बालकविता: उंदीरमामाची माढी

एकदा उंदीर मामाने बांधली एक माढी
माढी त्याची बघायला जमा झाली वाडी

ससा आला,कासव आला,चिमणीही आली
उंदीरमामाच्या माढीवरती मोठी गर्दी झाली

प्रत्येकाच्या तोंडात होता एकच बोलबाला
उंदीरमामा आता म्हणे खूप मोठा झाला

तिथे मोठ्या सिंहासनावर उंदीरमामा बसले
येणाऱ्यास नमस्कार करत स्मित स्मित हसले

थोड्या वेळाने तिथे मांजर मावशी आली
उंदीरमामाची भीतीने चुळबुळ सुरू झाली

टुणकून उडी मारुन उंदीरमामा पळाले
हसता हसता सर्वांना गुज त्याचे कळाले
© राजेश खाकरे
rajesh.khakre@gmail.com

अशी सुचते कविता

अशी सुचते कविता अर्थात कवितेच्या जन्माची कहाणी

कवी हा एक आगळावेगळा निर्मितीकार असतो. स्वतः च्या प्रतिभेतून नवनवीन कवितांना जन्मास घालत असतो. कविता कधी, कुठे, कशी सुचेल याचा काहीच नेम नसतो. कधी रस्त्याने, कधी गर्दीत, कधी चालताने, कधी गाडीवर, कधी कधीपण...अमुक वेळी मला कविता सुचेल हे कवी स्वतः पण ठामपणे सांगू शकत नाही. शरीराच्या एखाद्या भागात अणकुचीदार सुई टोचावी आणि त्यातून रक्ताची चिळकांडी बाहेर यावी तशी कवींच्या संवेदनशील मनावर एखाद्या बाह्य किंवा अंतस्थ: परिस्थितीचा आघात होतो आणि कविता बाहेर निघते. तिचा आवेग हा त्या भावनेच्या आघाताच्या तिव्रतेवर  ठरत असतो. भावना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, कधी राग, द्वेष, उद्रेक, तर कधी सुखद, हास्य अशीही असू शकते. कविता या भावनेचा हात धरून कागदावर उतरते.आणि तसेच स्वरूप धारण करते. एखादी कविता वाचताना कधी तोंडातून आपसूकच वाह शब्द निघतात याचे कारण त्या कवीने त्या त्या भावनेला यतार्थपणे आपल्या कवितेत मांडलेले असते. कविता ही कवींच्या भावना आविष्कराचे मूर्तीमंत स्वरूप असते. ती कविता जन्म घेताना कवी ज्या मानसिक भावना आवेगातून जात असतो, त्याच भावनेतून जर वाचकाने कविता वाचली तर कविता खऱ्या अर्थाने वाचकपर्यत पोचली असे म्हणता येईल, मात्र ते प्रत्येकवेळी साध्य होईलच असे नाही. कारण कवी आणि वाचक यांचे स्वतंत्र भावनाविश्व असते.कवितेत कवीने मांडलेला एखादा प्रसंग किंवा शब्द,ओळ वाचकाला रुचत नाही किंवा त्याला खटकते मात्र कवीने मांडलेला प्रसंग, शब्द किंवा ओळ ही कवीने ज्या पूर्वपार्श्वभूमीतून मांडलेली असते. ती पार्श्वभूमी मात्र वाचकाला माहीत नसते.
कविता जन्म घेण्यापूर्वी ती अनेक मानसिक प्रक्रियेतून जात असते. तिच्या निर्मितीमध्ये जशी एखादी तात्कालिक परिस्थिती कारणीभूत ठरते तसेच त्या निर्मितीमागे कवीचा काही विचार असतो, काही दृष्टिकोन असतो. त्याच्या काही जीवनाविषयीच्या जाणिवा असतात. जेव्हा कुठे काही कमी जास्त होताना दिसले की कवीची लेखणी डोकं वर काढते, ती प्रहार करायला लागते, कुठे व्यंगावर बोट ठेवते, कुठे उपरोधिक टीका करते, कुठे शाबासकी देते, कुठे हास्य फुलविते, कुठे प्रोत्साहन देते, तर कुठे जगण्याला दिशा देते, जीवनाला आकार देते. आणि या सर्व गोष्टी कवी करत असतो. त्याच्या लेखणीतून. त्याची लेखणी म्हणजे एक एक क्रांतिकारक शस्र असते.त्याच्या ह्याच लेखणीतून अवतरलेल्या कवितेच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती, कवीला ही कविता नेमकी का लिहावी लागली, असे काय घडले, अनुभवले किंवा बघितले ज्यातून ह्या कवितेचा जन्म झाला, ही एक न सांगितलेली कहाणी असते, आणि कवितेचे तेच मूळ असते.जसे एखादे गाणे कसे तयार झाले, त्याच्या पाठीमागची रोचक कहाणी ऐकली की ते गाणे आवडायला लागते, तसेच कवींच्या भावनेशी एकरूप होऊन कविता वाचण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला की कविता आवडायला लागते.
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
Rajesh.khakre@gmail.com

मित्रो....!

मित्रो
●●●
एक वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता टिव्हीवरून आमच्या मोदीसाहेबांची मित्रो अशी हाक आली आणि तेव्हापासून समस्त देश वासीयांनी मित्रो या शब्दांची जेव्हढी धास्ती धरली आहे ती पण ऐतिहासिकच आहे. नाहीतरी लोकसभा इलेक्षनात मोदी साहेबांनी ही हाक कितीतरी वेळा दिली होती, पण आठ तारखेची हाक मात्र बारा वाजवून गेली.
एका क्षणात पैशाचा कागद व्हावा तसा काहीसा भास झाला. आणि मग कुठे कुठे किती किती पैसा ठेवला ते धनाढय लोक शोधू लागले, नियोजन करायला लागले, या निर्णयाने पाहिल्यांदाच पैसे नसण्यातला आनंद काही लोकांनी घेतला. वाईट आणि खोट्या मार्गाने ज्यांनी पैसा कमवला त्यांची मोठी पंचाईत झाली.गरीब जनतेला या निर्णयातून मोठे मोठे घबाड बाहेर येतील असेही वाटत राहिले, आपल्या पती, मुलांपासून काही पैसे गुपचूप, काटकसर करून ठेवलेल्या आणि स्वतः चे बँकखाते नसलेल्या महिला भगिणीची मोठी पंचाईत झाली. सर्वसामान्यांची बँकेसमोर रांगा लावून मोठी परवड झाली. प्रवासात आणि बाहेरगावी गेलेल्या लोकांची तर तारांबळच उडाली.घरी लग्नकार्य असणारे मोठ्या चिंतेत पडले,बऱ्याच गोष्टी घडून गेल्या. काही चांगल्या तर वाईट. नोटबंदी झाल्यावर काही महिने सर्वसामान्य लोकांना त्रासही झाला, मात्र जर काही चांगले घडत असेल तर होउद्या थोडा त्रास म्हणत काहींनी सहन केला तर काहींनी नेहमीप्रमाणे शिव्याशापही दिले.
पैसा हातात नव्हता मात्र सर्वत्र पैशाच्याच गप्पा चालत होत्या. बसस्टॅन्डवर कटिंग चहा पिता- पिता कुठे किती पैशाचे पोते सापडले याची चर्चा चालत होती. काही ठिकाणी गंगेत, रस्त्यावर फेकलेल्या आणि बातम्यात दाखवलेल्या घटनांवर ऑफिसातून, नाक्यावर, पारावर, चर्चासत्रे रंगत होती. ज्याला उधारी द्यायची आहे तो मुद्दाम फोन करून घेऊन जाण्यास सांगत होता, तर असुदे सध्या काही घाई नाही म्हणून समोरचा पैसे घेण्याचे टाळत होता. कुणाला आपल्याकडे फारसे पैसे नाही याचा आनंद होत होता तर ज्यांनी भ्रष्टाचार आणि अनितीने माया जमवली त्याची व्यवस्था लावण्याच्या भीतीने काया थरथरत होती. पेट्रोलपंपावर काही काळ नोटा चालत असल्याने पेट्रोल टाकताना काहींना उगीच आनंद मिळत होता. 10, 20,50,100 रुपयांच्या नोटा असणारा व्यक्ती तर एकदम श्रीमंत वाटायला लागला.
जुन्या नोटा जाऊन नवीन करकरीत नोटा आल्या, काहींनी पाहिल्यादाच हातात आलेल्या नोटा जपून ठेवल्या. नवीन आलेल्या नोटांची सवय नसल्याने त्या कागदाप्रमाणे वाटायला लागल्या. काही महिने विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा सुरु झाले. या काळात ऑनलाइन व्यवहाराकडे बऱ्यापैकी ओढा वाढला.
नोटबंदींतर काळापैसा बाहेर आला का? भ्रष्टाचार कमी झाला का? अर्थव्यवस्था सुधारली का?? यात सामान्य जनतेचे हित झाले का? काळा पैसा पुन्हा सफेद करण्यात भ्रष्टाचारी लोक यशस्वी झाले का? नोटाबंदीने देशाचा जनतेचा फायदा झाला का?
नोटबंदीची गरज होती की नव्हती? नोटबंदी यशस्वी झाली का??? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मात्र अजूनही स्पष्टपणे लोकांना समजली नाही.
सत्ताधारी पक्ष सुरवातीपासून नोटबंदीचे समर्थन करत ती कशी यशस्वी झाली हे पटवून देण्याचा प्रयत्न करत राहिला. तर दुसऱ्या बाजूला विरोधक सुरुवातीपासून नोटाबंदीला विरोध करून ती कशी निष्फळ आणि जनतेला परेशान करणारी होती याचे चित्र रंगवत राहिला.
सामान्य माणसाला मात्र थोडा त्रास आणि त्याच्या खिशात असणाऱ्या तुटपुंज्या पैशाचा रंग बद्दलण्यापलीकडे नोटबंदीतून काही मिळाले असे जाणवले नाही.
नोटबंदीतून देशाचा, जनतेचा फायदा झाला की तोटा हे  येणारा पुढील काळ सांगून देईल, असे असले तरी नोटबंदी अगदीच निरर्थक होती असे म्हणणेही योग्य होणार नाही. नोटाबंदीने खोट्या मार्गाने मिळवलेली संपत्ती तुम्हाला अडचणीत आणू शकते, हे प्रकर्षाने जाणवून दिले, online व्यवहारात आपोआप वाढ झाली ती नोटबंदीमुळेच..आणि पैशाच्या पाठीमागे धाप लागेपर्यंत धावणाऱ्या आणि पैसाच सर्वस्व आहे असे मानणाऱ्या लोकांना पैसा म्हणजे सर्वस्व नाही हे  या निमित्ताने अनुभवता आले ही गोष्टही नाकारून चालणार नाही.
-राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajeshkhakre.bolgspot.in

बालकविता: स्वप्नात आली शाळा

स्वप्नात आली शाळा

काल रात्री स्वप्नात आली माझी शाळा
सुट्ट्या संपल्या आता शाळेत ये बाळा  !! धृ !!

दिवाळीचा फराळ तुझा संपला असेल
धिंगा-मस्ती, मौज मजा करून झाली असेल
माझ्या आवारात येऊन थोडे खेळा
सुट्ट्या संपल्या आता शाळेत ये बाळा ||१ ||

मामाच्या गावाची सफर कशी केली?
नव्या ओळखी, भेट कुणाकुणाशी झाली?
निबंध लिहून मला गमतीजमती कळवा
सुट्ट्या संपल्या आता शाळेत ये बाळा  ||२||

तुमच्या त्या किलबिलीची सवय आहे मला
तुम्ही गेला तेव्हापासून जीव व्याकुळ झाला
आल्यावर तुम्ही एकदा स्वच्छ पुसा फळा
सुट्ट्या संपल्या आता शाळेत ये बाळा ||३||
- राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

कामापूरता मामा

कामापूरता मामा असतो कामापूरता मामा
गरजेनंतर कोण ठेवतो आठवण तुमची सांगा

कुडकुडणाऱ्या थंडीत सूर्याची वाट पाहिली जाते
उन्हाळ्यात त्याच सूर्याला लाखोली वाहिली जाते
सूर्य वाईट ना थंडी उन्हाळा गरज महत्वाची बाबा
कामापूरता मामा असतो कामापूरता मामा

काम पडता आठवतात मग सगे सोयरे मित्र
वेळ संपल्यावरती तुला विचारत नाही कुत्रं
नमस्कार वाकून असतो जेव्हा ठरतो कुणी दादा
कामापूरता मामा असतो कामापूरता मामा

कधी नाही करत फोन,त्याचाही कॉल येईल
भेटत नसतो कधी कुणा, तो ही भेट घेईल
असला पाहिजे पैसा अडका अन थोडा गाजावाजा
कामापूरता मामा असतो कामापूरता मामा

गरज सरो अन वैद्य मरो अशी जगाची रीत
कुणी जगो वा मरो तिकडे, साधून घ्यावे हित
स्वार्थाच्या गाडीला नसतो मानवतेचा थांबा
कामापूरता मामा असतो कामापूरता मामा
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...