शेती आणि शेतकरी

शेती आणि शेतकरी
शेती हा व्यवसाय असेल आणि जर शेतीकडे व्यवसाय म्हणून बघायचे असेल तर आजच्या घडीला शेती हा तोट्याचा व्यवसाय झालेला आहे, आणि कुठलाही व्यवसाय जेव्हा तोट्याकडे वाटचाल करतो, तेव्हा तो व्यवसाय करणाऱ्याचा उत्कर्ष कसा घडवून आणू शकेल.त्यामुळे आम्ही जेव्हा शेतकऱ्याच्या परिस्थितीबद्दल बोलतो तेव्हा या गोष्टीचा विचार होणे तितकेच महत्वाचे आहे.
आमचा देश कृषिप्रधान आहे आणि इथला 70 % टक्के समाज हा शेती व शेतीशी निगडित व्यवसायाशी संबधित आहे,किंबहुना त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे, तरीही शेती व शेतकऱ्यांच्या बाबतीतली स्थिती समाधानकारक नाही. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या आणि कर्जबाजारीपण यामुळे ते जास्तच अधोरेखित होते. सुधारित बियाणे, खते, किटकनाशके, सुधारित शेती औजारे यांमुळे शेती करण्याची पद्धत निश्चितच सुधारली आहे, काही प्रमाणात मानवी श्रमही कमी झालेले आहेत, मात्र त्यामानाने खर्च वाढलेला असतानाही शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही. शेतीमालाला उत्पादन खर्च आणि नफा यादृष्टिने योग्य भाव जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिति कायमस्वरूपी सुधारणार नाही. कारण आज शेतकरी भरपूर पिकवतो आहे, मात्र भाव नसल्याने मातीमोल भावाने विक्री करून त्याच्या हातात काहीही पडत नाही.
जसे शेतमालाला योग्य भाव मिळणे आवश्यक आहे, तसेच शेतकऱ्याला कृषि निविष्ठा वेळेवर व माफक दरात मिळणे आवश्यक आहे. ज्यामध्ये बियाणे, खते, किटकनाशके इत्यादींचा समावेश होतो. शासनाने सर्वच शेतकऱ्यांना शेती उपयोगी औजारे, यंत्रसामग्री ही किमान 50% अनुदानावर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, त्याचबरोबर पिककर्ज हे सर्वच शेतकऱ्यांना सरसकट मिळणे आवश्यक आहे, आजही पिककर्ज मिळवताना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येतात. सधन शेतकऱ्यांनाच पिककर्ज देण्याकडे बँकांचा आणि तेथील अधिकाऱ्यांचा कल दिसतो, परिणामी गरीब शेतकरी सावकारांकडून जास्त दराने कर्ज काढतो ज्याची व्याजासह परतफेड करणे त्याच्या क्षमतेच्याबाहेर असते, यातूनच शेतकरी नैराश्याने ग्रासला जातो आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो, हे चित्र बदलायला हवे.
कर्जमाफी हा तात्पुरता उपाय असू शकतो, मात्र कर्जमाफीने शेतकऱ्यांची स्थिती कायमस्वरूपी कधीही बदलू शकणार नाही, त्यामुळे एक तर शेतकरी एवढा सक्षम व्हावा की त्याला कर्जाची गरजच पडू नये किंवा त्याची कर्ज परतफेड करण्यायोग्य आर्थिक सुबकता बनावी, हे जोपर्यंत होणार नाही आणि तसे होण्यासाठी ठोस पावले जोपर्यंत उचलली जाणार नाही तोपर्यंत कर्जमाफी किंवा कुठली आर्थिक मदत ही फक्त मलमपट्टी ठरेल, जखम तशीच राहील.
शेती हा व्यवसाय निसर्गावर मुख्यतः अवलंबून असल्याने इतर व्यवसायाप्रमाने या व्यवसायाचे ठोकताळे किंवा हमी नाही, म्हणजे अमुक इतका उत्पादन खर्च केला म्हणजे अमुक इतके उत्पादन निघेलच असे सांगू शकत नाही.त्यामुळे या व्यवसायात मोठी जोखिम आहे. दुष्काळ, अपुरा पाऊस, गारपीट, अवकाळी पाऊस,रोगराई, नापिकी ही नैसर्गिक संकटे एका बाजूने तर कमीभाव, दारिद्र्य,महागाई कर्जबाजारीपण,प्रतिकूल शेतकरीधोरण एका बाजूने यामध्ये शेतकरी पुर्णतः भरडला जात आहे.
शेतकऱ्यांनीही परिस्थितिनुरूप काही बदल करणे काळाची गरज आहे. शेतात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, शेततळे, नवीन सिंचन सुविधा, इत्यादींचा प्रभावी उपयोग करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून राहता कामा नये, शेतीसोबत इतर कुठला तरी जोडधंदा असणे आवश्यक आहे, भले तो जोडधंदा शेतीपुरक असेल किंवा नसेल.जोडधंद्यामुळे कमी प्रमाणात का होईना येणारा पैसा तुमच्या इतर कौटुंबिक गरजा भागविण्यास मदत करील.
शेती हा फायद्याचा धंदा कदाचित नसेल ही मात्र शेतीमुळे प्रत्येकाला दोन घास पोटात घालायला मिळतात त्यामुळे तो प्रत्येकाला जगविण्याचा धंदा नक्कीच आहे, आणि त्या बदल्यात समाज,शासन आणि माणूस किती कृतज्ञ आहे..? हा आश्चर्यचकित करणारा प्रश्न आहे. शेतकरी माझ्यासाठी धान्य पिकवतो ही समज ज्या दिवशी पक्की होईल त्या दिवसांपासून कुठल्याही शेतकऱ्याच्या गळ्याला फास लागणार नाही आणि एखाद्या शेतकऱ्याची चूल पेटली नाही असे कधी होणार नाही एव्हढे मात्र नक्की...!
© राजेश खाकरे
मो.7875438494
rajesh.khakre@gmail.com

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...