मिस कॉल (miss call )

मिस कॉल (miss call)
"""""""""""""""""""'""""'"''''''''''''''''''''''''
मिस कॉल मारण्याची कला जेवढी भारतातल्या त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या लोकांना जमते तशी कुणाही खंडातल्या लोकांना जमते की नाही हे एक नवलच आहे. अगदी एखाद्या रुपयात साऱ्या महाराष्ट्राला फोन लावून ही मिसकॉल मारणारी मंडळी सहज बोलू शकते.फ़ोनचे कॉल रेट वाढले की घटले याच्याशी ह्यांना काही देणे घेणे नसते. खरं तर मिसकॉल म्हणजे काय तर सुटलेला कॉल, जो बराच वेळ वाजला पण उचलता न आल्याने मिस झाला. परंतु आमच्याकड़े मिसकॉल ची स्वतंत्र व्याख्याच बनली आहे.
"आपले पैसे खर्च होऊ न देता, आपलेच काम जरी असले तरी, समोरच्याला कॉल करावयाला लावण्याची अद्भुत कला म्हणजे मिसकॉल होय"
काही जण मिसकॉल मारतानाही खूपच कंजुषी करतात. "ट्रिंग ट्रिं...." इतका छोटासा मिसकॉल मारतील.कधी कधी तर समोरच्याला ते कळत सुद्धा नाही की कुठला मिसकॉल आला ते...यात दूसरी एक पटाईत मंडळी अशी आहे की ते अर्धा मिसकॉल मारतात.म्हणजे साधारणतः 30 सेकंद बेल वाजते फोन ची..आणि फोन उचलेपर्यंत 15-20 सेकंद लागतातच. ते हुशार 10-15 सेकंद बेल वाजू देतात आणि कट करतात. नेमका फोन उचलायची वेळ आणि कट होण्याची वेळ एकच होते.फोन उचणाऱ्याला असे वाटते की आपण फोन लेट उचलला,त्यामुळे कट झाला. आणि तो आपसुक रिटर्न कॉल करतो.
"मिस कॉल मारने हा गर्लफ्रेंड चा मुलभुत हक्क व् अधिकार आहे.आणि तो ती प्रत्येकवेळी बजावते" असा सार्वत्रिक अनुभव आहे. स्वतः हा फोन करुन बोलत असणारी गर्लफ्रेंड मिळने हा या जगातला जीवंत स्वर्ग आहे आणि असा कुणी लाखात एखादा पुण्यवान असेल की नसेल ही जरा शंकाच आहे.आणि अशा मिसकॉल मारण्यामुळेच कित्येक देशोधडीला लागलेल्या "प्रियकरांना तारण्यासाठी 'मरो मत,JIO" ही योजना आणली असल्याचे आमच्या ऐकीवात आहे. आणि आम्हाला तेव्हा तर चक्कर येता येता राहिली जेव्हा एक मित्राने सांगितले की,त्याची मैत्रीण jio च्या सीम वरुन सुद्धा मिसकॉल मारते.!
एखाद्या ऑफिसातल्या शिपाई किंवा कनिष्ठ स्तरीय कर्मचाऱ्याने त्याच्या बॉस ला मिसकॉल मारला तर एखादेवेळी समजू शकतो,पण असे कित्येक कंजुष बॉस आमच्या पाहण्यात आहे, जे आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचार्याला मिसकॉल करतात. ही मानसिक गरीबीच म्हणावी लागेल.
परवा एका मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी एका ठिकाणी बोलणी सुरु केली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना मुलांच्या वडिलांचा मिसकॉल आला तेव्हा त्यांना त्यांच्या कंजूषपणाची चौकशी करायची सुद्धा गरज पडली नाही,आणि ते लग्न मोडले नसते तरच नवल...
आता मिसकॉल मारणाऱ्या व्यक्तीला तुमच्याशी काही काम असतेच असे नाही.तर जास्त वेळा त्यांचेच काही काम असते. बरेच फोनशुर (दानशुर म्हणतात तसे ) लोक प्रत्येक मिसकॉल ला रिटर्न कॉल करत असतात.तर काहीनी हे ठरवून टाकलेले असते की जर समोरच्याला खरच काही काम असेल तर तो direct कॉलच करेल मिसकॉल कशाला मारेल.?
एखाद्या कठिण प्रसंगी अथवा बॅलन्स नसताना हाच मिसकॉल वरदान ठरतो हे हीं विसरुन चालणार नाही.मात्र मिसकॉल चा मोठ्या प्रमाणात miss use करणारी लोकच जास्त झाली आहे.
"आपण ज्याला मिसकॉल मारतो आहे त्या व्यक्तीला काही कमी नाही आणि सर्व दारिद्र्य जणू आपल्याच पदरात पडले आहे" असा एक प्रचंड गैरसमज मिसकॉल मारणाऱ्यानी करुन घेतलेला असतो. आणि अशा मिसकॉल करणार्याला वैतागूनच "कशाला मिस कॉल करतो" यासारखी गाणी बनली असावी असे आम्हाला वाटते.
कुणाचा तरी मिसकॉल आल्याने आम्ही तूर्तास आपली रजा घेतो आहे...नंतर बोलूच...
© राजेश खाकरे
Mo 7875438494
http://rajeshkhakre.blogspot.in

(ता.क.: आमचा हा वरील लेख आवडला-बिवडला तर डायरेक्ट कॉल करावा.मिसकॉल मारु नये)

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...