता, अगदी डोळे झाकून विसंबून राहता.आणि का न रहावे, प्रत्येकवेळी प्रत्येक ठिकाणी अगदी जागरुक, सावधान रहावे असं तर काही नसतं ना, थोडसं रिलॅक्स राहून,समोरचा माझी फसवणूक करणार नाही ही भावना ठेवणे चुकीचे तर नाहीच... किंबहूना ती प्रामाणिक आणि निरोगी भावना आहे. आणि जेव्हा हीच भावना आम्हाला आम्ही ज्याच्यावर विश्वास दाखवला त्याच्याकडून ही मिळते, तो आयुष्यातला सुवर्णक्षण असतो, आणि असे फार कमी क्षण कुणाकुणाच्या वाट्याला येत असतील.
     स्वार्थ हा विश्वास तोडण्यास मोठी भूमिका बजावत असतो, त्यामुळेच प्रत्येकाकडून विश्वास जपण्याची अपेक्षा ठेवणेही चुकीचेच म्हणावे लागेल,कारण प्रत्येकाला आपला स्वार्थ प्रिय आहे आणि याच स्वार्थाने कित्येक मानवी मुल्यांचा बळी घेतला आहे. तिथे विश्वासाची काय कथा...
       या विश्वात विश्वासाने विसावण्यासाठी विश्वास ठेवावा लागतो. विश्वास ठेवावा जरुर ठेवावा, त्यासोबत एक खुणगाठ ही मनाशी जरुर बांधून ठेवावी कि, माझ्या श्वासापेक्षाही माझा या व्यक्तीवर जास्त विश्वास आहे पण तरीही ही व्यक्ती सुध्दा माझा विश्वास तोडू शकते,   कारण ह्या व्यक्तीलाही काही स्वार्थ आहे, ती व्यक्ती सुद्धा एक माणूस आहे. आणि माणसाचा काही भरवसा नाही.
       तुम्ही जेव्हा या जगाचा निरोप घ्याल तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या अशा व्यक्तीची संख्या मोजा, ज्यांनी तुम्ही त्यांच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला, ती संख्या जेवढी जास्त असेल तेव्हढे तुम्ही भाग्यवान असाल...!
© राजेश खाकरे
Mo.7875438494

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...