Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं
आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ ||

ते जीव जाळत उपोषण करत बसले
हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले
जरा जास्त झालं की लाठीखाली घ्यायचं
आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || १ ||

समित्यांवर समित्या बैठकावर बैठका
हा अहवाल तो अहवाल असंच फक्त करायचं
सकारात्मकतेचा डोस देत राहायचं
आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || २ ||

मराठ्यांच्या भविष्यासाठी एक योद्धा लढतोय
झाले चौदा दिवस रोज तीळ तीळ तुटतोय
मराठयांच्या आकांताला समजून नाही घ्यायचं
आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || ३ ||
© राजेश खाकरे
मो.7875438494
एक मराठा लाख मराठा

होतं असं..!

होतं असं...

कधी कधी नेम चुकतो, होतं असं
धनुष्याचा बाण चुकतो...होतं असं

आपलच असतं एरव्ही सगळं काही
वेळ पडता सगळं संपतं... होतं असं

पालन पोषण करून मोठा होतो मुलगा
बापावरतीच हात उगारतो... होतं असं

डोळ्यादेखत आपल्या कधी पडतो दरोडा
आपण नुसते बघत राहतो... होतं असं

सत्यापेक्षा सत्तेचा दबदबा ज्यादा
लोकशाही केविलवाणी होते...होतं असं

सगळे हुंकार कागदावरती उमटत नाही
सगळं- सगळं सांगत नाही कविता... होतं असं
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४





घरकूल

◆◆◆
गेल्या 8 महिन्यापासून तो ग्रामपंचायत ऑफिस मध्ये येऊन चौकशी करतो आहे, त्याला घरकूल मंजूर होते की नाही म्हणून

त्याच्या घराच्या पोपडे आलेल्या मातीच्या भिंती कोणत्याही क्षणी कोसळतील,
त्याच्या घराचे छत पावसाळ्यात तग धरत नाही, आणि घरात साचते तळेच- तळे
तिकडच्याच कुठल्याशा ओल्यासुक्या कोपऱ्यात काढते रात्र त्याचे अख्खे कुटुंब
मी बघितले आहे, त्याच्या घराच्या सारवलेल्या भिंती घुशीने पोखरलेल्या आहेत. आणि कोपऱ्या- कोपऱ्यात मातीचे ढीग साचलेत

त्याच्या दोन एकर शेतीत दहा पंधरा हजारांचे उत्पन्न निघते वर्षाला कसेबसे
म्हणून तो जातो मोलमजुरीने त्याच्या बायकोसोबत.

एके दिवशी बायकोसोबत मोलमजुरीला जातांनी मला भेटला तो त्याच्या नेहमीच्या रस्त्यावर
म्हणाला "साहेब, आपल्या घरकुलावर लक्ष ठेवा बरं.. खूपच गरज आहे आम्हांला, तुम्ही एकदा येऊन बघा ना आमचे सध्याचे घर"

मी एके दिवशी वेळ काढून गेलो तो राहतो तिथल्या शेतावरच्या घरी.
तो दाखवत राहिला त्याच्या गरिबीची लक्तरे,
मधून मधून गाळत राहिला आसवे.

मी बघितले आणि माझे मलाच वाईट वाटले.
तुम्हांला लवकरच घरकूल मिळण्यासाठी प्रयत्न करू असे सांगून आलो त्याला.
पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या घरकुलाच्या यादीत त्याचे नाव 44 नंबरला आहे, निदान अजून 4 वर्ष तरी लागतील त्याला घरकूल यायला
काल तो लगबगीने आला माझ्याकडे.
"साहेब मी ऐकलं की, आणखी 300 घरकुलं मजूर झाले म्हणून?"
"हो झालीत की"
"कोणा-कोणाला मिळणार आहेत?"
"महाराष्ट्रातल्या 300 आमदारांना घरकूल मिळणार आहेत."
" म्हणजे साहेब, ते माझ्यापेक्षाही गरीब आहेत?"

मी काहीच बोललो नाही. 'मी शासकीय कर्मचारी आहे. शासकीय कर्मचाऱ्याने शासन धोरणाविरुद्ध बोलायचे नसते!' मी मनातल्या मनात म्हणालो.
© राजेश खाकरे
२६ मार्च २०२२

कदाचित देवा..!

कदाचित देवा..!
काल परवा-परवा पर्यंत जिवंत असलेल्या व्यक्तीला
आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतांना थरकाप होतोय काळजाचा
भीती मरणाची नाही वाटत. भीती वाटते ते मरण ज्या पद्धतीने येत आहे त्याची.
जो जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणार आहे हे ऐकत आलो होतो,
पण तो उद्या, परवा केव्हाही जाऊ शकतो, हे खूपच भयंकर आहे ना..!
गेल्या दीड वर्षांपासून तोंड बांधून बांधून आणि हाताला फवारे मारून मारून पार कंटाळा आलाय देवा,
जगण्यात मौज नाही राहिली, जगणं भीतीच्या सावटाखाली पार दबून गेलंय..!
कोणाची ऑक्सिजन लेव्हल किती ठेवायची आणि कोणाचा स्कोअर कसा असावा, याचा हिशोब तुझ्याकडेच होता देवा;
तो आमच्याकडे नकोच देऊ..!
चूक तुझी नाहीच देवा, चुका आमच्याच...
ताजातवाना ऑक्सिजन देणारी झाडे आम्ही कराकरा कापून टाकली... आणि उभारत गेलोय सिमेंटची जंगलं..!
तू माणूस म्हणून आम्हाला जन्माला घातलं आणि आमच्यात थोडी माणुसकी ओतलीस..
पण देवा त्या माणुसकीची वाफ होऊन उडून गेली आता..!
आता आम्ही नुसती माणसे आहोत... भेसळयुक्त माणसे... आम्ही आता शुद्ध नाहीतच... सगळ्यात भेसळ केली...करतो आम्ही...
तू बघितलं असेलच परवा-परवा आम्ही इंजेक्शनातही काळाबाजारी केली.. आम्ही कुणालाच आणि कशालाच सोडत नाही.
म्हणूनच कदाचित तू आमच्यावर रागावला असावा...! तुला वाटलं माणसे सुधारतील..! पण माणसे सुधारणार नाहीत देवा...!
पण देवा, तू तर देव आहेस ना, आमच्यावर रागव, आम्हांला अद्दल घडव, पण आता हे थांबव आणि आम्हांला मोकळा श्वास घेऊ दे! एक संधी पुन्हा दे, कदाचित आम्ही माणुसकी रुजवण्याचा प्रयत्न करू! कदाचित आम्ही ही वसुंधरा जपण्याचा प्रयत्न करू!!!
© राजेश खाकरे
मो.7875438494

कविता: चालत आलो वाट

चालत आलो वाट कुठेही वळली नाही
तिच्या मनातील गुपिते कधीच कळली नाही

तुझ्यासारखा नाही कुणी, ती मला म्हणाली
हसलो नुसता,अजून इथे तू रुळली नाही

ठिगळे लावून केली आईने रोजंदारी
रुतला काटा जखम तिची भळभळली नाही

रात्र वाढता पांगून गेल्या सर्व चांदण्या
ध्रुवताऱ्याची जागा कधीच ढळली नाही

कशास दोष द्यावा नुसत्या सुगंधाला
हवी तितकी फुले अजून फुलली नाही

दिसतो मनाचा तळ कधीतरी खोलवर
वाटते तितकी जिंदगी आपली मळली नाही
© राजेश खाकरे, मो.७८७५४३८४९४
दिनांक: १६/१२/२०१९

भावपूर्ण श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली

इथल्या राजकारणाला
राजकारणातल्या निष्ठेला
सत्तेच्या लालसेला
भावपूर्ण श्रद्धांजली..!

इथल्या चढाओढीला
खुर्ची ओढाओढीला
त्यांच्या फोडाफोडीला
भावपूर्ण श्रद्धांजली..!

जनतेच्या मताला
बहुमताच्या भुताला
त्यासाठीच्या गणगोताला
भावपूर्ण श्रद्धांजली..!

विकासाच्या वाटेला
प्रगतीच्या भेटीला
अंगठ्या जवळच्या बोटाला
भावपूर्ण श्रद्धांजली..!
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
२४ नोव्हेंबर २०१९

हे नाराज आहेत, ते नाराज आहेत!

हे नाराज आहेत, ते नाराज आहेत,
फक्त जनता नाराज नाही होत कधीच!
ती सज्ज आहे हातात फुलांचा हार घेऊन
कुणाच्या गळ्यात घालायचा म्हणून!
पण अजून लोकांना कळलच नाही
कोणत्या उमेदवारापुढे कोणतं चिन्ह आहे म्हणून!

पक्ष बिक्ष या सगळ्या अंधश्रद्धा उरल्यात आता.
तिकीट देणारा पक्षच आपला खरा पक्ष असतो;
हे कळलंय आता त्यांना, त्यांना उगीच बंडखोर म्हणून
हिणवू नका!

निष्ठावंत वगैरे काही नसतं कधी. फक्त असतं ते 'निसटा-वंत'
एक उपरणे खिशात ठेवणाऱ्याचा जमाना नाही ऱ्हायला आता!

काल एकाने विचारलं, "ते प्रचार कधी चालू होणार आहे?"
"का बरं?" मी उत्सुकतेने विचारलं!
"दुसरं काही नाही, दहा बारा दिवस मजेत जातात!"
"तू कुठल्या पार्टीचा आहेस का?"
"नाही भाऊ, मी फक्त पार्टीचा आहे!"
"अजून वेळ आहे!"
"कशाला?" त्याचा प्रतिप्रश्न..
"सगळं काही सुरू व्हायला!"  मी काय सांगणार दुसरं!
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४


प्रेम आणि मैत्रीचे भांडण


प्रेम आणि मैत्रीचे भांडण
●●●
प्रेमाचा आणि मैत्रीचा सुरू जाहला झगडा
तुझ्या न माझ्यामध्ये म्हणे कोण आहे तगडा

दोन जीवाची प्रीत माझी जगात आहे नांदते
प्रेमानेच दोन मनांची जवळीक म्हणे साधते

प्रेम असते हवा गुलाबी प्रेम असते अत्तर
जीवनात प्रेमापेक्षा सांगा काय बेहत्तर?

प्रेमासाठी वाट्टेल ते करण्या माणूस धजतो
म्हणूनच प्रेम म्हणाले, मीच मोठा ठरतो

हसून म्हणाली मैत्री, खरेच आहे मित्रा
तुझ्याशिवाय फुलत नाही जीवनाची जत्रा

कटू आहे पण सत्य सांगतो, तुला तुझी महती
तुझ्यामुळेच दररोज ती, कितीक ह्रदये तुटती

भंगलेले ह्र्दय ते मग माझ्याच दारी येते
मित्रांकडे मैत्रीचा आश्वासक हात मागते

मैत्री घालते हळूच फुंकर, ह्रदयाशी कुरवाळते
काळजी नको करुस मित्रा! मी आहे ना म्हणते

मैत्री नसते सिजनेबल, नसते स्वार्थापुरती
लंगोटी घातल्यापासून सोबत करते मैत्री

सगळे जातील सोडून, दिवस पालटताना
मैत्रीचा दीप तुला दिसेल सोबत जळताना

मैत्रीला ना जात असते, ना लहान मोठेपणा
मित्रांशिवाय कुठे असतो, अर्थ ह्या जीवना?

प्रेमाचा अन मैत्रीचा मिटेना काही तंटा
दोघांनी वाजवली "विश्वासा" च्या दाराची घंटा

दोघांचाही एकच प्रश्न म्हणाले 'उत्तर सांगा?'
प्रेमाने की मैत्रीने, जास्त कुणी दिला दगा?'

दुखावलेल्या भावना घेऊन 'विश्वास' बाहेर आला
प्रेमा तुझा नाही भरवसा मैत्रीने डाव जिंकला
© राजेश खाकरे
मैत्री दिन, दिनांक: ४ ऑगस्ट २०१९

प्रेम आणि मैत्रीचे भांडण


प्रेम आणि मैत्रीचे भांडण
●●●
प्रेमाचा आणि मैत्रीचा सुरू जाहला झगडा
तुझ्या न माझ्यामध्ये म्हणे कोण आहे तगडा

दोन जीवाची प्रीत माझी जगात आहे नांदते
प्रेमानेच दोन मनांची जवळीक म्हणे साधते

प्रेम असते हवा गुलाबी प्रेम असते अत्तर
जीवनात प्रेमापेक्षा सांगा काय बेहत्तर?

प्रेमासाठी वाट्टेल ते करण्या माणूस धजतो
म्हणूनच प्रेम म्हणाले, मीच मोठा ठरतो

हसून म्हणाली मैत्री, खरेच आहे मित्रा
तुझ्याशिवाय फुलत नाही जीवनाची जत्रा

कटू आहे पण सत्य सांगतो, तुला तुझी महती
तुझ्यामुळेच दररोज ती, कितीक ह्रदये तुटती

भंगलेले ह्र्दय ते मग माझ्याच दारी येते
मित्रांकडे मैत्रीचा आश्वासक हात मागते

मैत्री घालते हळूच फुंकर, ह्रदयाशी कुरवाळते
काळजी नको करुस मित्रा! मी आहे ना म्हणते

मैत्री नसते सिजनेबल, नसते स्वार्थापुरती
लंगोटी घातल्यापासून सोबत करते मैत्री

सगळे जातील सोडून, दिवस पालटताना
मैत्रीचा दीप तुला दिसेल सोबत जळताना

मैत्रीला ना जात असते, ना लहान मोठेपणा
मित्रांशिवाय कुठे असतो, अर्थ ह्या जीवना?

प्रेमाचा अन मैत्रीचा मिटेना काही तंटा
दोघांनी वाजवली "विश्वासा" च्या दाराची घंटा

दोघांचाही एकच प्रश्न म्हणाले 'उत्तर सांगा?'
प्रेमाने की मैत्रीने, जास्त कुणी दिला दगा?'

दुखावलेल्या भावना घेऊन 'विश्वास' बाहेर आला
प्रेमा तुझा नाही भरवसा मैत्रीने डाव जिंकला
© राजेश खाकरे
मैत्री दिन, दिनांक: ४ ऑगस्ट २०१९

काय करु रामा,पुन्हा निवडणूक आली

काय करु रामा,पुन्हा निवडणूक आली

रामा रामा रामा, तुझी आठवण झाली
काय करु रामा,पुन्हा निवडणूक आली

तुझे आणि माझे आहे अजब नाते
दर इलेक्शनला तुझे मंदिर आठवते
तुझ्याशिवाय रामा कोण आम्हा वाली
काय करु रामा,पुन्हा निवडणूक आली

मंदिराच्या मुद्द्याला जरी साठ वर्ष झाली
धर्माची जखम आम्हांला करता येते ओली
भावनिक होते दरवेळी जनता ही भोळी
काय करु रामा,पुन्हा निवडणूक आली

त्यांना ना तुझी चिंता ना तुझ्या मंदिराची
फक्त तुंबडी भरायची आहे जनतेच्या मताची
कोर्टाची पायरी आहे रामा तुझ्या भाळी
काय करु रामा,पुन्हा निवडणूक आली
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४

"विश्वासाची निर्घृण हत्या"


"विश्वासाची निर्घृण हत्या"

विश्वासाचं काय घेऊन बसलात तुम्ही?
विश्वासाची केव्हाच झाली निर्घृण हत्या
आरोपी फरार वगैरे नाही
आरोपी सरेआम फिरत असतो
तुमच्या आमच्यात राजरोसपणे
तो पकडला जात नाही
आणि कधी पकडलाही जाणार नाही
कारण खूप "विश्वासात" घेऊन करत असतो तो
विश्वासाची हत्या
मामला खूप जवळचा होऊन जातो
डोळे झाकून विश्वास ठेवावा इतका
उगीच प्रत्येकवेळी सांशक होऊन जगावं
इतकं उथळ नसावं आयुष्यानं
कुठेतरी शाश्वती असावी माणसाला
त्याच्यासोबतच्या अपेक्षित वागण्याची
कधी शांतपणे डोके धरतीवर टेकून
आकाशाकडे बघताना
मनाला नसावी धास्ती
कुणी डोक्यात धोंडा घालण्याची
बऱ्याचवेळा त्या धोंड्यापाठीमागच्या हातांचेच
बोट धरून तुम्ही दाखवलेला असतो मार्ग
त्याच्या उन्नत जीवनाचा
मात्र ती जाणीव नाही राहत त्या हातांना
ते दाखवतातंच हात वेळ आली की
अशा कित्येक हत्या रोजच होतात विश्वासाच्या
मग नाही ठेवावा वाटत विश्वास कुणावर
पुन्हा हत्या होईल या भीतीने
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४

टिव्हीवरची भांडणं

टिव्हीवरची भांडणं
●●●
लहानपणी मला
भांडणं बघायला आवडायची
गल्लीत भांडणं लागली की
मी चवीने बघायचो,
मला आजही
भांडणं बघायला आवडतात
पण सध्या गल्लीत जास्त भांडणं होत नाहीत
त्यामुळे बघायला मिळत नाही
मग मी टीव्ही चालू करतो,
न्यूज चॅनल लावतो
तिथे बरेच शिकलेले वगैरे
तज्ञ वगैरे
प्रवक्ता वगैरे लोक
समाजाचे, धर्माचे
ठेकेदार वगैरे
बसलेले असतात
खूप भांडणं करतात,
एकमेकांवर धावतात,
जोरजोराने ओरडतात
ते कुठल्याही गोष्टीवर भांडू शकतात
आपले प्रखर वगैरे मत मांडू शकतात
कधी कारणांवर कधी विनाकारण
त्यांचं चालूच असतं भांडण
दिवसभरात कुठे न कुठे काहीतरी होतंच असतं
कुणीतरी एखादा शब्द जिभेवरून घसरंवत असतंच
ते त्यातूनच शोधतात एखादा विषय
घंटाभर भांडायला
चांगली असतात ही भांडणं
कधी बोअर वगैरे झालो की
मी बघतो त्यांची भांडणं
मला ही भांडणं बघायला
जाम मजा वगैरे येते
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

परत एकदा सर मी तुमचा विद्यार्थी झालो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

शिकलो, सवरलो, पडलो, धडपडलो
तुमच्या प्रेमछायेत रोज रोज घडलो
म्हटली प्रार्थना, राष्ट्रगीतही म्हटले
पाढे पाठ होण्यास सर तुम्ही झटले
तुमची शिकवण म्हणून संकटास न भ्यालो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

जीवनाच्या शाळेपेक्षा ही शाळा चांगली होती
मोकळे होते आभाळ सर्व खरंच चंगळ होती
हसणं, खेळणं, अभ्यास करणं,आणि उनाड फिरणं
मित्रांसोबतची धमाल, कधी उगीच खोड्या करणं
ते सर्व आठवतानाच भान हरपून गेलो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

आज पुन्हा त्या वर्गात सर मला बसुद्या
काही अवघड गणितं अन हातावर छडी द्या
मधल्या सुट्टीत धावतपळत जेवायला जाऊ द्या
बाजरीची भाकरी अन मिरचीचा ठेचा खाऊ द्या
ती अवीट चव मी पुन्हा चाखायला आलो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

काही क्षण असतात जगण्याचे ते असे भरून घ्यावे
आयुष्यभर पुरतील असे मित्र जोडून घ्यावेत
शिकावं जीवनाचं सार चार भिंतीच्या शाळेत
जगण्यास बळ देणाऱ्या गुरूंचे आशीर्वाद पाठीशी घ्यावेत
ही सर्व शिदोरी मी पुन्हा घ्यायला आलो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

कितीही मोठा झालो तरी मी लहानच ठरतो
शाळा आणि शिक्षकांची आठवण नेहमीच करतो
उर येतो भरून जेव्हा तुमचे प्रेम स्मरतो
विद्यार्थी मी तुमचा आहे अभिमानाने सांगतो
या कृतार्थ सोहळ्याने मी कृतकृत्य झालो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो

धन्यवाद सर तुमचे,धन्यवाद तुझे शाळा
तुमच्यामुळे झाला हा जगण्याचा सोहळा
फिरुनी फिरुनी जन्मू आम्ही, येऊ तुमच्या अंगणात
भरभरून ज्ञान आणि शक्ती देई मनगटात
आज परत मी, लहान बालक झालो
आज पुन्हा एकदा माझ्या शाळेत आलो
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com


...आणि दुःख confuse होतं

आणि दुःख confuse होतं

त्रासाने भरलेल्या खोक्यावर
मी "आनंद" असं लिहितो
...आणि दुःख confuse होतं

येणाऱ्या प्रत्येक संकटाला
एक छानशी smile देतो
...आणि दुःख confuse होतं

खरं सांगायचं तर खूप वेळा
मी कोलमडून जातो
सगळं संपलं असं वाटून
अगदी गर्भगळीत होतो
कुठूनतरी देव येऊन
माझ्या हातात हात देतो
...आणि दुःख confuse होतं

संकटाच काय? ती येणारच
आल्यावर थोडं फार छळणारच
आपण स्थिर राहायचं काही काळ
संकटाचं पाणी पाणी होणारच
आलेलं संकट हसता हसता
नकळत नाहीसं होतं
...आणि दुःख confuse होतं

किती दिवसाचं हे आयुष्य
आज ना उद्या संपणारच
अमुक आहे-तमुक नाही
आपलं चालू राहणारच
फाटक्या गोधडीत पाय आखडून
मी सुखाने झोपी जातो
...आणि दुःख confuse होतं

म्हटलं तर जीवन सुंदर
म्हटलं तर वाईट आहे
मग त्याला सुंदर म्हणण्यात
सांगा काय वाईट आहे?
जीवनाकडे बघण्याचा
मी चष्मा विकत घेतो
...आणि दुःख confuse होतं
- © राजेश खाकरे

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...