दादाजी तुमचे येणे


दादाजी तुमचे येणे...!

१९ ऑक्टोंबर मनुष्य गौरव दिन.पूजनीय पांडुरंगशास्त्री वैजनाथशास्त्री आठवले (दादाजी) यांचा जन्मदिन. जगभरातील स्वाध्यायी हा दिवस मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात.रोहा (जि. रायगड) येथे १९ ऑक्टोंबर १९२० ला दादांचा जन्म झाला. दादाजींनी ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्या माध्यमातून धर्म आणि अध्यात्म क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडवून आणली. गीता, वेद, उपनिषद यांचे विचार एका वेगळ्या दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक अधिष्ठान ठेवून बुद्धिप्रामाण्यातून समाजापुढे मांडले. धर्म, अध्यात्म हे केवळ कर्मकांड नाही तर, जगातील सर्वच समस्या ह्या धर्माच्या माध्यमातून सुटू शकतात.हे दादाजींनी विविध प्रयोगातून सिद्ध केले, धर्मभेद,उच्च-नीच भाव, जातीयता, have & have not ह्या दऱ्या जर दूर करायच्या असतील तर त्या केवळ देव आणि भक्तीच्या माध्यमातूनच दूर होऊ शकतात, हे दादांनी पटवून दिले. "Bhakti is a social force" भक्ती ही सामाजिक शक्ती आहे. आणि या शक्तीच्या साहाय्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही घडू शकतात ते दादांनी गावागावात शेतकरी बांधवांसाठी १०,००० पेक्षा जास्त योगेश्वर कृषि, सागरपुत्रासाठी मत्स्यगंधा, घरमंदिर, अमृतालयम, हिरामंदिर, आदी प्रयोगातून सिद्ध केले.गीतेच्या"स्वकर्मनां तमभ्यर्च्य सिद्धी विन्दती मानवा:" या श्लोकाचे मूर्तिमंत रूप म्हणजे दादाजींनी दिलेले विविध प्रयोग.
भगवंताकडे भीतीतुन नव्हे तर प्रीतीतून जायला हवे, भगवंताचा आणि माझा काही संबंध आहे, आणि त्याच संबंधातून आम्ही त्याच्याकडे गेले पाहिजे, भगवंतावर बौद्धिक प्रेम निर्माण झाले पाहिजे. आज मंदिरात जाणाऱ्या रांगा बघितल्या तर काहीतरी मागायला, तक्रार करायला, किंवा भीतीतून माणूस देवाकडे जातो आहे, त्यात माणसाचा विकास नाही. या गोष्टी दादाजी नीं समजावल्या. आणि देव, धर्म, संस्कृती यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला.
मी देवाचा आहे, माझ्यासोबत देव आहे, कुठे आकाशात बसून नाही तर माझ्या हृदयात राहून तो माझे जीवन चालवतो, मला सकाळी उठवतो, स्मृती देतो, मी जे अन्न खातो, त्या अन्नाचे पचन कसे करायचे ते मला माहित नाही, रक्त कसे बनते ते मला माहित नाही, मी चालतो बोलतो,हसतो, रात्री दमून भागून थकून अंथरुणावर पडतो, तेव्हा मला शांत झोप लागते, मला झोप काय ते माहीत नाही, मात्र तरीही या सर्व क्रिया होतात, या खरेतर मी करत नाही, कुणी आत शक्ती माझ्यात बसली आहे, ह्रदयात वसली आहे, तीच शक्ती म्हणजे भगवंत. आणि तिच्याप्रति माणसाने कृतज्ञ असले पाहिजे, तिचा आणि माझा काही संबंध असेल तर मी कृतज्ञतापूर्वक त्या शक्तीची आठवण केली पाहिजे, माझ्या मनात त्या शक्तीबद्दल प्रेम निर्माण झाले पाहिजे, दादांनी या गोष्टी समजावल्या आणि माणसाची देवाकडे बघायची दृष्टी बदलून गेली. त्यासाठी दादांनी त्रिकाल संध्या दिली.त्रिकाल संध्या म्हणजे कर्मकांड नाही,तर ज्या भगवंताने मला उठवले,मी खाल्लेले अन्न पचवले आणि मला झोप देऊन शांतीदान दिले,त्याच्याप्रतीची कृतज्ञता व्यक्त करणे आणि या तीन वेळी त्याला नमस्कार करणे म्हणजे त्रिकाळसंध्या.
धर्माचे खऱ्या अर्थाने पुनरुत्थान दादाजींनी केले, तीर्थयात्रा, एकादशी, मंदिर, सण, उत्सव,मूर्तिपूजा यांच्या पाठीमागचे विज्ञान समजावले, एकादशी म्हणजे खाण्यात नव्हे तर चालण्यात बदल, पंधरा दिवसातून एक दिवस देवासाठी, दैवी कार्यासाठी देणे, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये आणि अकरावे मन अशा अकरा गोष्टी या दिवशी भगवंतासाठी वापरणे म्हणजे एकादशी, मूर्तिपूजेचे महत्व सांगतांना दादाजी म्हणतात की, "murtipooja is a perfect science" मूर्तिपूजा ही पूर्ण शास्त्रीय आहे. माणसाचे मन शक्तिशाली (powerful), संवेदनशील(sensitive), आणि प्रगमनशील बनविण्यासाठी मूर्तिपूजेसारखे दुसरे साधन नाही. मूर्तिपूजा म्हणजे केवळ देवाला गंध अक्षदा वाहणे नाही तर तो मनावर केलेला उपचार आहे. मानवी मनात प्रचंड क्षमता आहे. त्याला आपण जसे घडवू, त्यावर जसे संस्कार करू त्याप्रमाणे ते तयार होते, मूर्तिपूजेत चित्तएकाग्रतेला महत्व आहे, आपल्या आराध्य देवतेच्या मूर्तीत चित्त एकाग्र करून त्यातून आपल्या मनावर संस्कार घडत जातात. मानवी मनाच्या विकासासाठी मूर्तिपूजा आहे.
'बेटा तेरा भला हो जायेगा' म्हणत कित्येक भक्तांना आणि आपल्या अनुयायांना गंडवणाऱ्या आजच्या काळात दादाजी गुरु बनून कुणाजवळ आले नाहीत, तर एक मोठा भाऊ बनून आले, त्याला प्रेमाने समजावले कि तू माझा भाऊ आहे, कारण तुझा आणि माझा रक्ताचा नव्हे तर रक्त बनविणाऱ्याचा संबंध आहे. Other is not other, he is my divine brother. दुसरा दुसरा नाही तर तो माझा दैवी भाऊ आहे, याच संबंधातून आज विश्वभरात विशाल स्वाध्याय परिवार उभा झाला आहे. दादांनी कुणाला गंडा दिला नाही किंवा कधी गंडा घातला ही नाही. अमुक एक पोशाख करा, अमुक माळा घाला,असेही कधी सांगितले नाही. "न विचित्र वेषं क्रुयात" या तत्वानुसार दादाजींनी कधी वेगळा वेष धारण केला नाही.दादा सामान्य बनून राहिले. सामान्यांत राहिले आणि त्यांच्याकडून असामान्य काम करून घेतले. गीतेचे विचार घेऊन माणसां-माणसापर्यंत गेले आणि "उद्धरे दात्मनात्मानाम" तुझा उद्धार तुलाच करायचा आहे,सांगून माणसाला उठविले, त्याच्यात अस्मिता जागृत केली. आणि गीतेचे विचार आणि प्रेमाची शिदोरी सोबत घेऊन दादाजी आयुष्यभर झिजत राहिले. परिणामी दादाजींच्या स्वप्नातील एक दैवी परिवार उभा झाला. भावफेरी, भक्तिफेरी, एकादशी व्रती, तीर्थयात्रा यांच्या माध्यमातून गीतेचे विचार घराघरात पोचले. स्वाध्याय केंद्र, प्रवचन केंद्र च्या माध्यमातून गीता, वेद, उपनिषदांचे विचार गाव आणि शहरापर्यंत पोहचले, महिला केंद्रातुन स्त्रीशक्ती जागृत झाली,युवा केंद्राने युवकांना ध्येय आणि दिशा दिली. युवक गीताजयंती वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने गीतेच्या विचारांचा स्वाध्याय करायला लागला, श्रीकृष्णजन्माष्टमी पथनाट्यातून भगवान श्रीकृष्णाला मानवंदना करू लागला.युवती केंद्र,युवाकेंद्रातील चरित्र दर्शन,डिबेट, उत्सव दर्शन, यातून युवकांची बौद्धिक विकास घडवून आला तर सूर्यनामस्कारातून शारीरिक विकासमाणार्ह केंद्रातून वयोवृद्ध आणि तपोवृद्ध व्यक्तींचे विचारमंथन घडवून आणले, बालसंस्कार केंद्रातून बालकांच्या बालमनावर सुसंस्कार सिंचन केले.असे असंख्य अष्टामृत केंद्र आज भारत आणि भारताबाहेरही सुरु आहेत.
स्वाध्याय जीवनपद्धती शिकवतो, जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीत आनंदाने जगायला शिकविणारी शाळा म्हणजे स्वाध्याय. ते एक निराळेच स्पिरिट आहे. स्वाध्याय विचार अंगिकारलेली व्यक्ती भाकरीचा कोरडा तुकडा खाईल मात्र कधी रडत बसणार नाही,त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण खुमारी जाणवेल, ती खुमारी त्याच्यात दादांनी भरली आहे.प्रभुबद्दल निर्व्याज प्रेम आणि विश्वास यातून ती आली आहे. त्याच्या जीवनात सुख आले तरी तो हुरळून जाणार नाही, त्याला तो प्रभूचे प्रेम समजेल, दुःख आले तर तो रडत बसणार नाही. तो दुःखापासून काही शिकेल, त्याला प्रभुचा प्रसादच समजेल, सुख दुःख हे मला अधिक भक्कम करायला भगवंत पाठवतो असेच तो म्हणेल.
भौतिक साधने मिळाल्याने किंवा पैसा आणि वैभव मिळाल्याने माणूस जर सुखी होऊ शकला असता तर सगळे करोडपती आज सुखी दिसले असते,मात्र तसे दिसत नाही. सुख ही निराळीच गोष्ट आहे, ती आणि ते ज्याला समजले तोच खरा सुखी आहे. माणसाकडे एक अशी जीवनदृष्टी असणे आवश्यक आहे;ज्यामुळे तो कुठल्याही परिस्थितीत भक्कमपणे उभा राहू शकेल,तरच तो सुखी होऊ शकेल, समाधानी होऊ शकेल, ती जीवनदृष्टी दादाजींनी स्वाध्याय विचारांतून दिली. माणसाला केंद्रस्थानी ठेवून भगवंत, सृष्टी, आणि संस्कृती यांना एका माळेत गुंफून विविध प्रयोगाद्वारे आणि दैवी विचाराद्वारे, निःस्वार्थ प्रेमाच्या माध्यमातून मानवी जीवनाला अधिकाधिक उन्नत मार्गाकडे दादाजी घेऊन  गेले.खऱ्या अर्थाने मनुष्य गौरव करणाऱ्या आणि साकारणाऱ्या पूजनीय दादांजीना त्यांच्या जन्मदिनानिमित्त ह्रदयपूर्वक वंदन..
-राजेश खाकरे
औरंगाबाद
मो.७८७५४३८४९४

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...