गुढीपाडवा

गुढीपाडवा

नवीन वर्ष नव्या कामना
नवोन्मेष नवीन भावना

गुढी आनंदाची नववर्षाची
उत्साह,चैतन्य स्फूर्तीची

चैत्राची नवीन पालवी
दुःखास अलगद मालवी

कडुनिंबाची कडू डहाळी
आरोग्याची देई आरोळी

गाठीच्या गोड साखरेत
मधुर शब्द भरे ह्रदयात

वस्त्र भरजरी शोभे त्यावर
मंगल कलश मंत्रोच्चार

भव्य आभाळी घेई उडी
गुढीपाडव्याची उंच गुढी
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४

जीवन

जीवन

जीवन किती सोपं
किती असतं अवघड
म्हटलं तर खेळ
न सुटणारं कोडं

हवे सर्वांनाच
जीवनामध्ये सुख
कधी असते छाया
किंवा नुसतीच धूप

ओझे एक अनामिक
डोईवरती सदैव
जाताना निघून
एकटा फक्त जीव

आशा आकांक्षा
मनात भरलेल्या
पूर्ण करता करता
मागेच उरलेल्या

किती जगून गेलेत
किती मरून गेलेत
जीवनाचे रहस्य
कुणा कळून आले

पोटासाठी लागतात
दोन घास जगायला
छोटासा निवारा
वस्त्र अंग झाकायला

जीवनात हवे हवे
कधी ते सुटत नाही
काय खरे हवे
ते कळत नाही

जीवन म्हणजे असे
मृगजळाचा खेळ
धावून धावून फक्त
उर फुटायची वेळ

जीवन म्हणजे देवाची
असते अनमोल भेट
काही असे काही तसे
सुखदुःखाची समेट
© राजेश खाकरे
rajesh.khakre@gmail.com

कविता: men will be men


Men will be men 

हवं तर लाईन दे
किंवा ती पण देऊ नको
तू तुझ्याच धुंदीत रहा
माझ्याकडे पाहू नकोस
माझ्या तरुणपणाची
खपली मात्र काढू नकोस
हे सुंदरी
हवं तर दादा म्हण
पण काका तेव्हढं म्हणू नकोस

थोडे पोट पुढे आले
पाच दहा केस पांढरे झाले
काही उन्हाळे आणि पावसाळे
माझ्या जास्त पाहण्यात आले
म्हणून काही बिघडले नाही
मन अजून अवघडले नाही
काही जरी घडले असले
मन बाहेर पडले नाही
चाळीशी गाठशील कधी
एवढे तू पण विसरू नकोस
हे सुंदरी,
हवं तर दादा म्हण
पण काका तेव्हढं म्हणू नकोस 

केसांचा रंग बदलला
त्याचे वाईट वाटत नाही
चेहरा प्रौढ झाला म्हणून
दुःख मनात दाटत नाही
पोटाचा नगारा झाला
ते ही मनावर घेत नाही
एरव्ही एरव्ही ह्या गोष्टी
जास्त फारशा आठवत नाही
तिकिटातल्या लाईनीत जेव्हा
रुबाबाने उभा असतो
शेजारच्या सुंदरीवर
इम्प्रेशन पाडत असतो
"काका, थोडं बाजूला सरकता का?"
कुणा सुंदरीचा आवाज येतो
काळजावरती तेव्हा मग
मोठ्ठा घणाघात होतो
माझ्या इम्प्रेशनचा बुरखा
असा टरा-टरा फाडू नको
हवं तर दादा म्हण
पण काका तेव्हढं म्हणू नको 

 आधी तू पेट्रोल भर
नंतर मी भरेल
एसटीतली बसलेली सीट
तुझ्यासाठी सोडेल
पार्किंगच्या गर्दीमधून
गाडी तुझी काढेल
कधी जर वाटली भीती
घरापर्यंत तुला सोडेल
आभार माझे मानू नको
Thanks ही म्हणू नको
माझ्या या उपकाराची
परतफेडही करू नको
थट्टा अशी करू नको
जितेपणी मारू नको
हे सुंदरी,
हवं तर दादा म्हण
पण काका तेव्हढं म्हणू नकोस
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajesh.khakre@gmail.com

मला वाटते लोन मिळावे

मला वाटते

मला वाटते लोन मिळावे
कोटी अथवा अब्ज मिळावे
परत करण्याची वेळ येता
दूरदेशी मी भुर उडावे

सगळ्या बँकेत अर्ज करावे
मिळेल तितके ढापून घ्यावे
पुन्हा कधी ना तोंड दावावे
मला वाटते लोन मिळावे

तुमच्या बँकेमध्ये जाता
पेनालाही तुम्ही दोर बांधता
तो पेनबी (pnb) घेऊन जावे
मला वाटते लोन मिळावे

जरा फुकाचा पैसा येता
सगळ्या दूर होतील चिंता
ऐषोरामात खूप लोळावे
मला वाटते लोन मिळावे

सर्व पैशाचा करून चुराडा
परदेशात मजेत जगावे
सगळी बोंबाबोंब पहावे
मला वाटते लोन मिळावे

रिकामी मग बँक होता
एक एक पैसा भरेल जनता
मी कशाला चिंता करावे
मला वाटते लोन मिळावे
© राजेश खाकरे
rajeshkhakre.blogspot.in

माफ कर यार दुःखा

माफ कर यार दुःखा

आलास तू जीवनी कितीकदा, केलेस वार दुःखा
डगमगलो ना कंटाळलो, माफ कर यार दुःखा

माझ्या सूर्याची सकाळ उगवली नाहीच केव्हा
अंधाऱ्या रात्रीची मला, सवय झाली फार दुःखा

तो तुझा विषारी डंख, चावत नाही आता मला
जाणिले केव्हाच आहे, जीवनाचे सार दुःखा

कर्ज माझ्यावरी आहे ते चेहऱ्यावरच्या हास्याचे
उपकार त्याचे कसे फेडू, झाला आहे भार दुःखा

शिकलो मी कितीक गोष्टी तुझ्या जीवनी येण्याने
खरे तर माझ्यावरती, तुझेच आहे उपकार दुःखा

हरलोच नाही जीवनात अगदीच असेही नाही
हरुनि हरुनि जिंकलो मी,तुझाच आधार दुःखा
© राजेश खाकरे
मो..7875438494                                                                                
rajesh.khakre@gmail.com

बालकविता: विमानाची डोकेदुखी

बालकविता: विमानाची डोकेदुखी

एके दिवशी विमानाची गंमत झाली भारी

उंच गेले आकाशात आली त्याला घेरी

अचानक विमानाचे लागले डोके दुखायला

तारांबळ उडाली एकच ठोके लागले चुकायला 

कुणी दिला बाम आणि कुणी दिली गोळी

विमानाचे डोके ऐकेना कुणाची आरोळी

आपला बंटी आजीसोबत विमानात होता बसला 

काय माहित विचार तो करत होता कसला?

आजीबाईच्या बटव्यातून कसली औषधी दिली

विमानाची डोकेदुखी लगेच बरी झाली 

सर्वाचा प्रवास मग अगदी सुखाचा झाला

आजी आणि बंटीचा जयजयकार सर्वांनी केला 

-राजेश खाकरे

मो.७८७५४३८४९४

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...