पोथी जीवनाची


आमल्या गावातील ज्येष्ठ नागरिक साहेबराव पाटील कोळगे ( दादा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यावेळी त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी लिहीलेला हा लेखप्रपंच व शब्दरुप श्रद्धांजलि जानेवारी 2016)
 
पोथी जीवनाची

"अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र...."या ओळी कानावर पडल्या की गावात प्रत्येकाला कळायचे की पोथी सुरु झाली म्हणून.आणि अर्थातच पोथीला जाणार्याची लगबग सुरु व्हायची.
काठी टेकत टेकत कोंडीबाबा कधीच मंदिरात पोचलेला असायचा.त्यांच्याच बाजूला पोलिस पाटील, लक्ष्मण बाबा ,बुवा महाराज,वारीक मामा ही मंडळी बसलेली असायची.आणि समोर इतर लोक आणि मुलांना सावरत बसलेल्या स्रिया यांची गर्दी असायची.मंदिराच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या सभागृहात हा अलौकिक सोहळा गेली कित्येक वर्षे चालायचा.याच ठिकाणी रामायणातला राम ,भागवत आणि हरिविजय मधला श्रीकृष्ण यांची अख्ख्या गावाला ओळख झालेली.याच ठिकाणी कधी श्रीकृष्ण जन्म सोहळा तर कधी रामजन्माची लगबग असायची.आताच्या सारखी टीव्हीवर चे फारसे कार्यक्रम नसायचे त्यामुळे दिवसभर शेतात राबुन आलेल्या जीवाला हा एक विरंगुळा ही असायचा.त्याचबरोबर रामायण,महाभारत,इत्यादि ग्रंथातील पात्रांशी समरस होण्याची संधी सर्वाना मिळायची.त्या कथेतील पात्रे जणू आपल्या समोरच वावरताय या थाटात मांडणी करण्याची दादांची हातोटी यामुळे पोथी ऐकतानी सारा श्रोतृवर्ग त्यात गुंतून जायचा.क्षणभर आयुष्यातील समस्त चिंताचा विसर पडायचा.दिवसभराचा शिणभाग हलका व्हायचा.आणि ओढ़ लागायची उद्याच्या अध्यायाची.
      पोथी वाचाताना प्रत्येक विषय समजाउन सांगण्याची  दादांची एक शैली होती.त्यामुळे प्रत्येक विषय ऐकणार्याला सोपा अन आपला वाटायचा.दादांच्या आवाजातही एक विलक्षण प्रभाविपणा होता.त्यामुळे भारदस्त पण मृदु आवाजामुळे तो आवाज कानात भरुन रहायाचा.
  गावात पोथी चालू असताना सूतक पडले की दादांना पोथी वाचता यायची नाही आणि मग त्यांच्याजागी बसून पोथी वाचण्याची हिम्मत कोणात नसायची पण नाइलाजाने कस तरी तेवढे दिवस उरकावे लागायचे.
पोथी आणि दादा हे जणु समिकरणच झालेले.पोथीबरोबर हरिपाठ, काकड़ आरती, भजन,कीर्तन यात सहभाग तर असायचाच पण पोथीवाचन हा विषय आला की मग कुणाच्याही ओठावर एकच नाव येणार!
  आणि आजही प्रत्येकाच्या ओठावर ते एक नाव आणि एक अलौकिक हळहळ आहे. शेवटी काय प्रत्येकाला च त्या विश्वनियंत्याकडे एक दिवस जीवनाचा हिशोब द्यायला जायचेच आहे.कोणी जीवनाची पोथी वाचतो तर कोणाचे जीवनच एक पोथी बनून जाते.
-राजेश खाकरे

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...