फक्त एकच प्रॉब्लेम आहे...


फक्त एकच प्रॉब्लेम आहे...

        या जगातील गमतीची गोष्ट काय आहे माहितेका....या जगातल्या प्रत्येकाला एक प्रॉब्लेम आहे, जो त्याला दुःखी करत असतो....तुम्हाला कधी वेळ मिळाला ना तर एक काम नक्की करा ज्याला तुम्ही सुखी मानता ना त्याला जाऊन भेटा, चांगल्या तासभर गप्पा मारा, बोलता बोलता तो म्हणेल, "काय सांगू तुम्हाला, सर्व व्यवस्थित आहे हो देवाच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने, पण फक्त "हा" एक प्रॉब्लेम आहे नाहीतर, माझ्यासारखा सुखी कोणी या जगात नसता"
         आणि मग त्या प्रॉब्लेम चे चांगले लांबलचक रडगाणे तुमच्यासमोर गाणार.. तुम्ही कोणत्याही व्यक्तीला भेटा त्याला एक असा प्रॉब्लेम नक्की आहे जो त्याला सुखाने जगू देत नाही, आता ह्या प्रॉब्लेम ची काही ठराविक साईज नाही मात्र तो मोठा प्रॉब्लेम आहे असेच प्रत्येकाला वाटत असते, कुणाला कशाचा प्रॉब्लेम असेल याचाही काही नेम नाही, कुणाला पैसे नाही हा प्रॉब्लेम असेल तर कुणाला पैसे कसे सांभाळायचे हा प्रॉब्लेम असेल, कुणाला मुलगा नाही हा प्रॉब्लेम आहे तर कुणाला जास्त आहेत हा प्रॉब्लेम, कुणाची एखादी इच्छा सफळ संपूर्ण होत नाही म्हणून दुःखी असेल, तर कुणी कशामुळे.
         मला तर हा भगवंत मोठा कलाकार वाटतो, तो आमची गंमत कुठे तरी गुपचूप बसून बघत असावा, की बघू आता हा काय करतो, कधी तर असं वाटतं की त्या देवाला जणू कुणाला सुखाने जगू द्यायचे नसावे, कारण त्यांनी कुणाच्या बापाला सोडलेले नाही, पैसेवाला सुखी असेल असे समजून आम्ही जेव्हा पैशावाल्यांच्या जीवनाकडे बघतो तर त्यांचे तर वेगळेच प्रॉब्लेम आम्हाला दिसतात , त्यांना अन्न पचवायला रोज फिरत बसावे लागते (हा पण एक मोठा प्रोब्लेमच आहे)
         "मी 100% सुखी आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही" असे छातीठोकपणे म्हणणारा मला तरी अजून कोणी भेटला नाही. म्हणजे प्रत्येक जण आपल्या "गन-गणीत" आहे, आणि हि गनगण (प्रॉब्लेम) काही आयुष्यभर सुटत नाही, कारण एक प्रॉब्लेम सुटला कि दुसरा हजर असतो,
        खरं तर काय आहे, काही प्रॉब्लेम हे मुळात प्रॉब्लेम नसतातच फक्त आपण त्याच्याकडे त्या नजरेने बघायला हवे, प्रॉब्लेम आम्हांला खरं तर मजबूत बनवतो, आम्हांला सशक्त बनवतो, आम्हांला लढायला शिकवतो, आपल्या-परक्याची जाणीव करुन देतो, प्रॉब्लेम मध्ये आम्ही जगाकडे एका       वेगळ्या नजरेने बघायला शिकतो,
       बहुतांशी प्रॉब्लेम, समस्या या मानसिक असतात, प्रॉब्लेम काही आमच्या अंगावर रोड रोलरप्रमाणे धावून येत नाही, तरीही आम्ही घाबरून जातो, खचून जातो, आता काय होईल या विवंचनेत राहतो,
हे जग ज्या ईश्वराने निर्माण केलंय तो काही मूर्ख तर नाहीच, तो प्रॉब्लेम हि आमच्या भल्यासाठीच देत असणार, नाहीतर त्याची आणि आमची काही पुरानी दुष्मनी तर नक्कीच नाही, कुंतीमातेने ईश्वराला म्हटले की "देवा मला दुःख दे, कारण दुःखात मला तुम्ही आठ्वता, मला शक्ती मिळते."
आमच्यात एवढी हिंमत तर नाही तसे काही म्हणायची पण आम्ही दुःखाला, प्रॉब्लेम ला एवढं म्हणू शकतो, की हे दुःखा तू ये, तुझे स्वागत आहे, तू माझ्याकडे आला आहेस याचा अर्थ हाच कि भगवंत नक्कीच माझ्यासाठी काही छान घडवत आहे…!”
     आणि हा दृष्टिकोन ठेऊन आम्ही जर प्रॉब्लेम ला सामोरे गेलो तर प्रॉब्लेम आम्हांला चावणार नाही, आणि मग आम्ही म्हणू शकू, "माझ्या आयुष्यात ही एक प्रॉब्लेम आहे, पण तो प्रॉब्लेम माझे आयुष्य अस्वस्थ करत नाही, प्रॉब्लेम काय आहे माहितेका दुःख आता मला पहिल्यासारखी चावत नाही...!
© राजेश खाकरे
Mo 7875438494
rajesh.khakre@gmail.com

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...