स्वातंत्र्यवीरांनो, तुम्ही खुश आहात ना???

स्वातंत्र्यविरांनो, तुम्ही खुश आहात ना??? 

१५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे ला शाळेत झेंडावंदन असायचं. भल्या पहाटे आई चुलीवर पाणी तापवायला ठेवायची. आणि आवाज देऊन उठवायची, पहाटेच्या कुडकूडत्या थंडीत अंगावर पाणी घ्यायला एरव्ही जीवावर यायचे मात्र ह्या दिवशी अंगात वेगळाच जोश असायचा.. आदल्या दिवशी शाळेला दुपारून सुट्टी दिली जायची. दुपारी घरी आल्यावर पांढऱ्या शर्ट आणि खाकी पॅन्टला इस्त्री करायची असायची. ही इस्त्री म्हणजे एका पितळेच्या तांब्यात गरम कोळसे घालून सांडसाने (चिमटा) ते कपड्यावर फिरवायचे, यामुळे कपड्यावरच्या आढया निघून जायच्या. अंघोळ करून शर्ट अंगात घालताना अंगावर वेगळेच शहारे येत.
शाळेत या दिवशी कधी नाटक असे, कधी समूहगीत,त्यात एखादे पात्र वाट्याला आलेले असायचे मग त्यासाठी आवश्यक पोशाख, पायजमा, धोतर इत्यादी गावात कुणाकडून तरी मागवून आणायचे हे नियोजनही आदल्या दिवशीच व्हायचे.
भल्या पहाटे अंधुक उजेडातच शाळेच्या दिशेने मित्रांसोबत जाताना किती भारी वाटायचे, आधीच देशासाठी किती किती लोकांनी आपले प्राण वगैरे दिले ते गुरुजी मागच्या १५-२० दिवसापासून रोज रोज सांगायचे, शाळेत चालणारी सांस्कृतिक कार्यक्रम यांची तयारी,लेझीम यामुळे अंगात एक वेगळीच स्फूर्ती चढायची. शाळेत गेल्यावर तिथल्या लाऊडस्पीकरवरून मोठ्या आवाजात चाललेले "मेरे देश की धरती" किंवा "ये वतन तेरे लिये" ऐकले की अंगात काय स्फुरण चढायचे. "भारत माता की जय, वंदे मातरम" म्हणत बंदूक घेऊन शत्रूच्या छाताडात धाड धाड गोळ्या झाडाव्या असे वाटायचे. देशाबद्दल, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, क्रांतिकारक, थोर पुरुष यांच्याबद्दल उरात अभिमान दाटून यायचा. एकदम सुरवातीला दोन चार वाक्य आमच्या नेहमी पाठ असायचे, त्यात "भारत १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य झाला. इंग्रजांनी दीडशे वर्ष भारतावर राज्य केले. स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. इत्यादी" त्यावेळी त्याचा फारसा अर्थ समजायचा नाही. इंग्रज कोण? त्यांनी का राज्य केले काही समजायचे नाही फक्त भाषणात ऐकायचो, सर सांगायचे त्यामुळे ते लक्षात तेव्हढे राहायचे. त्यातून एव्हढेच बालबुद्धीला कळायचे की इंग्रज म्हणजे वाईट लोकं, जे लोकांना त्रास द्यायचे. लोकांना धाकात ठेवायचे. असे वाटायचे. शाळेतील इतिहासाचे पुस्तक वाचताना हळूहळू ते लक्षात यायचे. देशासाठी कोणी कोणी आपले प्राण दिले, कष्ट सोसले ते समजायचे,त्या सर्व ज्ञात अज्ञात लोकांविषयी, क्रांतिकारकाविषयी आदर वाटायचा. त्यासोबत असेही वाटायचे की आता तर आमच्या देशात इंग्रजांचे राज्य नाही. आता आमच्या देशावर आमच्याच लोकांचे राज्य आहे. आता आम्ही आमच्या देशाला एकदम भारी बनवू शकतो. आता आम्हाला कुणी अडवणारा नाही. म्हणजे आता आम्ही स्वतंत्र आहोत. कुणी आमच्यावर आता गुलामगिरी गाजवू शकत नाही. आता आम्ही जे पाहिजे ते करू शकतो. मन आनंदाने भरून यायचे.
आज देशाला स्वातंत्र्य मिळवून ७०-७१ वर्ष होऊन गेलीत म्हणजे दीडशे वर्षातला अर्धा काळ आमच्या देशावर आमच्याच लोकांचे राज्य आहे. या सत्तर वर्षात कितीतरी गोष्टी घडल्या आहेत, चांगल्या-वाईट,भल्या-बुऱ्या. देशाने अनेक  स्थित्यंतरे अनुभवली आहेत. विकासाच्या दिशेने, प्रगतीच्या दिशेने देश झेपावत आहे.
मात्र आजही कधी कधी प्रश्न पडतो की खरंच आम्ही स्वतंत्र झालोय का? स्वातंत्र्याचा अर्थ आम्हाला कळला का? आम्ही तो समजून घेतला का? स्वातंत्र्याचे मोल आम्हांस समजले का? हजारो क्रांतिकारकांनी त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती स्वातंत्र्ययुद्धात दिली, त्यांचे बलिदान आम्ही विसरलो आहोत का? का 15 ऑगस्ट, 26 जानेवारी पुरती आमची देशभक्ती सीमित झाली आहे?
आज समाजात विविध प्रवृत्तींनी जन्म घेतलेला आहे. प्रत्येक माणसात जातीयता भरगच्च भरली गेली आहे. प्रत्येक जाती धर्माला हेच वाटत आहे की मीच श्रेष्ठ आहे. आणि हे सर्व स्वतः ला सुशिक्षित समजणारे लोक आहेत. द्वेष आणि मत्सराने आमची मने बरबटली आहेत. स्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराचार असाच आम्ही घेतलेला आहे. 4-5 वर्षाच्या मुलींवर बलात्काराच्या घटना असोत की भ्रष्टाचारास शिष्टाचार मानणारा आमच्या येथला अधिकारी, पदाधिकारी असो, जाती धर्मात दिवसेंदिवस वाढत जाणारी दरी असो, अनैतिकता आणि अविश्वास यांनी आमच्या सभोवतालचे वातावरण भरून गेले आहे. कधी खूप चीड येते या सर्वांची. सत्ता आणि पैशासाठी लोकांच्या आणि देशांच्या भविष्याशी खेळणाऱ्या राजकारण्यांची लाज वाटते. पैसे देऊन मतदान विकत घेणारे आणि पैसे घेऊन मतदान करणारे आमच्या देशाला कोणत्या ठिकाणी नेऊन ठेवणार आहेत,याचा आम्ही कधी विचार केला आहे काय? आम्ही सुशिक्षित तर झालोत पण सुसंस्कृत नाही. स्वतःचा विचार तर करायला लागलो,मात्र समाजाचा,देशाचा नाही.

२६ जानेवारी,१५ ऑगस्ट रोजी आजही झेंड्याला सलामी देतानी एक विचार मनात राहून राहून येतो. ज्या लाखो लोकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी जीवाचे रान, केले, प्राणांची आहुती दिली, फासावर चढले, स्वतंत्र भारताचे स्वप्न बघितले, पारतंत्र्याची बेडी तोडण्यासाठी तन-मन-धनाने समर्पित झाले. ते आज आकाशात कुठेतरी बसून जेव्हा आमच्याकडे बघत असतील तेव्हा त्यांना नेमके काय वाटत असेल..? त्यांना समाधान वाटत असेल ना...? आपण त्यागाने मिळविलेल्या स्वातंत्र्याचे चीज झाले म्हणून.. ते आनंदी असतील ना आज आमच्याकडे बघून...!! की त्यांना राग येत असेल आमच्यावर...
असा एक बालिश विचार कधी मनात येतो की  १५ ऑगस्ट,२६ जानेवारी या दिवशी भल्या पहाटे गाडीवरून झेंडावंदनला जातानी त्या पुढच्या नाक्यावर कधी अचानक महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक किंवा भगतसिंग, इत्यादिपैकी कुणीतरी अचानक भेटावे, मला त्यांना विचारायचे आहे एकदा,
"तुम्ही खुश आहात ना..?"
- © राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

...आणि दुःख confuse होतं

आणि दुःख confuse होतं

त्रासाने भरलेल्या खोक्यावर
मी "आनंद" असं लिहितो
...आणि दुःख confuse होतं

येणाऱ्या प्रत्येक संकटाला
एक छानशी smile देतो
...आणि दुःख confuse होतं

खरं सांगायचं तर खूप वेळा
मी कोलमडून जातो
सगळं संपलं असं वाटून
अगदी गर्भगळीत होतो
कुठूनतरी देव येऊन
माझ्या हातात हात देतो
...आणि दुःख confuse होतं

संकटाच काय? ती येणारच
आल्यावर थोडं फार छळणारच
आपण स्थिर राहायचं काही काळ
संकटाचं पाणी पाणी होणारच
आलेलं संकट हसता हसता
नकळत नाहीसं होतं
...आणि दुःख confuse होतं

किती दिवसाचं हे आयुष्य
आज ना उद्या संपणारच
अमुक आहे-तमुक नाही
आपलं चालू राहणारच
फाटक्या गोधडीत पाय आखडून
मी सुखाने झोपी जातो
...आणि दुःख confuse होतं

म्हटलं तर जीवन सुंदर
म्हटलं तर वाईट आहे
मग त्याला सुंदर म्हणण्यात
सांगा काय वाईट आहे?
जीवनाकडे बघण्याचा
मी चष्मा विकत घेतो
...आणि दुःख confuse होतं
- © राजेश खाकरे

चारोळ्या बिरोळ्या-३२-पाऊस

चारोळ्या बिरोळ्या-३२
■■ पाऊस ■■
मेघराजाच्या प्रेमाला
येते जेव्हा भरती
हिरवीगार सजते
अखंडित ही धरती

पावसाचे अन धरतीचे
घट्ट किती नाते
धुव्वाधार बरसे तो
ती धरी हृदयाते

पाऊस तो बरसणारा
कधी बेधुंद कधी शांत
कधी लहर वाऱ्याची
कधी उत्साह सर्वांगात

आर्त झालेल्या धरेला
सांगा कोणी शांत केले
कुणी पाऊस म्हणे त्याला
कुणी जीवन नाव दिले

काल एक थेंब
पडला धरणीवर
शहारली धरती अन
डोळे लागले अंबरावर

किती युगांचा ऋणानुबंध
झाला ना कधी कमी
येता हा 'सात' जून
त्याची बरसण्याची हमी

तिने पाहिले स्वप्न वेडे
त्याच्या लवकर येण्याचे
त्यानेही मग ठरवले
तिला थोडे छळायचे

काल उन्हाळा गेला
कुणी महिमा न गाईला
चाहूल नुसती पावसाची
कसा मनात राहिला

आर्ततेच्या उरातूनच
फुटतात धुमारे प्रीतीचे
म्हणूनच होते गाणे
धरती अन पावसाचे

का कधी तो राहिला
अन डोळ्यांतून वाहिला
मनीचा भाव वेडा
पावसापरी साहिला

न बोलता तिला कळाली
त्याच्या प्रेमाची भाषा
मृदगंध पसरला चहूकडे
सांगत धरतीची मनीषा

नाही सतावणे, नाही बतावते
ती तर चाल प्रेमाची
नाही समजणार कुणा कधी ही
प्रीत धरती पावसाची

नको अलंकार नको दागिने
काही ओले थेंब दे
नको विरह, नको दुरावे
पर्जन्याचे देणे दे

तप्त जळाली तुझ्या आठवणीत
तिला जलाचे दान दे
बळीराजाने तुज नभी शोधिले
जगण्याचे त्यास साधन दे

वीज बिचारी उगाच तळपे
धरती-पावसाच्या मिलनाने
ढगांचे ढोल वाजत सुटले
सहन ते न झाल्याने

विजेने मग राग काढला
झाडावर कधी माणसांवर
नाही बघितले पडताना
जातो कोण सरणांवर
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

पुस्तक : माझा मित्र

पुस्तक: माझा मित्र
नमस्कार मित्रांनो,
पुस्तक म्हटले की आपल्याला खुप आनंद होतो. पुस्तक आपला मित्र असतो. तो आपली एखाद्या सख्याप्रमाणे सोबत करत असतो, विविधांगी अनुभव देतो, पुस्तक वाचताना आपण लेखकांच्या भावविश्वाशी समरस होतो. विश्वाचा विसर पाडण्याची प्रचंड क्षमता पुस्तकात असते. सारे विश्व आपल्या विरोधी असतानाही आपण पुस्तकांशी मैत्री करू शकतो. पुस्तक आपला एकटेपणा तर घालवतातच पण त्याच बरोबर एक नवीन शक्तिसंचार, नवीन उत्साह आणि नवीन दिशाही देतात. जीवनात आलेली मरगळ घालवायची असेल तर पुस्तक वाचले पाहिजे, संकटाशी सामना करण्यासाठी मानसिक आणि बौद्धिक तयारी करण्यासाठी सुद्धा पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे. तसेच मनाच्या शांततेसाठी सुद्धा पुस्तक वाचले पाहिजे.ज्यांना ज्ञान कण वेचायचे आहेत त्यांनी तर पुस्तक वाचले पाहिजेच पण ज्यांना काही लिहायचे, व्यक्त व्हायचे, मांडायचे त्यांनी तर पुस्तक वाचलेच पाहिजे. पुस्तक तुमचे अनुभवविश्व समृद्ध करते. कुणीतरी म्हटल्याप्रमाणे " सर्वच अनुभव स्वतः च्या जीवनात घेण्याएव्हढे आपले आयुष्य मोठे नसते, म्हणून आपण इतरांच्या अनुभवावरून पण शिकले पाहिजे..!" प्रत्येक पुस्तक एक अनुभव असतो. तो अनुभव घेण्यासाठी त्या व्यक्तीने सारे आयुष्य खर्ची घातलेले असते. तोच अनुभव एक किंवा दोन दिवसात घ्यायचा असेल तर पुस्तक वाचण्यासारखा सोपा उपाय दुसरा कुठलाही नाही. एकूण काय की माणसाला जगण्यासाठी सुद्धा पुस्तक वाचले पाहिजे म्हणूनच "वाचाल तर वाचाल" असे म्हटले असावे.
राजेश खाकरे

पाऊस आला (बालकविता)

पाऊस आला पाऊस आला
(बालकविता)

पाऊस आला पाऊस आला
ढगांचा गडगडाट झाला
जिकडे तिकडे पाणीचपाणी
मनात हर्ष अपार झाला

पाऊस आला पाऊस आला
सुट्ट्या संपून भरल्या शाळा
किलबिल करी सारी पाखरे
झाडांवरती जमला मेळा

पाऊस आला पाऊस आला
कोकीळ कुहुकुहू गाऊ लागला
गंध मातीचा सवे पसरला
हिरवा अंकुर छान उगवला 

पाऊस आला पाऊस आला
पेरणीचा मौसम आला
लगबग करी धनी घरचा
मैना भाकरी नेई त्याला 

पाऊस आला पाऊस आला
मळभ मनीचा उतरून गेला
हिरवाईने नटली धरती
समृद्धीची किनार त्याला
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...