स्वातंत्र्यवीरांनो, तुम्ही खुश आहात ना???

स्वातंत्र्यविरांनो, तुम्ही खुश आहात ना??? 

१५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे ला शाळेत झेंडावंदन असायचं. भल्या पहाटे आई चुलीवर पाणी तापवायला ठेवायची. आणि आवाज देऊन उठवायची, पहाटेच्या कुडकूडत्या थंडीत अंगावर पाणी घ्यायला एरव्ही जीवावर यायचे मात्र ह्या दिवशी अंगात वेगळाच जोश असायचा.. आदल्या दिवशी शाळेला दुपारून सुट्टी दिली जायची. दुपारी घरी आल्यावर पांढऱ्या शर्ट आणि खाकी पॅन्टला इस्त्री करायची असायची. ही इस्त्री म्हणजे एका पितळेच्या तांब्यात गरम कोळसे घालून सांडसाने (चिमटा) ते कपड्यावर फिरवायचे, यामुळे कपड्यावरच्या आढया निघून जायच्या. अंघोळ करून शर्ट अंगात घालताना अंगावर वेगळेच शहारे येत.
शाळेत या दिवशी कधी नाटक असे, कधी समूहगीत,त्यात एखादे पात्र वाट्याला आलेले असायचे मग त्यासाठी आवश्यक पोशाख, पायजमा, धोतर इत्यादी गावात कुणाकडून तरी मागवून आणायचे हे नियोजनही आदल्या दिवशीच व्हायचे.
भल्या पहाटे अंधुक उजेडातच शाळेच्या दिशेने मित्रांसोबत जाताना किती भारी वाटायचे, आधीच देशासाठी किती किती लोकांनी आपले प्राण वगैरे दिले ते गुरुजी मागच्या १५-२० दिवसापासून रोज रोज सांगायचे, शाळेत चालणारी सांस्कृतिक कार्यक्रम यांची तयारी,लेझीम यामुळे अंगात एक वेगळीच स्फूर्ती चढायची. शाळेत गेल्यावर तिथल्या लाऊडस्पीकरवरून मोठ्या आवाजात चाललेले "मेरे देश की धरती" किंवा "ये वतन तेरे लिये" ऐकले की अंगात काय स्फुरण चढायचे. "भारत माता की जय, वंदे मातरम" म्हणत बंदूक घेऊन शत्रूच्या छाताडात धाड धाड गोळ्या झाडाव्या असे वाटायचे. देशाबद्दल, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, क्रांतिकारक, थोर पुरुष यांच्याबद्दल उरात अभिमान दाटून यायचा. एकदम सुरवातीला दोन चार वाक्य आमच्या नेहमी पाठ असायचे, त्यात "भारत १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य झाला. इंग्रजांनी दीडशे वर्ष भारतावर राज्य केले. स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. इत्यादी" त्यावेळी त्याचा फारसा अर्थ समजायचा नाही. इंग्रज कोण? त्यांनी का राज्य केले काही समजायचे नाही फक्त भाषणात ऐकायचो, सर सांगायचे त्यामुळे ते लक्षात तेव्हढे राहायचे. त्यातून एव्हढेच बालबुद्धीला कळायचे की इंग्रज म्हणजे वाईट लोकं, जे लोकांना त्रास द्यायचे. लोकांना धाकात ठेवायचे. असे वाटायचे. शाळेतील इतिहासाचे पुस्तक वाचताना हळूहळू ते लक्षात यायचे. देशासाठी कोणी कोणी आपले प्राण दिले, कष्ट सोसले ते समजायचे,त्या सर्व ज्ञात अज्ञात लोकांविषयी, क्रांतिकारकाविषयी आदर वाटायचा. त्यासोबत असेही वाटायचे की आता तर आमच्या देशात इंग्रजांचे राज्य नाही. आता आमच्या देशावर आमच्याच लोकांचे राज्य आहे. आता आम्ही आमच्या देशाला एकदम भारी बनवू शकतो. आता आम्हाला कुणी अडवणारा नाही. म्हणजे आता आम्ही स्वतंत्र आहोत. कुणी आमच्यावर आता गुलामगिरी गाजवू शकत नाही. आता आम्ही जे पाहिजे ते करू शकतो. मन आनंदाने भरून यायचे.
आज देशाला स्वातंत्र्य मिळवून ७०-७१ वर्ष होऊन गेलीत म्हणजे दीडशे वर्षातला अर्धा काळ आमच्या देशावर आमच्याच लोकांचे राज्य आहे. या सत्तर वर्षात कितीतरी गोष्टी घडल्या आहेत, चांगल्या-वाईट,भल्या-बुऱ्या. देशाने अनेक  स्थित्यंतरे अनुभवली आहेत. विकासाच्या दिशेने, प्रगतीच्या दिशेने देश झेपावत आहे.
मात्र आजही कधी कधी प्रश्न पडतो की खरंच आम्ही स्वतंत्र झालोय का? स्वातंत्र्याचा अर्थ आम्हाला कळला का? आम्ही तो समजून घेतला का? स्वातंत्र्याचे मोल आम्हांस समजले का? हजारो क्रांतिकारकांनी त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती स्वातंत्र्ययुद्धात दिली, त्यांचे बलिदान आम्ही विसरलो आहोत का? का 15 ऑगस्ट, 26 जानेवारी पुरती आमची देशभक्ती सीमित झाली आहे?
आज समाजात विविध प्रवृत्तींनी जन्म घेतलेला आहे. प्रत्येक माणसात जातीयता भरगच्च भरली गेली आहे. प्रत्येक जाती धर्माला हेच वाटत आहे की मीच श्रेष्ठ आहे. आणि हे सर्व स्वतः ला सुशिक्षित समजणारे लोक आहेत. द्वेष आणि मत्सराने आमची मने बरबटली आहेत. स्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराचार असाच आम्ही घेतलेला आहे. 4-5 वर्षाच्या मुलींवर बलात्काराच्या घटना असोत की भ्रष्टाचारास शिष्टाचार मानणारा आमच्या येथला अधिकारी, पदाधिकारी असो, जाती धर्मात दिवसेंदिवस वाढत जाणारी दरी असो, अनैतिकता आणि अविश्वास यांनी आमच्या सभोवतालचे वातावरण भरून गेले आहे. कधी खूप चीड येते या सर्वांची. सत्ता आणि पैशासाठी लोकांच्या आणि देशांच्या भविष्याशी खेळणाऱ्या राजकारण्यांची लाज वाटते. पैसे देऊन मतदान विकत घेणारे आणि पैसे घेऊन मतदान करणारे आमच्या देशाला कोणत्या ठिकाणी नेऊन ठेवणार आहेत,याचा आम्ही कधी विचार केला आहे काय? आम्ही सुशिक्षित तर झालोत पण सुसंस्कृत नाही. स्वतःचा विचार तर करायला लागलो,मात्र समाजाचा,देशाचा नाही.

२६ जानेवारी,१५ ऑगस्ट रोजी आजही झेंड्याला सलामी देतानी एक विचार मनात राहून राहून येतो. ज्या लाखो लोकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी जीवाचे रान, केले, प्राणांची आहुती दिली, फासावर चढले, स्वतंत्र भारताचे स्वप्न बघितले, पारतंत्र्याची बेडी तोडण्यासाठी तन-मन-धनाने समर्पित झाले. ते आज आकाशात कुठेतरी बसून जेव्हा आमच्याकडे बघत असतील तेव्हा त्यांना नेमके काय वाटत असेल..? त्यांना समाधान वाटत असेल ना...? आपण त्यागाने मिळविलेल्या स्वातंत्र्याचे चीज झाले म्हणून.. ते आनंदी असतील ना आज आमच्याकडे बघून...!! की त्यांना राग येत असेल आमच्यावर...
असा एक बालिश विचार कधी मनात येतो की  १५ ऑगस्ट,२६ जानेवारी या दिवशी भल्या पहाटे गाडीवरून झेंडावंदनला जातानी त्या पुढच्या नाक्यावर कधी अचानक महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक किंवा भगतसिंग, इत्यादिपैकी कुणीतरी अचानक भेटावे, मला त्यांना विचारायचे आहे एकदा,
"तुम्ही खुश आहात ना..?"
- © राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...