कदाचित देवा..!

कदाचित देवा..!
काल परवा-परवा पर्यंत जिवंत असलेल्या व्यक्तीला
आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतांना थरकाप होतोय काळजाचा
भीती मरणाची नाही वाटत. भीती वाटते ते मरण ज्या पद्धतीने येत आहे त्याची.
जो जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणार आहे हे ऐकत आलो होतो,
पण तो उद्या, परवा केव्हाही जाऊ शकतो, हे खूपच भयंकर आहे ना..!
गेल्या दीड वर्षांपासून तोंड बांधून बांधून आणि हाताला फवारे मारून मारून पार कंटाळा आलाय देवा,
जगण्यात मौज नाही राहिली, जगणं भीतीच्या सावटाखाली पार दबून गेलंय..!
कोणाची ऑक्सिजन लेव्हल किती ठेवायची आणि कोणाचा स्कोअर कसा असावा, याचा हिशोब तुझ्याकडेच होता देवा;
तो आमच्याकडे नकोच देऊ..!
चूक तुझी नाहीच देवा, चुका आमच्याच...
ताजातवाना ऑक्सिजन देणारी झाडे आम्ही कराकरा कापून टाकली... आणि उभारत गेलोय सिमेंटची जंगलं..!
तू माणूस म्हणून आम्हाला जन्माला घातलं आणि आमच्यात थोडी माणुसकी ओतलीस..
पण देवा त्या माणुसकीची वाफ होऊन उडून गेली आता..!
आता आम्ही नुसती माणसे आहोत... भेसळयुक्त माणसे... आम्ही आता शुद्ध नाहीतच... सगळ्यात भेसळ केली...करतो आम्ही...
तू बघितलं असेलच परवा-परवा आम्ही इंजेक्शनातही काळाबाजारी केली.. आम्ही कुणालाच आणि कशालाच सोडत नाही.
म्हणूनच कदाचित तू आमच्यावर रागावला असावा...! तुला वाटलं माणसे सुधारतील..! पण माणसे सुधारणार नाहीत देवा...!
पण देवा, तू तर देव आहेस ना, आमच्यावर रागव, आम्हांला अद्दल घडव, पण आता हे थांबव आणि आम्हांला मोकळा श्वास घेऊ दे! एक संधी पुन्हा दे, कदाचित आम्ही माणुसकी रुजवण्याचा प्रयत्न करू! कदाचित आम्ही ही वसुंधरा जपण्याचा प्रयत्न करू!!!
© राजेश खाकरे
मो.7875438494

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...