कवितेचे सिझर

"कवितेचे सिझर"

नुसते यमक जुळवून कविता लिहू नये
प्रसवू द्यावी कविता तिचे सिझर करू नये

कवितेतून प्रकटावा भाव कवीच्या मनातला
हृदयातुन निघावी अन भिडावी थेट हृदयाला
शब्दांचा फाफट पसारा मांडत बसू नये
प्रसवू द्यावी कविता तिचे सिझर करू नये

आतून यावी कविता अन उतरावी कागदावर
अधिराज्य गाजवावे तिने वाचकाच्या काळजावर
कुणा आवडो ना आवडो त्याची पर्वा करू नये
प्रसवू द्यावी कविता तिचे सिझर करू नये

कविता एक आनंद, अन सोहळा स्व-आनंदाचा
जन्म देऊन बाळाकडे एकटक बघणाऱ्या आईचा
हा अलौकिक आनंद सोहळा कृत्रिम करू नये
प्रसवू द्यावी कविता तिचे सिझर करू नये

संख्येनी गणली जात नाही ऊंची कवीपणाची
एक वेगळीच ओळख असते कवीत्वाच्या मनाची
विस्मरण झाले कधी तर केशवसुता विसरु नये
प्रसवू द्यावी कविता तिचे सिझर करू नये
©राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४




No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...