कुठं गेला रे पावसा (चारोळ्या-बिरोळ्या-३३

चारोळ्या~बिरोळ्या - ३३

कुठं गेला रे पावसा
आता तरी ये ना घरी
पिके गेली वाळून
दुःख शेतक-या उरी
✍🏻 राजेश खाकरे

किती बघावे वरती
जीव होतो खालीवर
कुठे गेला रे पावसा
आता ये ना धरेवर
✍🏻 राजेश खाकरे

तुझं दर पावसाळी
असं दडी मारून जाणं
कुठं गेला रे पावसा
नशिबी देऊन उन्ह
✍🏻 राजेश खाकरे

माय राबते शेतात
बाप मनालाच खातो
कुठं गेला रे पावसा
असं काहून करतो
✍🏻 राजेश खाकरे

सुकली सारी सरकी
तुरीचा पालापाचोळा झाला
उभ्या बाजरीच्या कणसा
एक दाणा नाही आला
✍🏻 राजेश खाकरे

कुठं गेला रे पावसा
असं मध्यात सोडून
हिरव्यागार शिवाराचं
स्वप्न पायदळी तुडवून
✍🏻 राजेश खाकरे

दुष्काळ हा दरसाल
माझ्या भाळी लिहिलेला
कुठे गेला रे पावसा
सोडून तुझ्या लीला
✍🏻 राजेश खाकरे

विहीर पडली कोरडी
कोरड पडली घशाला
कुठे गेला रे पावसा
दुःख ठेऊन उशाला
✍🏻  राजेश खाकरे

केली सुरवात भारी
पिके उगली जोमात
कुठं गेला रे पावसा
त्यांना टाकून कोमात
✍🏻 राजेश खाकरे

पावसाचे नाव घेता
अण्णांच्या डोळा येते पाणी
कुठं गेला रे पावसा
तुझा पत्ता सांगेना कोणी
✍🏻 राजेश खाकरे

असशील तेथून परत ये
तुला रागावणार नाही कोणी
कुठे गेला रे पावसा
सोडून डोळ्यामध्ये पाणी
✍🏻 राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
दिनांक: ५ ऑक्टोंबर २०१८

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...