आडवाणींचा अंतरात्मा बीजेपीला शाप देणार का...?

आडवाणींचा अंतर्रात्मा बीजेपीला शाप देणार का..?
Writed by -राजेश खाकरे
एखादी व्यक्ती एखाद्या संस्थेसाठी किंवा पक्षासाठी आपली संपूर्ण हयात वेचून त्या संस्थेला किंवा पक्षाला सर्वोच्चस्थानी नेण्यासाठी धडपडली असेल आणि ती संस्था किंवा पक्ष सर्वोच्चस्थानी असताना त्याच व्यक्तीची जर अवहेलना करणार असेल तर यापेक्षा मोठी दुसरी कृतघ्नता कोणती असू शकेल.
जनसंघाच्या स्थापनेपासून 1951 पासून ते बिजेपीच्या स्थापना 1980 पर्यंत आणि बीजेपीच्या स्थापनेपासून आजपर्यंत लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पार्टीसाठी काम करत आहेत. एक वरिष्ठ आणि कणखर नेता अशी त्यांची ओळख आहेच, त्याचबरोबर बीजेपीला राष्ट्रीय पातळीवर एक प्रमुख पक्ष म्हणून ओळख देण्यासाठी ज्या नेत्यांनी प्रयत्न केले आहेत त्यामध्ये लालकृष्ण अडवाणी यांचे नाव अग्रस्थानी आहे. पार्टीचा विस्तार आणि उत्कर्षासाठी त्यांनी आजपर्यंत अनेक महत्वाच्या भूमिका पार पाडल्या. 1951 ते 1957 भारतीय जनसंघाचे सचिव, 1973 ते 1977 भारतीय जनसंघाचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेनंतर 1986 पर्यंत पार्टीचे महासचिव, आणि तीन वेळा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अशी संघटनात्मक जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे, 5 वेळा लोकसभा आणि 4 वेळा राज्यसभेत खासदार म्हणून ते निवडले गेले आहेत.
राममंदिर आंदोलनावेळी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा आडवाणीजींनी काढली, या रथयात्रेने अडवाणी आणि बीजेपीला एक नवी ओळख मिळाली.
2014 ला जेव्हा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली बीजेपीचे पूर्ण बहूमताचे सरकार स्थापन झाले तेव्हा आडवाणींना नक्कीच एखादे चांगले मंत्रिपद देण्यात येईल असे बीजेपीच्या कार्यकर्त्यापासून ते भारतातल्या सर्वसामान्य नागरिकालाही वाटत होते, मात्र तसे घडले नाही, वयाचे कारण देत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आडवाणीसह इतर वरिष्ठ नेत्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले, हा आडवाणीच्या सन्मानाला आणि स्थानाला धक्का होताच मात्र तो त्यांनी सहन केला, किंबहुना त्यांना तो सहन करावा लागला, एकेकाळचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे आडवाणी काहीसे मऊ मऊ झाले, त्यांना पार्टीत आपल्याला आता किती मान आहे हे त्यावेळीच लक्षात आले असावे, ज्यावेळी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीजींचे नाव घोषित करायला त्यांनी विरोध केला होता.
जेव्हा मंत्रीपदापासून आडवाणींना दूर लोटले आणि आडवाणीही मोठ्या संयमाने शांत बसलेले दिसले तेव्हा सर्वानाच असे वाटले की तीन वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी आडवाणीजीं भाजपाचे उमेदवार असतील. राष्ट्रपतींची निवडणूक जवळ यावी आणि अयोध्या प्रकरणात न्यायालयाचा निकाल यावा हा योगायोग असू शकतो मात्र खरी गोष्ट ही आहे की लालकृष्ण आडवाणी यांना राष्ट्रपती करण्याची भाजपची पर्यायाने पंतप्रधान मोदीजी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची खरोखर इच्छा होती का..?
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात गृहमंत्री आणि नंतर उपपंतप्रधान हे पद आडवाणींना देण्यात आले, 2008 ला लालकृष्ण आडवाणींचे नाव एन डी ए ने पंतप्रधान पदासाठी जाहीर केले होते मात्र मोठे पद आडवाणीच्याजणू नशिबात नसावे, बीजेपी सत्तेवर आली नाही आणि पंतप्रधान बनण्याचे त्यांचे स्वप्न तसेच अधुरे राहिले.
आज बीजेपीचा सुवर्णकाळ चालू आहे, न्यायालयाच्या निकालानंतर आडवाणींना राष्ट्रपती बनविणे शक्य होते की नाही हे कायद्याचे जाणकार सांगतील मात्र सर्वसामान्य नागरिक म्हणून जे जाणवते त्यात बीजेपीची तशी इच्छाच नसावी हेच जाणवते, आज मोदीजी आणि अमित शहा यांच्यासमोर बोलण्याची कोणात हिंमत आहे असे दिसत नाही.
मुले मोठी झाल्यावर आईवडिलांची जशी अवहेलना एखादया कुटुंबात केली जाते तसेच काहीसे दिसते आहे.काहीही असो, हा 90 वर्षांचा कणखर तरुण मात्र आज मूक आहे, तो बोलणार नाही, कारण बोलून काही उपयोग नाही हे त्यांना जाणवले असावे, आणि या वयात काही वेगळा मार्गही ते निवडू शकणार नाही हे बीजेपीसह सर्वानाच माहिती आहे.
असे असले तरी आडवाणींचा न्याय बीजेपीने केला का??? त्याचे उत्तर नाही असेच आहे. कोणत्याही पक्ष, संस्था, संघटनेसाठी ज्यांनी अविश्रांत मेहनत घेतली त्यांची कृतज्ञता ती संस्था, पक्ष, संघटना तिच्या चांगल्या काळात नक्कीच व्यक्त करू शकते, आणि ती व्यक्त केली गेलीच पाहिजे, जर लालकृष्ण आडवाणीबाबत बीजेपीने न्याय केला नसेल तर, ते जरीही काही बोलत नसले तरी त्यांचा अंतरात्मा नक्कीच बीजेपीला शाप दिल्यावाचून राहणार नाही...!
काल भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी शपथ घेतली, त्यांच्या निवडीबद्दल कुणाला आक्षेप असण्याचे काहीही कारण नाही. ते एक शांत,संयमी व्यक्तिमत्व आहेत आणि राज्यघटनेचे अभ्यासक आहेत. तसेच बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातुन आलेले रामनाथ कोविंदजी देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहे, हा लोकशाहीचा मोठा विजयच आहे, त्यांना त्यांच्या कार्यकाळासाठी मनापासून शुभेच्छा देतांना काही विचार मनात आले तेच प्रामाणिकपणे या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
-राजेश खाकरे
मो.7875438494
rajesh.khakre@gmail.com
(लेखक हे राजकारणाचे अभ्यासक नाहीत)

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...