शेती आणि शेतकरी
शेती हा व्यवसाय असेल आणि जर शेतीकडे व्यवसाय म्हणून बघायचे असेल तर आजच्या घडीला शेती हा तोट्याचा व्यवसाय झालेला आहे, आणि कुठलाही व्यवसाय जेव्हा तोट्याकडे वाटचाल करतो, तेव्हा तो व्यवसाय करणाऱ्याचा उत्कर्ष कसा घडवून आणू शकेल.त्यामुळे आम्ही जेव्हा शेतकऱ्याच्या परिस्थितीबद्दल बोलतो तेव्हा या गोष्टीचा विचार होणे तितकेच महत्वाचे आहे.
आमचा देश कृषिप्रधान आहे आणि इथला 70 % टक्के समाज हा शेती व शेतीशी निगडित व्यवसायाशी संबधित आहे,किंबहुना त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे, तरीही शेती व शेतकऱ्यांच्या बाबतीतली स्थिती समाधानकारक नाही. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या आणि कर्जबाजारीपण यामुळे ते जास्तच अधोरेखित होते. सुधारित बियाणे, खते, किटकनाशके, सुधारित शेती औजारे यांमुळे शेती करण्याची पद्धत निश्चितच सुधारली आहे, काही प्रमाणात मानवी श्रमही कमी झालेले आहेत, मात्र त्यामानाने खर्च वाढलेला असतानाही शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही. शेतीमालाला उत्पादन खर्च आणि नफा यादृष्टिने योग्य भाव जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिति कायमस्वरूपी सुधारणार नाही. कारण आज शेतकरी भरपूर पिकवतो आहे, मात्र भाव नसल्याने मातीमोल भावाने विक्री करून त्याच्या हातात काहीही पडत नाही.
जसे शेतमालाला योग्य भाव मिळणे आवश्यक आहे, तसेच शेतकऱ्याला कृषि निविष्ठा वेळेवर व माफक दरात मिळणे आवश्यक आहे. ज्यामध्ये बियाणे, खते, किटकनाशके इत्यादींचा समावेश होतो. शासनाने सर्वच शेतकऱ्यांना शेती उपयोगी औजारे, यंत्रसामग्री ही किमान 50% अनुदानावर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, त्याचबरोबर पिककर्ज हे सर्वच शेतकऱ्यांना सरसकट मिळणे आवश्यक आहे, आजही पिककर्ज मिळवताना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येतात. सधन शेतकऱ्यांनाच पिककर्ज देण्याकडे बँकांचा आणि तेथील अधिकाऱ्यांचा कल दिसतो, परिणामी गरीब शेतकरी सावकारांकडून जास्त दराने कर्ज काढतो ज्याची व्याजासह परतफेड करणे त्याच्या क्षमतेच्याबाहेर असते, यातूनच शेतकरी नैराश्याने ग्रासला जातो आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो, हे चित्र बदलायला हवे.
कर्जमाफी हा तात्पुरता उपाय असू शकतो, मात्र कर्जमाफीने शेतकऱ्यांची स्थिती कायमस्वरूपी कधीही बदलू शकणार नाही, त्यामुळे एक तर शेतकरी एवढा सक्षम व्हावा की त्याला कर्जाची गरजच पडू नये किंवा त्याची कर्ज परतफेड करण्यायोग्य आर्थिक सुबकता बनावी, हे जोपर्यंत होणार नाही आणि तसे होण्यासाठी ठोस पावले जोपर्यंत उचलली जाणार नाही तोपर्यंत कर्जमाफी किंवा कुठली आर्थिक मदत ही फक्त मलमपट्टी ठरेल, जखम तशीच राहील.
शेती हा व्यवसाय निसर्गावर मुख्यतः अवलंबून असल्याने इतर व्यवसायाप्रमाने या व्यवसायाचे ठोकताळे किंवा हमी नाही, म्हणजे अमुक इतका उत्पादन खर्च केला म्हणजे अमुक इतके उत्पादन निघेलच असे सांगू शकत नाही.त्यामुळे या व्यवसायात मोठी जोखिम आहे. दुष्काळ, अपुरा पाऊस, गारपीट, अवकाळी पाऊस,रोगराई, नापिकी ही नैसर्गिक संकटे एका बाजूने तर कमीभाव, दारिद्र्य,महागाई कर्जबाजारीपण,प्रतिकूल शेतकरीधोरण एका बाजूने यामध्ये शेतकरी पुर्णतः भरडला जात आहे.
शेतकऱ्यांनीही परिस्थितिनुरूप काही बदल करणे काळाची गरज आहे. शेतात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, शेततळे, नवीन सिंचन सुविधा, इत्यादींचा प्रभावी उपयोग करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून राहता कामा नये, शेतीसोबत इतर कुठला तरी जोडधंदा असणे आवश्यक आहे, भले तो जोडधंदा शेतीपुरक असेल किंवा नसेल.जोडधंद्यामुळे कमी प्रमाणात का होईना येणारा पैसा तुमच्या इतर कौटुंबिक गरजा भागविण्यास मदत करील.
शेती हा फायद्याचा धंदा कदाचित नसेल ही मात्र शेतीमुळे प्रत्येकाला दोन घास पोटात घालायला मिळतात त्यामुळे तो प्रत्येकाला जगविण्याचा धंदा नक्कीच आहे, आणि त्या बदल्यात समाज,शासन आणि माणूस किती कृतज्ञ आहे..? हा आश्चर्यचकित करणारा प्रश्न आहे. शेतकरी माझ्यासाठी धान्य पिकवतो ही समज ज्या दिवशी पक्की होईल त्या दिवसांपासून कुठल्याही शेतकऱ्याच्या गळ्याला फास लागणार नाही आणि एखाद्या शेतकऱ्याची चूल पेटली नाही असे कधी होणार नाही एव्हढे मात्र नक्की...!
© राजेश खाकरे
मो.7875438494
rajesh.khakre@gmail.com
शेती आणि शेतकरी
निसटते क्षण ...!
निसटते क्षण
क्षण कितीही सुवर्णासारखे असले तरी क्षणच ते निसटतातच ओंजळ रिकामी ठेऊन...आठवणीची कुपी मात्र तशीच राहते अन्तर्मनात...
क्षणाक्षणांनी आयुष्य सरकते, जणू एक एक क्षण निसटत जातो, आयुष्याचा...
बालपनाचा काळ किती सुखाचा असतो ना आमच्या आयुष्यात, मनात असते फक्त एक निष्पाप भावना, ना कसली चिंता, ना कसली पर्वा...बालपण नकळत निसटून जाते, उरतात त्या रम्य आठवणी, मात्र एक बालक प्रत्येक मनात राहतो तसाच जागृत शेवटपर्यंत...
प्रेम एक मधुर भावना...प्रत्येक मनात रुजलेली, उमललेली...कधी ती भावना फूलते, फळते तर कधी तशीच राहते अपूर्ण...अनंत काळापर्यंत...क्षण जातात निसटून अलगद...वेडे मन मात्र राहते गुंतून तसेच अंतिम श्वासापर्यंत...
आई आणि वडील असतात शिल्पकार जणू आमच्या जीवनाचे, आम्हाला घडवत जातात, आमचे पालन पोषण करतात... आम्हाला हवे-नको बघत बघत स्वतः च्या इच्छा-आकाक्षांना घालतात मुरड... आमच्या डोळ्यांत बघतात ती उद्याची उज्वल स्वप्ने...त्यांनी आमच्यावर केलेल्या प्रेम आणि वात्सल्याचे ते क्षण ही अलगद जातात निसटून...आई- वडिलांपासून कधी दूर जातांना मनात उमटते निसटलेल्या क्षणांची भावना...
आमच्या शालेय आणि कॉलेज जीवनात कितीतरी शिक्षक भेटतात आम्हाला...काही मात्र खूपच जवळचे वाटतात...का कुणास ठाऊक आमची काळजी करतात...कधी चुकलो तर प्रेमाने समज काढतात... आम्हाला प्रेरणा देतात...त्यांच्यापासून दूर होण्याची वेळ येते मात्र तेव्हा डोळ्यांच्या कडा नकळत पाणवतात...ह्र्दयाची वीण तुटावी तसाच काहीसा भास होतो...तो दुरावा असह्य वाटतो... ते सहवासाचे क्षण मात्र निसटून गेलेले असतात...
शाळा -कॉलेजात असताना मित्रांसोबत केलेली मौज, मस्ती, जगलेले आनंददायी, वेदनादायी क्षण, घालवलेले अन मनात कायम एक घर करून राहिलेले मित्र-मैत्रिणी... शिक्षण संपून कधी मित्रांचा निरोप घेण्याची वेळ येते...इतके वर्ष कशी संपून गेली ते समजतच नाही... क्षण जातात निसटून...
आपल्या सोबत काम करणारा एखादा सहकारी बदली होऊन दुरच्या गावी जातो किंवा आपल्याला हवेहवेसे वाटणारे आपले वरिष्ठ साहेब बदलून दुसरीकडे जातात... त्यांच्या सोबत काम करताना किती छान वाटायचं ना... मनात काही निसटून गेल्याची भावना उगीच सतावत राहते...मनाला उगीच अस्वस्थ करते...
असे अनंत सुखदुःखाचे क्षण येतात आमच्या आयुष्यात कधी ते तसेच राहावेत असे वाटते, मात्र क्षण आम्हाला पकडून ठेवता येत नाही... ते निसटतातच मनाचा गाभारा रिकामा करून.. मनाची पोकळी रिकामी करून..त्या सुखद क्षणांना आठवतांता डोळ्यांत कधी हळुवार अश्रू येतात तर कधी ओठांवर नुसते स्मितहास्य... आयुष्य म्हणजे दूसरे काय असेल तरी अशाच निसटलेल्या क्षणांची एक जोडलेली साखळी... कुठली कडी हवीहवीसी तर कुठली नकोसी वाटणारी.. जीवनगाडी मात्र पुढे सरकतच असते निसटत्या क्षणांना मागे सोडून...
कधी एखाद्या संध्याकाळी हातात चहाचा कप घेऊन आठवत राहतात यासारख्या कितीतरी गोष्टी...नकळत चहा संपून जातो...हातात रिकामा कप तसाच धरुन नजर दूर कुठेतरी शोधत राहते निसटलेल्या क्षणांना...
© राजेश खाकरे
मो.7875438494
rajesh.khakre@gmail.com
कवितेचे सिझर
"कवितेचे सिझर"
नुसते यमक जुळवून कविता लिहू नये
प्रसवू द्यावी कविता तिचे सिझर करू नये
कवितेतून प्रकटावा भाव कवीच्या मनातला
हृदयातुन निघावी अन भिडावी थेट हृदयाला
शब्दांचा फाफट पसारा मांडत बसू नये
प्रसवू द्यावी कविता तिचे सिझर करू नये
आतून यावी कविता अन उतरावी कागदावर
अधिराज्य गाजवावे तिने वाचकाच्या काळजावर
कुणा आवडो ना आवडो त्याची पर्वा करू नये
प्रसवू द्यावी कविता तिचे सिझर करू नये
कविता एक आनंद, अन सोहळा स्व-आनंदाचा
जन्म देऊन बाळाकडे एकटक बघणाऱ्या आईचा
हा अलौकिक आनंद सोहळा कृत्रिम करू नये
प्रसवू द्यावी कविता तिचे सिझर करू नये
संख्येनी गणली जात नाही ऊंची कवीपणाची
एक वेगळीच ओळख असते कवीत्वाच्या मनाची
विस्मरण झाले कधी तर केशवसुता विसरु नये
प्रसवू द्यावी कविता तिचे सिझर करू नये
©राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
टप टप टप बरसे पाणी (बालगीत)
टप टप टप बरसे पाणी
वारा भर भर गाई गाणी
पाऊस येता गार गार
शिवार होई हिरवेगार
रानामध्ये चरती गायी
कोकीळा गाणे गाई
तुडूंब होई नदी नाले
अंग सारे होई ओले
खेळण्याची मौज भारी
पावसाची मजा न्यारी
--- राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
पाऊस आला, पाऊस आला (बालकविता)
पाऊस आला, पाऊस आला
गल्लीमधुनी पुर वाहिला
चला, चला, रे मुलांनो
नाव पाण्यात सोडू चला
धींगामस्ती करू थोड़ी
पावसाशी गट्टी करू
थेंब झेलु हातावरती
मातीचे धरण करु
भिजून ओलेचिंब होऊ
थोडेसे नाचून घेऊ
रागावता आई खूप
घरात शिरु गुप-चूप
पाठीवरती आई देईल
एक धपाटा ठेऊन
थोडेसे रुसु, मग घेऊ
गरम चहा पिऊन
-राजेश खाकरे
मो.7875438494
अन्नदाता संपावर..!
अन्नदाता संपावर
-----------------------
"आई संपावर गेली तर..." असा निबंधाचा विषय आम्हाला दहावी-बारावीला असायचा...खरं तर त्यावेळी माझ्या मनात प्रश्न यायचा की 'अरे यार आई कशी संपावर जाईल..?" आई कधीच संपावर जात नाही आणि जर एखाद्या वेळी खरंच संपावर गेली तर मग त्याहून दुर्दैवी काय असणार..आणि आईशिवाय कसं जमणार...
मित्रांनो, मला वाटतं की शेतकरी हा आपली आई आहे.आई मुलाला खायला प्यायला घालून आपल्याला आवश्यक गोष्टी पुरवत असते.तसाच शेतकरी आपल्या शेतात धान्य, भाजीपाला,फळे आदी पिकवून सर्व जगाचे पोषण करत असतो. जगातला कुठलाही व्यक्ति हा कितीही श्रीमंत,पैसेवाला असला तरी तो पैसा खाऊ शकत नाही, त्याला भाकरीचीच गरज असते.अन्नाशिवाय कोणताही व्यक्ति जीवंत राहू शकत नाही.
शेतकरी हा केवळ अन्नदाताच नाही तर तो खऱ्या अर्थाने नवनिर्मितिकार आहे, शेतात किलोभर धान्यातून तो दिवासरात्र राबून, कष्ट करून त्याचे चार क्विंटल धान्य बनवतो. तुम्ही आम्हीही कामे करतो परंतु मित्रांनो शेतकर्याचे काम पूर्णतः वेगळे आहे. आणि याच अन्नदात्यावर आज संपावर जायची वेळ आली हे आमच्या सर्व लोकांची कृतघ्नता आहे,दुर्दैव आहे असे मला वाटते.
आम्ही कित्येक संप नेहमी बघत असतो, बॅक कर्मचारी संप, सरकारी कर्मचारी संप व् इतर अनेक संप..पण मित्रांनो, तसाच हा शेतकर्याला एक संप आहे का??? तर नक्कीच नाही अन्नदात्यावरच जेव्हा उपासमारीची वेळ येते, जेव्हा जगण्याचा कुठलाच मार्ग शिल्लक उरत नाही अन शेतकरी फासावर स्वतः ला लटकून घेतो, जेव्हा त्याच्या कुटुंबाच्या किमान गरजा पण तो पूर्ण करू शकत नाही, उच्च तर काय तो त्याच्या मुलाच्या साध्या शिक्षणाचाही खर्च भागवु शकत नाही, शेतात पिकवलेला सोन्यासारखा माल जेव्हा बेभाव द्यावा लागतो, तेव्हा जी काळजात एक सणक उठते ना त्याचा उद्रेक आहे हा संप...आणि सरकार आणि समाज जर त्याची योग्य दखल घेणार नाही तर भविष्यकाळ फार विदारक असेल.
आश्वासनाचे गाजर दाखवून संप मागे घेण्यास सरकार एखादेवेळी यशस्वी होईलही मात्र जर खऱ्या अर्थाने शेतकर्याचे प्रश्न सोडवले नाही तर पुढील काळ खुप भयंकर असेल.
.संपकाळात जेव्हा शेतकरी त्याचा माल रस्त्यावर फेकत आहे तेव्हा काही लोकांना अन्न वाया जातेय याचा खुप पुळका येतोय.जेव्हा भाव मिळत नाही तेव्हा शेतमाल शेतात सडतो हे त्यांना कधी दिसत नाही. जरा त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात बघा, एक चीड दिसेल त्याच्या डोळ्यांत येथील अन्यायी व्यवस्थेविरुद्ध, आणि त्याचीच ठिणगी म्हणजे हा संप होय
अडीच तासाचा चित्रपट तीनसे रूपये खर्च करून बघणारे आम्ही. मोठ्या हॉटेलात एका वेळच्या जेवनासाठी हजार-दोनहजार खर्च करणारे आम्ही दहा रूपयाची भाजी 5 रूपयाला मागताना आम्हाला अजिबात लाज वाटत नाही.इतर ठिकाणी पैसे खर्च करताना पर्वा न करणारे आम्ही शेतमाल खरेदी करताना खुप व्यवहारी होतो आणि मित्रांनो हे आम्ही बदलू शकलो तरच खऱ्या अर्थाने अन्नदाता सुखी होईल व् आमचा देश समृध्द होईल. आणि शेतकर्याला कधी संपावर जायची गरज पडणार नाही.
---राजेश खाकरे
मो.7875438494
रामा, तुझा वनवास अजुन संपला नाही
माणसातला राम अजून जागला नाही
रामा, तुझा वनवास अजून संपला नाही !!धृ !!
मनात तू,ध्यानात तू, प्रत्येका ह्रदयात तू
अणुत तू, रेणुत तू,भजनी,गाण्यात तू
इथला दुष्ट रावण अजून वारला नाही
रामा, तुझा वनवास अजून संपला नाही !!१!!
ह्या कोर्टात,त्या कोर्टात तुझी सुनावणी चालू
सिद्ध कर स्वतः ला, तू असला तरच मानू
तुझ्या जन्मभूमीचा वाद अजून मिटला नाही
रामा, तुझा वनवास अजून संपला नाही !!२!!
बघितलतं ना आमचा न्याय कसा तुला वाटला?
साठ वर्षात देवा तुझा श्वास असेल ना कोंडला
आमच्या कोर्टाची पायरी तू पुन्हा चढणार नाही
रामा, तुझा वनवास अजून संपला नाही !!३!!
--- राजेश खाकरे मो.7875438494
आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं
त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...
-
पुस्तक: माझा मित्र नमस्कार मित्रांनो , पुस्तक म्हटले की आपल्याला खुप आनंद होतो. पुस्तक आपला मित्र असतो. तो आपली एखाद्या सख्याप्रमाण...
-
चारोळ्या बिरोळ्या-३२ ■■ पाऊस ■■ मेघराजाच्या प्रेमाला येते जेव्हा भरती हिरवीगार सजते अखंडित ही धरती ■ पावसाचे अन धरतीचे घट्...
-
-------------------------------------------------- १९ ऑक्टोंबर, स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्मदिवस. संपूर्ण विश...
-
विश्वास.... किती छोटा शब्द ना... जो श्वासाप्रमाणे जपणे आवश्यक आहे तोच विश्वास असतो , आणि म्हणूनच त्याला वि-श्वास म्हणत असावे...