आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

परत एकदा सर मी तुमचा विद्यार्थी झालो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

शिकलो, सवरलो, पडलो, धडपडलो
तुमच्या प्रेमछायेत रोज रोज घडलो
म्हटली प्रार्थना, राष्ट्रगीतही म्हटले
पाढे पाठ होण्यास सर तुम्ही झटले
तुमची शिकवण म्हणून संकटास न भ्यालो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

जीवनाच्या शाळेपेक्षा ही शाळा चांगली होती
मोकळे होते आभाळ सर्व खरंच चंगळ होती
हसणं, खेळणं, अभ्यास करणं,आणि उनाड फिरणं
मित्रांसोबतची धमाल, कधी उगीच खोड्या करणं
ते सर्व आठवतानाच भान हरपून गेलो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

आज पुन्हा त्या वर्गात सर मला बसुद्या
काही अवघड गणितं अन हातावर छडी द्या
मधल्या सुट्टीत धावतपळत जेवायला जाऊ द्या
बाजरीची भाकरी अन मिरचीचा ठेचा खाऊ द्या
ती अवीट चव मी पुन्हा चाखायला आलो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

काही क्षण असतात जगण्याचे ते असे भरून घ्यावे
आयुष्यभर पुरतील असे मित्र जोडून घ्यावेत
शिकावं जीवनाचं सार चार भिंतीच्या शाळेत
जगण्यास बळ देणाऱ्या गुरूंचे आशीर्वाद पाठीशी घ्यावेत
ही सर्व शिदोरी मी पुन्हा घ्यायला आलो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

कितीही मोठा झालो तरी मी लहानच ठरतो
शाळा आणि शिक्षकांची आठवण नेहमीच करतो
उर येतो भरून जेव्हा तुमचे प्रेम स्मरतो
विद्यार्थी मी तुमचा आहे अभिमानाने सांगतो
या कृतार्थ सोहळ्याने मी कृतकृत्य झालो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

धन्यवाद सर तुमचे,धन्यवाद तुझे शाळा
तुमच्यामुळे झाला हा जगण्याचा सोहळा
फिरुनी फिरुनी जन्मू आम्ही, येऊ तुमच्या अंगणात
भरभरून ज्ञान आणि शक्ती देई मनगटात
आज परत मी, लहान बालक झालो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com


No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...