कविताचोराची कथा

कविता चोराची कथा
एक कविताचोर होता, एक कशाला बरेच आहेत, "कुठल्यातरी कवीने लिहलेल्या कविता कॉपी करून स्वतःच्या नावाने किंवा निनावी पुढे पाठवणारा, भावना, संवेदना कशाशी खातात याचा गंध नसलेला, आणि स्वतः चा मेंदू पिळून काढला तरी त्यातून एखादीही कविता, चारोळी, किंवा गद्य ओळी टपकणार नाही याची जाणीव झालेला, निर्लज्ज श्रेणीत मोडणारा व्यक्ती म्हणजे कविताचोर होय"
         तर असाच एक कविताचोर होता. घरची परिस्थिती बऱ्यापैकी होती. खाण्यापिण्याचे वांधे अजिबात नव्हते. पोशाखही चांगला असायचा. चांगला दहा-बारा हजाराचा अड्रॉइड मोबाईल वापरायचा, फेसबुक, whatsapp यावर तासनतास online असायचा.
           आजकाल whatsaap, फेसबुक यावर कवितेचे बरेच ग्रुप आहेत. त्यात कवी त्यांच्या भावना शब्दरूपाने काव्यरूपाने लिहितात. Whatsaap च्या अशा कवितेच्या, साहित्याच्या बऱ्याच ग्रुपमध्ये तो शिरला, लिंक हा त्याला अशा ठिकाणी घुसण्याचा सोपा मार्ग असायचा. त्याठिकाणी अनेक कवी, लेखक, त्यांच्या, स्वलिखित कविता, चारोळ्या, लेख टाकायचे, तिथे साहित्याचा सोहळा चालायचा. मात्र हा कविताचोर त्याला एखादी कविता आवडली कि लगेच त्याखालचे नाव काढून स्वतःचे नाव टाकायचा आणि इतर मित्र मैत्रिणीच्या ग्रुपवर टाकायचा, कधी त्याच्या गर्लफ्रेंडला पाठवायचा. कधी स्वतः चे नाव नाही टाकले तर निनावी पुढे पाठवायचा..! असा त्याचा उपक्रम ग्रुपमध्ये चालायचा.
            कधी काय व्हायचे कि स्वतःचे नाव टाकून इतर कवीची रचना पुढे पाठवताना जिथून उचलली त्याच ग्रुपवर जायची, मग मात्र मोठा घोळ व्हायचा, मग एडिटिंग करताना झाले, चुकून झाले, असे काहीबाही उत्तर देऊन निसटून जाण्याचा प्रयत्न करायचा. कधी खूपच प्रकरण तापले तर माफी गिफी मागायचा. एखादा admin खूपच डेंजर असला तर रिमोव्ह पण करायचा. मात्र या सर्व गोष्टींचे त्याला काही वाटायचे नाही. (त्याला काहीच का वाटायचे नाही असा प्रश्न तुम्हाला पडला तर वर दिलेली व्याख्या पून्हा एकदा वाचा.)
           असे प्रसंग घडत असले तरी त्याचा तो कविताचोरण्याचा उपक्रम बंद पडला नाही.बरेच दिवस निघून गेले.
             त्यादिवशी रात्री बारा-साडेबारा वाजता एक अँबुलन्स तिचा तो कर्कश आवाज काढत आणि रात्रीच्या शांततेचा भंग करत सिटी हॉस्पिटल मध्ये शिरली. दरवाजा उघडला, त्यातून 5-7 माणसे व 2 स्त्रीया खाली उतरली. स्ट्रेचरवरून पेशन्टला आत नेण्यात आले, डॉक्टरने त्वरित उपचार सुरु केले. काही तपासण्या करणे आवश्यक होते. नातेवाईकांना सांगून डॉक्टरने ईसीजी, ब्लड, सिटीस्कॅन अशा काही तपासण्या केल्या.
           दुसरा दिवस उगवला. पेशन्टच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली होती. पेशन्टला बघायला कविताचोर आला होता. त्यांची जुनी मैत्री असल्याने तो बघायला आला होता. थोड्याफार गप्पा झाल्या. सहज कविताचोराने पेशन्टची फाईल चाळली, त्यात 4-5 रिपोर्ट होते, खिशातला पेन काढून त्याने त्यावर काहीतरी लिहले. थोड्या वेळाने कविताचोर पेशन्टचा निरोप घेऊन निघून गेला. तासाभराने डॉक्टर नियमित तपासणी करायला आले, त्यांनी पेशन्टची फाईल उघडली आणि त्यांच्या डोळ्यासमोर अंधारीच आली.
त्या फाईलमध्ये 4-5 रिपोर्ट होते.
ईसीजी च्या रिपोर्टवर पेनाने लिहलेले होते,
" हि रचना कोणाची आहे माहीत नाही, ज्याची असेल त्याला लाख सलाम."
ब्लड रिपोर्टच्या खालील डॉक्टरचे नाव खोडून टाकलेले होते. आणि पुढे लिहले होते "खरे डॉक्टर असाल तर फॉरवर्ड करा"
सिटीस्कॅन च्या रिपोर्टखालील डॉक्टरचे नाव खोडून कविताचोराने चक्क स्वतः चे नाव घातले होते. आणि पुढे लिहले होते "कमीतकमी 10 ग्रुपवर तरी पाठवा."
©राजेश खाकरे
मो.7875438494
rajesh.khakre@gmail.com

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...