कृष्णा..!

कृष्णा,
तुझ्या जन्माला झालीत पाच हजार वर्षे
आणि कदाचित त्याहून अधिक
पण तू  इथल्या प्रत्येक माणसाच्या हृदयात
राहीला आजही अगदी तसाच..
तू म्हणायचा कि "संभवामि युगे युगे"
तसाच आज कितीतरी युगानंतर तू राहीला
इथल्या मनामनात...
तुला आम्ही किती समजून घेऊ शकलो,
माहीत नाही,
मात्र तुझे जीवन मानवामात्राला आजही समजावते आनंदाचे जगणे
तुझ्या जीवनात तू अगणित प्रसंग झेलले,
मात्र तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य नाही झाले कधी कमी
तू मंजुळ बासरीच्या सुरात गात राहिला जीवनगाणे,
तू जन्मला कारागृहाच्या चार भिंतीत
गर्द अंधाऱ्या-तुफान रात्रीत
मात्र तू नाही रडला कधीच
तू चोरले दूध-दही आणि चोरलेत मनही
तू खेळला, खिलाडू वृत्तीने
तू लढला, श्रेष्ठ योद्धा होऊन
सुदामाच्या मैत्रीने तू मैत्री काय असते, दाखवून दिले
तू सखा बनून अर्जुनाचे सारथ्य केले
नरकासुरांच्या तावडीतून हजारो स्रियांना सोडवून
त्यांना सन्मानाने जगण्यासाठी तुझे नाव दिले
तू द्रौपदीला वस्त्र दिले,
तू गोकुळवासीयांना धारिष्ट्य दिले
तू दाखवले कंसाच्या रूपाने दुष्ट व्यक्ती कधी नसतो आपला नातलग 
'परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम' तू करत आलास आयुष्यभर
तू दिलीस "गीता" मानवामात्राला जीवनमार्गदर्शन करणारी अर्जुनाच्या निमित्ताने आणि बनलास जगद्गुरू खऱ्या अर्थाने..
आजही कृष्णा,
जेव्हा मनाला ग्लानी येते,
संकट जीवनाला व्यापून घेते
तेव्हा तुझा चेहरा दिसतो..
तुझी बासरी दिसते...
तुझी गीता दिसते...
आणि अगणित ऊर्जा मिळते..
जणू नवसंजीवनी मिळते..!
कृष्णा,
तू आजही आमच्या मनात आणि इथल्या चराचरात मला जिवंत दिसतो...!
◆राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४


No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...