मनुष्य गौरव दिन

--------------------------------------------------
१९ ऑक्टोंबर, स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्मदिवस. संपूर्ण विश्वातील स्वाध्यायी हा दिवस मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात. पांडुरंगशास्त्री यांचे संपूर्ण नाव पांडुरंगशास्त्री वैजीनाथशास्त्री आठवले. स्वाध्यायी त्यांना आपले मोठे बंधू या नात्याने दादाजी म्हणतात. दादांचा जन्म दिनांक १९ ऑक्टोंबर १९२० ला रायगड जिल्ह्यातल्या रोहा या गावी झाला. दादांनी उभा केलेला स्वाध्याय परिवार आणि स्वाध्याय विचार आज विश्वातल्या कानाकोपऱ्यात गेला आहे.त्यांच्या ९७ व्या जन्मदिवासानिमित्त ही भाववंदना
--------------------------------------------------
मनुष्य गौरव दिन
"केवळ दोन पायावर चालतो म्हणून कुणी माणूस होऊ शकत नाही, जर तसे असेल तर कावळा ही दोन पायावर चालतो मग त्याला पण माणूस म्हणणार का..? माणूस कुणाला म्हणायचे हा मोठाच प्रश्न आहे, प्रत्येक पशु पक्षी प्राण्याला तर माणूस म्हणता येत नाही, म्हणजे माणसाचे काही वेगळेपण आहे, त्याची काही वेगळी ओळख आहे. केवळ जगतो, श्वासोच्छवास करतो म्हणूनही कुणाला माणूस म्हणता येत नाही. माणसाला भगवंताने काही विशेष बनवले आहे." दादा जेव्हा समोर बसलेल्या विशाल जनसमुदायासमोर ह्या ओळी उच्चारतात तेव्हा ते शब्द प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतात. ते केवळ शब्द राहत नाही तर एखाद्या मंत्राप्रमाणे ते माणसाच्या मन बुद्धीत संचारीत होतात.
माणूस स्वतः बद्दल  विचार करायला लागतो. मी एक माणूस.. खरंच मी माणूस आहे म्हणजे नेमके काय आहे.? मला माणसाचे शरीर मिळाले म्हणून मी माणूस आहे, मी संसार करतो म्हणून माणूस असेन तर पशु पक्षीही आपल्या पिलांना जन्म देतात, त्यांना खाऊ पिऊ घालतात, त्यांचा सांभाळ करतात.सृष्टीतील इतर प्राण्यांपेक्षा माझ्यात काय विशेष आहे म्हणून मी माणूस आहे? मी जर माणूस आहे तर मी माणूस म्हणून जगतो का? माणूस म्हणून वागतो का? माझ्यात माणूसपण आहे का.? आणि तिथून सुरु होतो माणसाचा स्वतः विषयीचा अभ्यास.. स्वाध्याय.
दादा समजावतात की, "ज्याच्यात अस्मिता, कृतज्ञता,आणि भावमयता आहे तोच खरा माणूस आहे". माणसाचा स्वतः बद्दलचा स्वाभिमान म्हणजे अस्मिता, केलेले प्रेम आणि उपकार यांची जाणीव म्हणजे कृतज्ञता, आणि दुसऱ्याकडे, माणसाकडे, सृष्टीकडे भावपूर्ण नजरेने बघण्याची क्षमता म्हणजे भावमयता. या गोष्टी जर माणसात नसतील तर त्याला माणूस म्हणता येणार नाही. आज आपण बघितले तर आज माणसाकडे या तिनही गुणांचा काही अपवाद सोडले तर अभावच दिसतो. समाजात बघितले तर पद, प्रतिष्ठा आणि पैसा या तीन गोष्टीलाच जास्त महत्व आहे. प्रत्येकजण या गोष्टीमागे धावतो आहे. स्वतः चे अस्तित्वच हरवून गेले आहे. माणूस मोठा का तर त्याच्याकडे पैसा आहे म्हणून मोठा, पद आहे म्हणून मोठा, प्रतिष्ठा आहे म्हणून मोठा, मात्र यात कुठेतरी माणूसपण हरवून गेले आहे. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो कमी पैशावाल्याला तुच्छ समजतो, तर त्याच्यापेक्षा अधिक पैसेवाला दिसला की स्वतः ला लहान समजतो, हेच पद, प्रतिष्ठेच्या बाबतीतसुद्धा लागू होते. माणूस माणूस म्हणून मोठा आहे असे दिसत नाही. तर त्याच्याकडे काय आहे, यावरून माणसाची किंमत ठरते. आणि हीच बाब दादांजीना खटकत होती. त्यांना वाटायचे कि, पद, प्रतिष्ठा आणि पैसा यांच्याशिवाय माणसाचे काहीच मूल्य नाही का..? दुधात साखर, केशर, इलायची, खोबरं घातले तर दुधाची किंमत वाढेलच पण दुधाला स्वतः ची पण एक किंमत आहे, तीच म्हणजे अस्मिता किंवा आत्मगौरव. आणि हा आत्मगौरव माणसाला उभा करतो, त्याला शक्तिशाली बनवतो. माणूस हा न्यूनगंड, भयगंड आणि अहंगंड या तीन गंडानी ग्रस्त होतो म्हणून त्याचा विकास होत नाही हे फ्राईडने सांगितले होते. ज्याच्याकडे काही नाही त्याच्यात न्यूनगंड येतो, ज्याच्याकडे काही आहे तो अहंगंडाचा शिकार बनतो, माझ्याच्याने होईल का, मला जमेल का ही भीती भयगंडाला जन्म घालते. या मानसशास्त्रावर दादांनी तोडगाच शोधून काढला. सामान्यातल्या सामान्य माणसात दादांनी अस्मिता उभी केली. दादांनी समजावले कि, या सृष्टीचा पालनकर्ता भगवंत तुझ्या शरीरात येऊन बसला आहे." सर्वस्यच्याहं हृदिसान्निविष्टो" असे गीतेत स्वतः च भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. आणि जर या सृष्टीला चालविणारा, तसेच माझे शरीर चालविणारा भगवंत जर माझ्यासोबत असेल तर मग मी छोटा कसा असेल? मला दोन शर्ट कमी आहेत म्हणून मी छोटा नाही, मी मोठयांचा (भगवंताचा) आहे म्हणून मी मोठा आहे. त्यामुळे माणसात आत्मगौरव निर्माण झाला.त्याचा न्यूनगंड गळून पडला. भगवंतावर प्रीतीतून भक्ती निर्माण झाली. भगवंतावर बौद्धिक प्रेम निर्माण झाले. मी भगवंतांमुळे मोठा आहे त्यातून अहंगंड गळाला, आणि भगवंतच माझ्यासोबत आहे, ही जाणीव झाल्याने भीती निघून गेली.
मला जसे देवाने निर्माण केले आणि तो माझ्यासोबत माझ्या हृदयात राहतो आहे, माझे जीवन चालवतो आहे, तसाच तो भगवंत दुसऱ्यात पण आहे म्हणजे त्याचा आणि माझा काही संबंध आहे, ही जाणीव म्हणजे परसन्मान. आत्मगौरव आणि परसन्मान मिळून मनुष्य गौरव तयार होतो. दादा आयुष्यभर मनुष्य गौरवासाठी झिजले, मनुष्य गौरव हे जणू स्वाध्यायाचे दुसरे नावच आहे. माणूस चांगला बनावा, माणूस कृतज्ञी बनावा, लाखो लोकांचा एक परिवार बनावा, हे स्वप्न दादाजींने बघितले, त्यासाठी झिजले आणि साकार केले.
स्वाध्याय म्हणजे चांगले जीवन, आनंदी जीवन आणि प्रभूला आवडेल असे जीवन जगण्याची पद्धती. स्वाध्याय म्हणजे स्वतः चे अध्ययन, स्वतः च्या जीवनविकास, स्वाध्याय म्हणजे निःस्वार्थ प्रेम करण्याचा अभ्यास, स्वाध्याय म्हणजे दिव्यात्वाचा ध्यास, स्वाध्याय म्हणजे एक जीवनवृत्ती, स्वाध्याय म्हणजे एक विचारप्रवृत्ती, स्वाध्याय म्हणजे एक संस्कृती, स्वाध्याय म्हणजे सदवृत्ती, स्वाध्याय म्हणजे एक विश्वकुटुंब, स्वाध्याय म्हणजे प्रभूप्रेमरती,
दादांनी स्वाध्यायाचे रोपटे लावले, त्याला प्रेम आणि विचारांचे खतपाणी घातले. केवळ विचार देऊन दादाजी थांबले नाहीत तर ते विचार घेऊन हार्ट टू हार्ट(heart to heart) आणि हट टू हट (Hut to Hut) गेले, माणसाला उभे केले.माणसाला घडवले त्रिकाल संध्या,स्वाध्याय केंद्र, युवा केंद्र, बाल संस्कार केंद्र, युवती केंद्र, महिला केंद्र,माणार्ह केंद्र,प्रवचन केंद्र आदी केंद्रातून ज्ञान आणि भक्ती फुलवली तर योगेश्वर कृषि, निर्मलनिर, वृक्षमंदिर, हिरामंदिर, मत्स्यगंधा, भावफेरी,भक्तिफेरी,तीर्थयात्रा, एकादशी, व्रती, आदी विविध प्रयोगातून स्वाध्यायी कर्मभक्ती करू लागले. माणसाचे माणसाशी, माणसाचे सृष्टीशी, आणि माणसाचे भगवंताशी नाते दादांनी जोडले.
या जगात आज बघतो तेव्हा, सर्वत्र लाचारी दिसते, मागणी दिसते, स्वार्थ दिसतो, कुरघोडी दिसते, भ्रष्टाचार, अप्रामाणिकता दिसते, कुटुंबव्यवस्था ढासळताना दिसते, माणुसकी परेशान दिसते, मात्र त्याचवेळी नजर दादांच्या स्वाध्याय परिवारावर आणि स्वाध्याय कार्यावर जाते, मला निःस्वार्थ प्रेम दिसते, दुसर्याबद्दल भाव दिसतो, जगण्याचा आशावाद दिसतो.माझा नातेवाईक कामाशिवाय मला भेटायला येत नाही पण दादांचा स्वाध्यायी येतो, त्याला माझ्याकडून काहीच नको असते, आभाराचीही अपेक्षा नसते. तो काही मिनिटे येतो, मला जीवन समजावून जातो. माझ्यात ऊर्जा पेरून जातो. जगाकडे बघितले आणि स्वाध्याय परिवाराकडे बघितले तर अगदी विरोधाभास वाटावे असे चित्र दिसते. आज लाखोंच्या संख्येने स्वाध्यायी आमच्या अवतीभवती प्रेम आणि विचार वाटत फिरतात. ते आम्हाला ठळक वाटावे असे दिसत नाही, कारण ते प्रचार करत नाही, पोस्टर लावत नाही, जाहिरात करत नाही. मात्र ते खऱ्या अर्थाने मनुष्य गौरव निर्माण करताहेत.ते सरळ हृदयात शिरतात आणि माणसाला हृदयापासून बदलून टाकतात. माणसात खऱ्या अर्थाने मनुष्यगौरव निर्माण करणाऱ्या पूजनीय दादांजीना ह्रदयपूर्वक वंदन..!
-राजेश खाकरे
औरंगाबाद
मो.७८७५४३८४९४

सरपंच थेट निवड

सरपंच थेट निवड

निकालाचा आनंद अजून सदाशिवरावांच्या चेहऱ्यावरून झळकतच होता. आज दुपारीच ग्रामपंचायत इलेक्शनचा निकाल जाहीर झाला होता. जनतेतून थेट निवडणुकीतून सरपंच म्हणून सदाशिवराव निवडून आले होते.यावेळी पहिल्यांदाज जनतेतून थेट सरपंच निवड झालेली असल्याने निवडणुकीचे आणि राजकीय समीकरणं बऱ्यापैकी बदलून गेलेले होते. सदाशिवराव आपल्या खुर्चीत बसून मागील 15-20 दिवसांच्या घटनाक्रमाबद्दल विचार करत होते. आज ते सरपंच झाले होते. खरं तर ते खूप खुश होते.मात्र क्षणभर त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. सुनीताताई सदाशिवरावांच्या सुविद्य पत्नी, हातात चहा घेऊन त्यांच्याकडे बघत होत्या. तिकडे सदाशिवरावांचे लक्षच नव्हते.
"अहो, सरपंचसाहेब, चहा घ्या..!" सुनीताताईंच्या या आवाजाने ते थोडेसे दचकलेच.! भानावर येऊन हसत हसत म्हणाले,
"आता हे काय नवीन..!"
"अहो नवीन म्हणजे काय, तुम्ही आता सरपंच झालात न्हवं..आता सवय केली पाहिजे!" हसत हसत सुनीताताई बोलल्या आणि दोघेही खळखळून हसले. दोघांच्याही चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.
"अहो, एक ईचारू का..?" सुनीताताईने कुतूहलाने विचारले.
"काय.?"
"ते निकाल लागल्यावर 10-15 दिवस सगळ्या सदस्याला घेऊन कुठे टूरला जावे लागत असते, ते आता उद्या जाणार का..?" सुनीताताईंनी पृच्छा केली.
"अगं,कसली टूर म्हणते तू..?
"ते नाही का मागच्या वेळी ते गणपतराव सरपंच झालते तव्हा, ते सर्व 15 दिवस सगळ्या निवडून आलेल्या सदस्याला घेऊन कुठेतरी कुणाला माहीत नाही अशा ठिकाणी घेऊन गेलते म्हणे, गंगू सांगत होती की, त्यांना कुठल्या चांगल्या हॉटेलात जेवणखाण, राहणं ते सगळं करावं लागतं असं.." सुनीताताईने जरा सविस्तर सांगितले.
सदाशिवराव गालातल्या गालात हसले, आणि म्हणाले,
"तीच तर खरी मेख आहे आता..!"
सुनीताताईची काहीशी न समजल्यासारखी मुद्रा बघून सदाशिवराव म्हणाले,
"अगं, हे बघ पहिल्यांदा काय असायचं कि, निकाल लागला कि ज्याला सरपंच व्हायचं त्याला सगळ्या सदस्याला सांभाळीत बसावं लागायचं अन आत्ता..."
"अहो सरपंच.....!!!" बाहेरून आलेल्या या भारदार आवाजाने सदाशिवरावांचं बोलणं अर्धवट राहिलं आणि सदाशिवरावांनी आवाजाच्या दिशेनं बघितलं.
आवाजापाठोपाठ काही मंडळी आत आली. त्यांच्या हातात एक फुलांची मोठी माळा होती. सुनीताताईने बघितले, ते सर्वजण आज निवडून आलेले सदस्य होते. त्यांनी सोबत आणलेली फुलांची माळ सदाशिवरावांना  घातली. गुलाल उधळला, त्याचवेळी बाहेर फटाक्यांची आतिषबाजी झाली. सदाशिवरावाने सुनीताताईकडे बघून स्मितहास्य केले.सुनीताताईला थोड्या वेळापूर्वी सदाशिवरावांच्या अर्धवट राहिलेल्या वाक्याचा अर्थ समजून गेला. त्यांनाही हसू आवरले नाही.
"सदाशिवराव तुम आगे बढो... हम तुम्हारे साथ है" अशा घोषणांनी परिसर कितीतरी वेळ दणाणून गेला होता.
-राजेश खाकरे
औरंगाबाद
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

शिक्षक दिन

शिक्षक दिन
●●●
आई नंतर बालकाचे जीवन कुणी घडवत असेल तर तो शिक्षक असतो. शिक्षक खऱ्या अर्थाने माणसाचे भवितव्य आणि चारित्र्य घडवत असतो. एखादा कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके घडवतो, अगदी तसेच शिक्षक मुलांना ज्ञान आणि संस्काराचे सिंचन करून घडवत असतो.शिक्षक त्याच्या पूर्ण कौशल्याने कधी प्रेमपूर्वक, कधी धाकाने,कधी आदराने मुलांना घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो.
खरं तर शिक्षक हा पेशा नाही, तर ती वृत्ती आहे, देण्याची वृत्ती. ज्ञान, समाधान, प्रेरणा देण्याची वृत्ती... आणि हे देण्याचे भाग्य खूपच कमी जणांच्या वाटयास येते.काही शिक्षक अगदी मन लावून पूर्ण निष्ठेने आपले कर्तव्य बजावत असतात. मुलांचे जीवन आणि भवितव्य घडविण्यासाठी धडपड करत असतात. आपला विद्यार्थी जीवनात अधिकाधिक उंच जावा, यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात.त्यात त्यांना आनंद तर मिळतोच तसेच आत्मिक समाधानही मिळते. तेच खरे शिक्षक असतात. प्रसंगी पदरमोड करणारे, विद्यार्थ्यांशी एकरूप होणारे, विद्यार्थ्यांची आर्थिक आणि कौटुंबिक स्थिती ओळखून त्यांना परिस्थितीशी लढायला प्रवृत्त करणारे, प्रेमाचा हळूवार हात फिरवून मायेने जवळ घेणारे, प्रसंगी शिक्षाही करणारे, असेच शिक्षक हे खरे शिक्षक असतात. त्यांच्या प्रत्येक कृतीत विद्यार्थ्यांचे भले होण्याची तळमळ सामावलेली असते. मात्र काही शिक्षक असेही असतात, जे फक्त नोकरी म्हणून शिक्षक असतात; केवळ पाट्या टाकण्याचे काम असे शिक्षक करत असतात. त्यांना नुसते दिवस ढकलायचे असतात, असे शिक्षक हे त्यांच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबतच खेळत असतात.आणि त्याच्या अशा कृतीतून ते मोठे सामाजिक आणि नैतिक पातक करत असतात. मला अशावेळी पूज्य साने गुरुजींचे वाक्य आठवते "आज तुम्ही आदर्श शिक्षक असाल किंवा नसाल मात्र तुमच्या वर्गातील मुले तुमच्याकडे एक आदर्श शिक्षक म्हणूनच बघत असतात" हे साने गुरुजींचे वाक्य खूप बोलके आहे. शिक्षकाची जबाबदारी किती मोठी आहे, हे अधोरेखित करणारे आहे.
शाळेत पाऊल ठेवणारा एक निष्पाप बालक हा,घराचा उंबरठा ओलांडून शाळेच्या उंबरठ्यावर आपले पहिले पाऊल टाकत असतो. तो निरागस असतो, जगाच्या हरामखोरीशी, लुच्चेगिरीशी, भ्रष्टपणाशी त्याचा संबंध आलेला नसतो. एखाद्या कोऱ्या काळ्याशार पाटीप्रमाणे तो बालक असतो, त्यावर हळुवार ज्ञान आणि संस्काराच्या रेघोट्या काढून त्याचे सुंदर, आल्हाददायक चित्र शिक्षक काढत असतो, त्यात विविध नितीमूल्याचे रंग भरून ते चित्र अधिकाधिक खुलवण्याचा तो प्रयत्न करत असतो.शाळा संपल्यावर जेव्हा हे चित्र घेऊन विद्यार्थी जगाच्या भाऊगर्दीत शिरतो, तेव्हा शिक्षकाने साकारलेल्या त्या सुंदर चित्राची जपवणूक करणे, ही पूर्णपणे त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी असते.
शाळा संपली म्हणून विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते संपत नाही, उलट ते अधिक घट्ट होते. मुलगा मोठा झाल्यावर बाप जसा त्याचा मित्र बनतो, तसेच शाळेत कडक शिस्तीचे वाटणारे शिक्षक नंतर कुठे भेटले की मित्राप्रमाणे बोलताना बघून आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. त्यावेळी कळते की या वरून नारळाप्रमाणे टणक भासणाऱ्या आवरणाखाली असणारा एक मृदू आणि गोड शिक्षक आपल्याला कधी लक्षातच आला नाही.
आपला एखादा विद्यार्थी जेव्हा एखाद्या मोठ्या पदावर गेल्याचे समजते, तेव्हा शिक्षकाच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक तयार होते, जी त्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा कितीतरी मोठी असते, तो आनंद परमानंद असतो. त्यात असूया नसते तर गर्व असतो, अभिमान असतो. शिक्षकांनी शिकविलेली मुले डॉक्टर बनतात, इंजिनीयर बनतात, संशोधक बनतात, कलेक्टर बनतात, मात्र शिक्षक कायम शिक्षकच असतो, जणू त्याचा तो स्थायीभाव असतो. किंबहुना शिक्षक असणारी व्यक्ती दुसऱ्या पदावर जरी गेली तरी त्यांच्यातला शिक्षक तसाच जिवंत राहतो. राष्ट्रपती पद भूषवूनसुद्धा डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्यातील शिक्षक शेवटच्या क्षणापर्यंत तसाच राहिला. यापेक्षा दुसरे मोठे उदाहरण कोणते असू शकेल.
शाळा,कॉलेज जीवनात कितीतरी शिक्षक आम्हाला शिकवून गेलेले असतात, मात्र तीन चार अशी नावे असतात कुणी 'शिक्षक' शब्द उच्चारला की आमच्या नजरेसमोर ती नावे आणि त्यांचे चेहरे ऊभी राहतात.मला वाटते "शिक्षक दिन" खऱ्या अर्थाने अशा शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
"गु-शब्द स्तवन्धकारास्यात
रु-शब्द स्तनिवर्तक:"
(आमच्या जीवनातील अंधकार जो काढून टाकतो तो गुरु)
असे आपले उपनिषद गुरूंचे यथार्थ वर्णन करतात.
कधी एखाद्या शिक्षकदिनी तुमच्या शाळेतील शिक्षकांना भेटायला नक्की जा..त्यांना सांगा, सर मी तुमच्यामुळे घडलो, तुम्ही मला जीवन दिले...या दोन शब्दांने त्यांचा ऊर अभिमानाने भरून येईल.त्यांचा प्रेमळ हात पुन्हा पाठीवर फिरला की तुम्हाला पुन्हा एकदा विद्यार्थी झाल्यासारखे वाटेल..!
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४


आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...