"विश्वासाची निर्घृण हत्या"


"विश्वासाची निर्घृण हत्या"

विश्वासाचं काय घेऊन बसलात तुम्ही?
विश्वासाची केव्हाच झाली निर्घृण हत्या
आरोपी फरार वगैरे नाही
आरोपी सरेआम फिरत असतो
तुमच्या आमच्यात राजरोसपणे
तो पकडला जात नाही
आणि कधी पकडलाही जाणार नाही
कारण खूप "विश्वासात" घेऊन करत असतो तो
विश्वासाची हत्या
मामला खूप जवळचा होऊन जातो
डोळे झाकून विश्वास ठेवावा इतका
उगीच प्रत्येकवेळी सांशक होऊन जगावं
इतकं उथळ नसावं आयुष्यानं
कुठेतरी शाश्वती असावी माणसाला
त्याच्यासोबतच्या अपेक्षित वागण्याची
कधी शांतपणे डोके धरतीवर टेकून
आकाशाकडे बघताना
मनाला नसावी धास्ती
कुणी डोक्यात धोंडा घालण्याची
बऱ्याचवेळा त्या धोंड्यापाठीमागच्या हातांचेच
बोट धरून तुम्ही दाखवलेला असतो मार्ग
त्याच्या उन्नत जीवनाचा
मात्र ती जाणीव नाही राहत त्या हातांना
ते दाखवतातंच हात वेळ आली की
अशा कित्येक हत्या रोजच होतात विश्वासाच्या
मग नाही ठेवावा वाटत विश्वास कुणावर
पुन्हा हत्या होईल या भीतीने
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४

टिव्हीवरची भांडणं

टिव्हीवरची भांडणं
●●●
लहानपणी मला
भांडणं बघायला आवडायची
गल्लीत भांडणं लागली की
मी चवीने बघायचो,
मला आजही
भांडणं बघायला आवडतात
पण सध्या गल्लीत जास्त भांडणं होत नाहीत
त्यामुळे बघायला मिळत नाही
मग मी टीव्ही चालू करतो,
न्यूज चॅनल लावतो
तिथे बरेच शिकलेले वगैरे
तज्ञ वगैरे
प्रवक्ता वगैरे लोक
समाजाचे, धर्माचे
ठेकेदार वगैरे
बसलेले असतात
खूप भांडणं करतात,
एकमेकांवर धावतात,
जोरजोराने ओरडतात
ते कुठल्याही गोष्टीवर भांडू शकतात
आपले प्रखर वगैरे मत मांडू शकतात
कधी कारणांवर कधी विनाकारण
त्यांचं चालूच असतं भांडण
दिवसभरात कुठे न कुठे काहीतरी होतंच असतं
कुणीतरी एखादा शब्द जिभेवरून घसरंवत असतंच
ते त्यातूनच शोधतात एखादा विषय
घंटाभर भांडायला
चांगली असतात ही भांडणं
कधी बोअर वगैरे झालो की
मी बघतो त्यांची भांडणं
मला ही भांडणं बघायला
जाम मजा वगैरे येते
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

परत एकदा सर मी तुमचा विद्यार्थी झालो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

शिकलो, सवरलो, पडलो, धडपडलो
तुमच्या प्रेमछायेत रोज रोज घडलो
म्हटली प्रार्थना, राष्ट्रगीतही म्हटले
पाढे पाठ होण्यास सर तुम्ही झटले
तुमची शिकवण म्हणून संकटास न भ्यालो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

जीवनाच्या शाळेपेक्षा ही शाळा चांगली होती
मोकळे होते आभाळ सर्व खरंच चंगळ होती
हसणं, खेळणं, अभ्यास करणं,आणि उनाड फिरणं
मित्रांसोबतची धमाल, कधी उगीच खोड्या करणं
ते सर्व आठवतानाच भान हरपून गेलो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

आज पुन्हा त्या वर्गात सर मला बसुद्या
काही अवघड गणितं अन हातावर छडी द्या
मधल्या सुट्टीत धावतपळत जेवायला जाऊ द्या
बाजरीची भाकरी अन मिरचीचा ठेचा खाऊ द्या
ती अवीट चव मी पुन्हा चाखायला आलो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

काही क्षण असतात जगण्याचे ते असे भरून घ्यावे
आयुष्यभर पुरतील असे मित्र जोडून घ्यावेत
शिकावं जीवनाचं सार चार भिंतीच्या शाळेत
जगण्यास बळ देणाऱ्या गुरूंचे आशीर्वाद पाठीशी घ्यावेत
ही सर्व शिदोरी मी पुन्हा घ्यायला आलो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

कितीही मोठा झालो तरी मी लहानच ठरतो
शाळा आणि शिक्षकांची आठवण नेहमीच करतो
उर येतो भरून जेव्हा तुमचे प्रेम स्मरतो
विद्यार्थी मी तुमचा आहे अभिमानाने सांगतो
या कृतार्थ सोहळ्याने मी कृतकृत्य झालो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

धन्यवाद सर तुमचे,धन्यवाद तुझे शाळा
तुमच्यामुळे झाला हा जगण्याचा सोहळा
फिरुनी फिरुनी जन्मू आम्ही, येऊ तुमच्या अंगणात
भरभरून ज्ञान आणि शक्ती देई मनगटात
आज परत मी, लहान बालक झालो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com


लायकी...


लायकी...

माणसाची लायकी नसते त्याच्या जवळच्या पैशावर अवलंबून
नसते तो किती दादागिरी करु शकतो त्यावर
माणसाची लायकी समजते त्याच्या वागणुकीवरुन
तो किती प्रामाणिक आहे नीतिमत्तेशी,
तो स्वार्थासाठी कोणत्या थराला जातो यावरुन.
तो वास्तव नाकारून त्याच्या स्वत्वाचा बळी तर देत नाही ना यावरुन.
स्वतः चा स्वार्थ तर पशुनांही समजतो. पण माणूस म्हणजे पशु नाही.सत्य हे चिरंतन शाश्वत असते.सत्यावर क्षणभर निर्लज्जपनाचा पडदा टाकताही येईल कदाचित; पण म्हणून सत्य झाकाळले असे नाही म्हणता येत.
जग तुमच्या कृतिचा त्यांना अनुकूल असा अर्थ लावत असते.परंतु तुमची कृति योग्य की अयोग्य हे मात्र दोन लोकानांच माहीत एक आपण स्वतः अन दुसरा तो सर्वसाक्षी चिरंतन भगवंत!
माणसाने त्याची लायकी सोडावी की धरावी हा ज्याचा त्याचा प्रश्न;परंतु त्याने परिणामासाठी मात्र सदैव तयार असले पाहिजे! हे परिणाम त्याला भोगावे मात्र नक्की लागणार! भगवंताचे एक न्यायालय या सृष्टीत काम करते.त्याला तुम्ही नियती म्हणा, नशीब म्हणा,ते मात्र कुणाला कधीच क्षमा करत नाही. आणि येथे कुठल्या साक्षी पुराव्याची गरज नसते.नियती लाच घेत नाही.तुमची घसेओरड करायची तेथे गरज नसते.मात्र तिथला न्याय म्हणजे न्याय असतो.तिथे कुठले अपील नसते. कुठला फेरविचार नसतो.मात्र जे काही असते ती भगवंताची अतिशय उत्कृष्ट अशी न्यायिक व्यवस्था असते.
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

पोथी जीवनाची


आमल्या गावातील ज्येष्ठ नागरिक साहेबराव पाटील कोळगे ( दादा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यावेळी त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी लिहीलेला हा लेखप्रपंच व शब्दरुप श्रद्धांजलि जानेवारी 2016)
 
पोथी जीवनाची

"अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र...."या ओळी कानावर पडल्या की गावात प्रत्येकाला कळायचे की पोथी सुरु झाली म्हणून.आणि अर्थातच पोथीला जाणार्याची लगबग सुरु व्हायची.
काठी टेकत टेकत कोंडीबाबा कधीच मंदिरात पोचलेला असायचा.त्यांच्याच बाजूला पोलिस पाटील, लक्ष्मण बाबा ,बुवा महाराज,वारीक मामा ही मंडळी बसलेली असायची.आणि समोर इतर लोक आणि मुलांना सावरत बसलेल्या स्रिया यांची गर्दी असायची.मंदिराच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या सभागृहात हा अलौकिक सोहळा गेली कित्येक वर्षे चालायचा.याच ठिकाणी रामायणातला राम ,भागवत आणि हरिविजय मधला श्रीकृष्ण यांची अख्ख्या गावाला ओळख झालेली.याच ठिकाणी कधी श्रीकृष्ण जन्म सोहळा तर कधी रामजन्माची लगबग असायची.आताच्या सारखी टीव्हीवर चे फारसे कार्यक्रम नसायचे त्यामुळे दिवसभर शेतात राबुन आलेल्या जीवाला हा एक विरंगुळा ही असायचा.त्याचबरोबर रामायण,महाभारत,इत्यादि ग्रंथातील पात्रांशी समरस होण्याची संधी सर्वाना मिळायची.त्या कथेतील पात्रे जणू आपल्या समोरच वावरताय या थाटात मांडणी करण्याची दादांची हातोटी यामुळे पोथी ऐकतानी सारा श्रोतृवर्ग त्यात गुंतून जायचा.क्षणभर आयुष्यातील समस्त चिंताचा विसर पडायचा.दिवसभराचा शिणभाग हलका व्हायचा.आणि ओढ़ लागायची उद्याच्या अध्यायाची.
      पोथी वाचाताना प्रत्येक विषय समजाउन सांगण्याची  दादांची एक शैली होती.त्यामुळे प्रत्येक विषय ऐकणार्याला सोपा अन आपला वाटायचा.दादांच्या आवाजातही एक विलक्षण प्रभाविपणा होता.त्यामुळे भारदस्त पण मृदु आवाजामुळे तो आवाज कानात भरुन रहायाचा.
  गावात पोथी चालू असताना सूतक पडले की दादांना पोथी वाचता यायची नाही आणि मग त्यांच्याजागी बसून पोथी वाचण्याची हिम्मत कोणात नसायची पण नाइलाजाने कस तरी तेवढे दिवस उरकावे लागायचे.
पोथी आणि दादा हे जणु समिकरणच झालेले.पोथीबरोबर हरिपाठ, काकड़ आरती, भजन,कीर्तन यात सहभाग तर असायचाच पण पोथीवाचन हा विषय आला की मग कुणाच्याही ओठावर एकच नाव येणार!
  आणि आजही प्रत्येकाच्या ओठावर ते एक नाव आणि एक अलौकिक हळहळ आहे. शेवटी काय प्रत्येकाला च त्या विश्वनियंत्याकडे एक दिवस जीवनाचा हिशोब द्यायला जायचेच आहे.कोणी जीवनाची पोथी वाचतो तर कोणाचे जीवनच एक पोथी बनून जाते.
-राजेश खाकरे

स्वातंत्र्यवीरांनो, तुम्ही खुश आहात ना???

स्वातंत्र्यविरांनो, तुम्ही खुश आहात ना??? 

१५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे ला शाळेत झेंडावंदन असायचं. भल्या पहाटे आई चुलीवर पाणी तापवायला ठेवायची. आणि आवाज देऊन उठवायची, पहाटेच्या कुडकूडत्या थंडीत अंगावर पाणी घ्यायला एरव्ही जीवावर यायचे मात्र ह्या दिवशी अंगात वेगळाच जोश असायचा.. आदल्या दिवशी शाळेला दुपारून सुट्टी दिली जायची. दुपारी घरी आल्यावर पांढऱ्या शर्ट आणि खाकी पॅन्टला इस्त्री करायची असायची. ही इस्त्री म्हणजे एका पितळेच्या तांब्यात गरम कोळसे घालून सांडसाने (चिमटा) ते कपड्यावर फिरवायचे, यामुळे कपड्यावरच्या आढया निघून जायच्या. अंघोळ करून शर्ट अंगात घालताना अंगावर वेगळेच शहारे येत.
शाळेत या दिवशी कधी नाटक असे, कधी समूहगीत,त्यात एखादे पात्र वाट्याला आलेले असायचे मग त्यासाठी आवश्यक पोशाख, पायजमा, धोतर इत्यादी गावात कुणाकडून तरी मागवून आणायचे हे नियोजनही आदल्या दिवशीच व्हायचे.
भल्या पहाटे अंधुक उजेडातच शाळेच्या दिशेने मित्रांसोबत जाताना किती भारी वाटायचे, आधीच देशासाठी किती किती लोकांनी आपले प्राण वगैरे दिले ते गुरुजी मागच्या १५-२० दिवसापासून रोज रोज सांगायचे, शाळेत चालणारी सांस्कृतिक कार्यक्रम यांची तयारी,लेझीम यामुळे अंगात एक वेगळीच स्फूर्ती चढायची. शाळेत गेल्यावर तिथल्या लाऊडस्पीकरवरून मोठ्या आवाजात चाललेले "मेरे देश की धरती" किंवा "ये वतन तेरे लिये" ऐकले की अंगात काय स्फुरण चढायचे. "भारत माता की जय, वंदे मातरम" म्हणत बंदूक घेऊन शत्रूच्या छाताडात धाड धाड गोळ्या झाडाव्या असे वाटायचे. देशाबद्दल, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, क्रांतिकारक, थोर पुरुष यांच्याबद्दल उरात अभिमान दाटून यायचा. एकदम सुरवातीला दोन चार वाक्य आमच्या नेहमी पाठ असायचे, त्यात "भारत १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य झाला. इंग्रजांनी दीडशे वर्ष भारतावर राज्य केले. स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. इत्यादी" त्यावेळी त्याचा फारसा अर्थ समजायचा नाही. इंग्रज कोण? त्यांनी का राज्य केले काही समजायचे नाही फक्त भाषणात ऐकायचो, सर सांगायचे त्यामुळे ते लक्षात तेव्हढे राहायचे. त्यातून एव्हढेच बालबुद्धीला कळायचे की इंग्रज म्हणजे वाईट लोकं, जे लोकांना त्रास द्यायचे. लोकांना धाकात ठेवायचे. असे वाटायचे. शाळेतील इतिहासाचे पुस्तक वाचताना हळूहळू ते लक्षात यायचे. देशासाठी कोणी कोणी आपले प्राण दिले, कष्ट सोसले ते समजायचे,त्या सर्व ज्ञात अज्ञात लोकांविषयी, क्रांतिकारकाविषयी आदर वाटायचा. त्यासोबत असेही वाटायचे की आता तर आमच्या देशात इंग्रजांचे राज्य नाही. आता आमच्या देशावर आमच्याच लोकांचे राज्य आहे. आता आम्ही आमच्या देशाला एकदम भारी बनवू शकतो. आता आम्हाला कुणी अडवणारा नाही. म्हणजे आता आम्ही स्वतंत्र आहोत. कुणी आमच्यावर आता गुलामगिरी गाजवू शकत नाही. आता आम्ही जे पाहिजे ते करू शकतो. मन आनंदाने भरून यायचे.
आज देशाला स्वातंत्र्य मिळवून ७०-७१ वर्ष होऊन गेलीत म्हणजे दीडशे वर्षातला अर्धा काळ आमच्या देशावर आमच्याच लोकांचे राज्य आहे. या सत्तर वर्षात कितीतरी गोष्टी घडल्या आहेत, चांगल्या-वाईट,भल्या-बुऱ्या. देशाने अनेक  स्थित्यंतरे अनुभवली आहेत. विकासाच्या दिशेने, प्रगतीच्या दिशेने देश झेपावत आहे.
मात्र आजही कधी कधी प्रश्न पडतो की खरंच आम्ही स्वतंत्र झालोय का? स्वातंत्र्याचा अर्थ आम्हाला कळला का? आम्ही तो समजून घेतला का? स्वातंत्र्याचे मोल आम्हांस समजले का? हजारो क्रांतिकारकांनी त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती स्वातंत्र्ययुद्धात दिली, त्यांचे बलिदान आम्ही विसरलो आहोत का? का 15 ऑगस्ट, 26 जानेवारी पुरती आमची देशभक्ती सीमित झाली आहे?
आज समाजात विविध प्रवृत्तींनी जन्म घेतलेला आहे. प्रत्येक माणसात जातीयता भरगच्च भरली गेली आहे. प्रत्येक जाती धर्माला हेच वाटत आहे की मीच श्रेष्ठ आहे. आणि हे सर्व स्वतः ला सुशिक्षित समजणारे लोक आहेत. द्वेष आणि मत्सराने आमची मने बरबटली आहेत. स्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराचार असाच आम्ही घेतलेला आहे. 4-5 वर्षाच्या मुलींवर बलात्काराच्या घटना असोत की भ्रष्टाचारास शिष्टाचार मानणारा आमच्या येथला अधिकारी, पदाधिकारी असो, जाती धर्मात दिवसेंदिवस वाढत जाणारी दरी असो, अनैतिकता आणि अविश्वास यांनी आमच्या सभोवतालचे वातावरण भरून गेले आहे. कधी खूप चीड येते या सर्वांची. सत्ता आणि पैशासाठी लोकांच्या आणि देशांच्या भविष्याशी खेळणाऱ्या राजकारण्यांची लाज वाटते. पैसे देऊन मतदान विकत घेणारे आणि पैसे घेऊन मतदान करणारे आमच्या देशाला कोणत्या ठिकाणी नेऊन ठेवणार आहेत,याचा आम्ही कधी विचार केला आहे काय? आम्ही सुशिक्षित तर झालोत पण सुसंस्कृत नाही. स्वतःचा विचार तर करायला लागलो,मात्र समाजाचा,देशाचा नाही.

२६ जानेवारी,१५ ऑगस्ट रोजी आजही झेंड्याला सलामी देतानी एक विचार मनात राहून राहून येतो. ज्या लाखो लोकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी जीवाचे रान, केले, प्राणांची आहुती दिली, फासावर चढले, स्वतंत्र भारताचे स्वप्न बघितले, पारतंत्र्याची बेडी तोडण्यासाठी तन-मन-धनाने समर्पित झाले. ते आज आकाशात कुठेतरी बसून जेव्हा आमच्याकडे बघत असतील तेव्हा त्यांना नेमके काय वाटत असेल..? त्यांना समाधान वाटत असेल ना...? आपण त्यागाने मिळविलेल्या स्वातंत्र्याचे चीज झाले म्हणून.. ते आनंदी असतील ना आज आमच्याकडे बघून...!! की त्यांना राग येत असेल आमच्यावर...
असा एक बालिश विचार कधी मनात येतो की  १५ ऑगस्ट,२६ जानेवारी या दिवशी भल्या पहाटे गाडीवरून झेंडावंदनला जातानी त्या पुढच्या नाक्यावर कधी अचानक महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक किंवा भगतसिंग, इत्यादिपैकी कुणीतरी अचानक भेटावे, मला त्यांना विचारायचे आहे एकदा,
"तुम्ही खुश आहात ना..?"
- © राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...