इंग्लिश स्कुल (कथा) भाग-३


इंग्लिश स्कुल (कथा)
लेखक © राजेश खाकरे
भाग-३
●●●
तो १ मे महाराष्ट्र दिनाचा दिवस होता.ध्वजारोहणासाठी गावातील लोकं मोठ्या संख्येने झेडपीच्या शाळेत जमा झालेले होते. ध्वजारोहण, निकाल आणि इतर कार्यक्रम झाल्यावर माईकचा ताबा जोशी सरांनी घेतला होता. 
"गावकरी मंडळी, नमस्कार!
आता जूनमध्ये शाळा सुरू होईल, तेव्हा ज्या मुलांचे वय सहा वर्षे पूर्ण होईल त्यांनी आपल्या मुलांना झेडपीच्या शाळेत घालावे. हल्ली इंग्लिश स्कुलचे पेव फुटलेले आहे. पावसाळ्यात दगड उचलल्यावर जसा प्रत्येक दगडाखाली विंचू सापडतो ना तशा गावोगावी इंग्लिश स्कुल झाल्या आहेत. आपण पण दिखाव्याला भुलतो आणि पदरमोड करून आपल्या मुलांना इंग्लिश शाळेत घालतो. वर्ष दोन वर्षे झाली की आपल्या लक्षात येते.तोपर्यंत मुलांचे एक दोन वर्षे वाया जातात." मोठ्या त्वेषाने जोशी सर सांगत होते. जोशी सर पुढे म्हणाले,
"आपल्याला असे वाटते की, इंग्लिश स्कुल म्हणजे चांगले शिक्षण, पण खरंच तसं आहे का..? तिथल्या शिकवणाऱ्या शिक्षकांचे शिक्षण बघा,त्यांना देण्यात येणारा पगार बघा, बारावी, डि.एड, झालेल्या मुली चार-पाच हजार पगारात तिथे शिकवतात. इतक्या कमी पगारात त्या तुमच्या मुलांना किती चांगले शिक्षण देणार, याचाही विचार करा. तेथे शिकवणारे बहुतांशी शिक्षकही मराठी शाळांतूनच शिक्षण घेतलेले असतात.आजकाल कुणीपण उठतो आणि इंग्लिश स्कुल सुरू करतो; त्यामुळे पालकांनो वेळीच जागे व्हा, आणि आपल्या मुलांना झेडपीच्या शाळेत घाला." 
मुलांची जिल्हा परिषदेच्या शाळेतील कमी होत जाणारी संख्या ही चिंतेची बाब होती. जोशी सरांच्या चेहऱ्यावर सुद्धा ती स्पष्ट जाणवत होतीच; त्यामुळेच त्यांना जास्तीत जास्त मुलांचे अडमिशन झेडपीच्या शाळेत व्हावे असे वाटणे साहजिक होते. संख्या कमी होत जाण्याने जोशी सरांच्या नोकरीला प्रत्यक्ष धोका नसला तरी अप्रत्यक्षपणे शिक्षकी पेशासाठी ती धोक्याची घंटा होती. इंग्लिश स्कुलमुळे सरकारी मराठी, झेडपी शाळा बंद पडल्याच्या बातम्या अधूनमधून पेपरात छापून येतच होत्या. 
जोशी सरांचे भाषण नंदूला पुन्हा आठवले. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता आठवली. त्यांना वाटणारी चिंता ही त्यांच्या नोकरीच्या प्रेमापोटी होती? मराठीच्या प्रेमापोटी होती? की त्यांच्या मनात इंग्लिश स्कुल विषयी आकस होता? नंदूला काही समजेनासे झाले पण त्यापैकी काही जरी असेल तरी जोशी सर आपली स्वतःची मुले इंग्लिश स्कुलला कशाला टाकतील. त्या दिवशीच्या भाषणानंतर पारावर झालेल्या गप्पात तर सदा म्हणत होता. 
"हा जोशी सर म्हणजे नुसता पोपट आहे, इकडे लोकांना तत्वज्ञान सांगतो की मुलांना मराठी शाळेत घाला आणि स्वतः च्या मुलांना शहरातल्या मोठ्या इंग्लिश स्कुलममधी घातलेले आहे." 
'म्हणजे सदा म्हणतो ते खरंच असेल तर..इंग्लिश स्कुल खराब असत्या तर जोशी सरांनी आपल्या मुलांना कशाला इंग्लिश स्कुलला टाकले असते..!, शिवाय गावातल्या इतक्या लोकांनी आपली मुले घातली ते काय येडे आहे का?' नंदू स्वतः शीच म्हणाला, त्याने हात धुतला आणि शेताकडे निघून गेला.
●●● 
"अहो नंदूराव, या ना इकडे गप्पा मारायला.." सदाने आवाज दिला. 
नंदू पराजवळच्या रस्त्याने हातात डबा घेऊन पंडितरावांच्या शेतावर कामासाठी निघाला होता. पारावर सदा आणि आणखी तीन-चार माणसे बसलेली होती.
"नको सदा, अरे मी शेतावर चाललो, आता टाइम नई" 
"अरे तंबाकू तर खाऊन जा.." 
तंबाखू म्हटल्यावर नंदू पाराजवळ आला. हातातला डबा ओट्यावर ठेवून त्याने सदाने पुढे केलेली तंबाखूची पुडी घेतली. त्यातून थोडीशी तंबाखू काढून हातावर घेतली. तंबाखूला किंचित चुना लावला आणि विडा चोळायला सुरवात केली.
" मग नंदू, टाकले का पोराला इंग्लिश स्कुलला?" सदाने तंबाखू चोळत विचारले.
" हो बाबा, टाकले एकदाचे, महिना होत आला." 
"हो का, चांगलं केलं यार!" सदाने विशिष्ट पद्धतीने तंबाखूवर थाप मारली. काहीशी भुकटी बाहेर उडाली. उर्वरित तंबाखूची पुरचुंडी तीन बोटात पकडून त्याने खालच्या ओठात टाकली.
" चल बाबा सदा, जातो मी उशीर होतोय मला, भेटू रात्री." असे म्हणत नंदूने तंबाखू तोंडात टाकत डबा उचलला आणि तो शेताच्या दिशेने चालू लागला. 

अवीची इंग्लिश शाळा सुरू झाली होती. पहिला सात हजारांचा हप्ता भरून त्याचे अडमिशन केले होते. दुसरा सात हजारांचा हप्ता आणखी तीन महिन्यांने भरायचा होता. त्यासाठी घरखर्च भागवून, खर्चात कपात करून काही पैसे मागे टाकणे भाग होते. सोमीनाथने दिलेले चार हजार पण त्याच्याकडे काम करून फेडायचे होते. त्यामुळे गंगू आणि नंदू कामात एकदिवससुद्धा खंड पडू देत नव्हती. त्यांना जास्तीचे श्रम पडत होते पण मुलाला इंग्लिश स्कुलला टाकल्याच्या आनंदापुढे त्यांना त्याचे काही वाटत नव्हते.
(क्रमशः)
●●● 

इंग्लिश स्कुल (कथा) भाग-२


इंग्लिश स्कुल (कथा)
लेखक © राजेश खाकरे
भाग-२
●●●  
"बेटा, नाव काय तुझं?" वर्ल्डक्लास इंग्लिश स्कुलमधल्या त्या शिंदे मॅडमने विचारले.
"अवी, मॅडमला नाव सांग तुपलं" नंदू अविनाशला समजावत म्हणाला.
‎"अ$$वी..." तोंडात बोट घालत काहीशा संकोचनेच अविनाश म्हणाला
‎"ते तोंडातलं बोट काढ बघू..!" शिंदे मॅडम गोड आवाजात बोलल्या.
त्या दिवशी जूनची दहा तारीख होती. भल्या ‎सकाळीच नंदू आणि गंगू अवीला घेऊन संग्रामपुरच्या इंग्लिश स्कुलमध्ये दाखल झाले होते.गावात मुलांना घेण्यासाठी आलेल्या स्कुलबसमध्ये बसूनच ते आले होते. बसमध्ये बसल्यावर गंगूने बसमध्ये नजर फिरवली. तशी ती हरखूनच गेली. ३ ते ६ वर्षाची ती छोटी-छोटी मुले, किती गोंडस दिसत होती. गडद निळा आणि फिक्कट आकाशी रंगाचा युनिफॉर्म, त्यावर टाय, पायात सॉक्स आणि पांढऱ्या रंगाचे बूट, पाठीवर छानशी बॅग, बॅगेच्या एका बाजूला टिफिन आणि पाण्याची बाटली सगळ्याच मुलांनी असा पोशाख केलेला होता. तिला सर्व नवलच वाटत होते. आपला अविपण असाच दिसेल गोंडस, सुंदर, टापटीप, तिच्या नजरेसमोर चित्र तरळले, नकळत चेहऱ्यावर हास्य उमटले. सगळे काही स्वप्नवत... आणि सकाळी गावात बस आली तेव्हाची आठवण तिला झाली. सर्व मुलांच्या आया आपल्या मुलांना गावच्या मंदिराच्या शेजारी जिथे बस थांबे तिथे घेऊन आल्या होत्या. मुलांना बसमध्ये बसवून झाल्यावर आपल्या आईला टाटा-बायबाय करणारी मुले तिला दिसायला लागली. तिथेच त्या आईच्या घोळक्यात ती स्वतः ला बघू लागली, अवीला टाटा-बाय-बाय करण्यासाठी तिने  उंचावलेला हात तिला दिसू लागला. 

"अवी, हात खाली घे, तोंडात नको घालू" नंदू अविचा हात खाली करत म्हणाला.
" अच्छा, बोला सर, मी आपली काय मदत करु शकते?" शिंदे मॅडमच्या या  बोलण्याने नंदू थोडासा गोंधळला.
"स$$र..अहो, सर नका म्हणू, काबाडकष्ट करणारे आम्ही आम्ही कसले सर." नंदू थोडासा सावरत म्हणाला.
" म्हणजे मला असं म्हणायचं की, बोला,काय काम होतं?" 
" आता बघा, मॅडम इथे दुसरं काय काम असणार, आमच्या अविला तुमच्या इंग्लिश स्कुलात घालायचा होता."
"अच्छा, किती वर्षांचा झाला तो आता"
"कालच्या उन्हाळ्यात तीन वरीस झाले बघा त्याला पूर्ण... तीन वर्षांपूर्वी गावच्या देवीच्या यात्रेवेळीच झालता तो" गंगू म्हणाली.
"म्हणजे त्याला प्ले ग्रुपला टाकता येईल" मॅडम मंदस्मित करत म्हणाली. नंदूला तिचे बोलणे काही समजले नाही
"म्हणजे इंग्लिश स्कुलला नाही टाकता येणार का?" नंदूने पृच्छा केली.
"अहो, तसं नाही, इंग्लिश स्कुललाच असेल तो, प्ले ग्रुप,ज्युनियर केजी, सिनियर केजी, फस्ट, सेकंड असं असतं, म्हणजे हे वर्ग असतात, जसं, बालवाडी, पहिली, दुसरी असतं ना तसं.."
"होय का,, बर,, बर,, आम्हा ४ थी शिकलेल्याला काय समजणार त्यातलं" नंदू थोडंसं हसत म्हणाला
" बरं ते, फीस किती लागल ते पण सांगा ना..!" गंगूने विचारणा केली.
शिंदे मॅडमने कागदावर काहीशी आकडेमोड केली.
"तुम्हाला शाळेची फीस दहा हजार प्लस ड्रेस, स्कुलबॅग, आयकार्ड, बूट, स्कुल ट्रिप, याचे पाच हजार आणि जर तुम्ही स्कुलबस वापरणार असाल तर त्याचे परमंथ सहाशे म्हणजे दहा महिन्याचे पकडले तरी वर्षाला सहा हजार असे एकूण एकवीस हजार वर्षाला लागतील" शिंदे मॅडम सावकाशपणे म्हणाल्या. 
आकडा ऐकून गंगू आणि नंदू काहीसे दचकलेच. घरच्या एक दीड एकर शेतीत फारसे काही पिकायचे नाही. दोघेही वर्षातले काही दिवस स्वतः च्या शेतात काम करून बाकीचे दिवस लोकांच्या शेतात मोलमजुरी करून गुजराण करत. त्यातून जे काही मिळे त्यातच घरखर्च भागवायचा. वर्षाला एकवीस हजार ही रक्कम त्यांच्या दृष्टीने जरा जास्तच होती. घरखर्च आणि काही इतर खर्च कमी करून, आणि काही अधिकची कामे करून कसं का होईना शाळेचा खर्च भागवू असा त्यांचा मनसुबा होता.
"ह्या एकवीस हजारात काही कमीजास्त होईल का..?" नंदूने विचारले.
"म्हणजे असं आहे की, आम्ही सांगतांना उगीच जास्त सांगतच नाही, जास्त सांगायचे आणि मग कमी करायचे असं आम्ही करत नाही. त्यामुळे जो खर्च आहे तो आपल्याला सांगितला मी"
" ते ड्रेस, स्कुलबॅग आम्ही बाहेरून घेतले तर पाच हजार कमी होतील का?" गंगूने विचारले
" तसं नाही करता येत, ते स्कुलमार्फतच घ्यावे लागतील, किंवा स्कुलने ठरविलेल्या दुकानातच ती घ्यावी लागतात." शिंदे मॅडम ने माहिती दिली
" बरं मॅडम, येतो आम्ही,नमस्कार" 
"ठीक आहे, विचार करा आणि अँडमिशन घ्यायचे असल्यास पुढील तीन चार दिवसात घेऊन टाका,नंतर परत फुल होतील, अडमिशन फीस २-३ हप्त्यात भरू शकता" 
शिंदे मॅडमचा निरोप घेऊन नंदू आणि गंगू अविला सोबत घेऊन गावी परतले.
●●● 
" अगं, झाल्या का भाकरी? मला भूक लागली" नंदूने घरात शिरत आवाज दिला.
" हो,हो थांबा पाच मिनिट" गंगू हातातली भाकर तव्यावर टाकत म्हणाली. 
आकाश शाळेत जाण्याची तयारी करत होता. यावर्षी तो दुसरीला गेला होता.
"आक्या, जेवला का तू?"
"हो पप्पा, मी चाललो शाळात" 
आकाशने वायरच्या पिशवीत पुस्तके कोंबली आणि तो शाळेला निघून गेला. गंगूने नंदूसाठी ताट वाढून आणले. नंदू जेवायला बसला. गंगूही जवळच बसली.
" काही तजवीज झाली का..पैशाची?" गंगूने न राहवून विचारले
" आताच सोमीनाथ कडून जाऊन आलो, चार-पाच हजाराचं करेन म्हणाला, बुधवारपर्यंत देईन म्हणाला" 
"बरंच झालं मग, घरात आहेत तीन साडेतीन, कसंही करून सात हजाराचा पहिला हप्ता भरता येईल." गंगू उत्साहाने म्हणाली.
सोमीनाथ नंदूचा मित्रच होता. त्याच्याकडे बरीच जमीन होती.जवळच्या बाजाराच्या गावी सोमीनाथचे एक दुकानही होते. सोमीनाथच्या शेतात बऱ्याच वेळा नंदू कामाला जायचा. सकाळीच तो त्याच्याकडे जाऊन आला होता. आणि काही अडव्हान्स पैशाची मागणी केली होती. मजूरीतून वळती करून घेता येईल या विचाराने सोमीनाथने त्याला चार-पाच हजार देण्याचे कबूल केले होते.
त्या दिवशी इंग्लिश स्कुलमधून परत आल्यापासून नंदू आणि गंगूने काहीही करून अविला इंग्लिश स्कुलला घालायचेच असे ठरविले होते. एकवीस हजार खरं तर त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम होती. परंतु मुलाच्या सुखासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. 
"आपल्याकडे जास्त पैसे असते तर आकाशला पण इंग्लिश स्कुललाच घातला असता आपण!" नंदू काहीशा विचाराने म्हणाला.
"आता गं बाई, आज लईच मोठमोठ्या बाता मारत आहात, बस करा, लई मोठ्या गोष्टी करू नका, तेव्हढं अवीच्या खर्चाचं बघा, तेव्हढं भागलं तरी लई झालं" गंगू नंदूला जाणीव करून देत म्हणाली
"अगं, ह्या झेडपीच्या शाळेचं काही खरं नसतं, उगीच लोकं आपल्या पो-हाला इंग्लिश स्कुलला टाकू नाई ऱ्हायली" 
आणि नंदूच्या नजरेसमोर त्या दिवशीचा प्रसंग तरळला.
(क्रमशः)
●●●

इंग्लिश स्कुल (कथा) भाग-१

इंग्लिश स्कुल (कथा)
लेखक © राजेश खाकरे
भाग-१
(सूचना: कथेतील पात्रांची आणि ठिकाणांची नावे काल्पनिक आहेत.बाकी घटना मात्र कुठेही घडलेल्या असू शकतात, किंवा घडूही शकतात.)
●●●
पारालगतच्या रस्त्याने आलेली बस धुराळा उडवतच गावात शिरली. धुळीचे काही लोट पारावर गप्पा मारत बसलेल्या लोकांच्या अंगावरही गेले. मात्र ते वडाचे झाड आणि त्याभोवतीचा दगडी पार हे रस्त्याच्या अगदीच लगत असल्याने रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांच्या पायधूळीचा लाभ पारावर बसणाऱ्यांच्या नित्याचाच होता. ही जागा म्हणजे गावातील खबरबातीची, पोकळ चर्चेची, रिकाम्या भानगडीची, नुसत्या उठाठेवीचे जणू केंद्रच होती. 
"अरे त्या संग्रामपूरच्या इंग्लिश स्कुलची बस ना ही?" पाठमोऱ्या स्कुलबसकडे बघत गणपतने विचारणा केली 
"व्हय तीच ती" नाम्याने माहिती पुरवली "मागच्या वर्षापासून येते ना ती गावात तुला माहीत नाही व्हय?"
" माहित म्हणजे तसं माहित व्हतं रे, पण नेमकी हीच का म्हणून विचारलं" 
"माझा हर्ष टाकला ना मागच्या वर्षांपासून इंग्लिश स्कुलला" रमेशने अभिमानाने सांगितले
"खरं की काय? किती खर्च येतो रे वर्षाला?" नंदूने न राहवून विचारले. 
" खर्चाला भीत नाही आपण, अरे होऊन दे खर्च, मुलगा कुणाचा आहे..! त्याच्यासाठी वाट्टेल ते पण मुलगा इंग्लिश स्कुललाच जाणार..!" रमेश श्रीमंतीच्या थाटात म्हणाला. नंदूला मात्र त्याच्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने त्याच्या चेहऱ्यावर काहीशी अस्वस्थता जाणवत होती. नेमकी तीच हेरून रमेश नंदूला म्हणाला,
" नंदया, पण नसत्या चौकशा करून तुला काय उपयोग?" 
"उपयोगाचं नाही तसं,पण माझा अविनाश येत्या पावसाळ्यात तीन वर्षांचा होईल, जमलं तर-"
"जमलं तर काय?" रमेशने हसतच विचारले
"...म्हणजे जमलं तर अविला टाकू म्हणलं इंग्लिश स्कुलला यावर्षी.." नंदूच्या या बोलण्यावर रमेश मोठमोठ्याने हसायला लागला. 
"अरे, बघ गण्या, धोंड्या, राम्या, नंदूचा पोरगा इंग्लिश स्कुलला जाणार" रमेशच्या या उपहासात्मक बोलण्याने पारावर एकच हशा पिकला. नंदू मनातल्या मनात वरमला. रमेशच्या बोलण्याने आतून दुःखी पण झाला. त्याला रमेशला उलट बोलणे शक्य नसल्याने तो तसाच शांत बसून राहिला. एव्हाना मुलांना गावात सोडून इंग्लिश स्कुलची बस परत निघून गेली. हवेत धुळींचे लोट उंचच उंच पसरले होते.
●●●

"काय?" 
"अगं, हो तेच म्हटलंय मी!"
"डोकं तर ठिकाणावर आहे ना तुमचं?" 
"हो, सगळं ठिकाणावर आहे, आपण येत्या पावसाळ्यात अविला इंग्लिश स्कुलला टाकू" नंदूने पुन्हा ठासून सांगितले. 
" मला तर वाटते बाई, तुम्ही आज पुन्हा ढोसून आलात, त्यामुळंच काहीबाही बडबड करत आहात" नंदूची बायको वैतागाने बोलत होती. 
" अगं माझे आई, मी आज पिलेलो नाही, पूर्ण शुद्धीत बोलतोय,समजलं " 
"अहो पण तुम्ही काय बोलताय ते तरी समजतंय का तुम्हाला, इंग्लिश स्कुलला पोरगं टाकणं आपल्या सारख्या गरीबाचं काम नाही, घरच्या शेतीवर पोट भरत नाही म्हणून रोज मोलमजुरी करणारे आपण, कधी काम मिळतं,कधी मिळत नाही, कसेबसे दोन घास पोटात ढकलतो,एव्हढा पैसा कुठून आणायचा आपण? "
"तू नको चिंता करू, मी काहीपण करेल, जास्त मेहनत करेल, पण टाकुच आपण त्याला इंग्लिश स्कुलला..!" 
"मला बाई, काही समजेनासं झालं!!"
"गंगू,आपण सालं-महिने घालून, मोलमजुरी करून दिवस काढले, गरिबीत का असेना, जसा जमेल तसा संसार केला, देवाच्या दयेनं दोन मुलं झाली, आपण त्यांना चांगलं शिक्षण नको का द्यायला?" 
"मी कुठं नाही म्हणते, आता आपला आकाश दुसरीला गेला अन पुढं पण शिकवणारच हाय ना आपण त्याला, अविला पण शिकवू.."
"हो पण आता आपला आकाश झेड पीच्या शाळात जातो. अगं इंग्लिश स्कुल लई भारी असते म्हणी, तिथं शिकलं म्हणजे पोरगं कसं फाडफाड इंग्लिश बोलतं म्हणे, मोठा सायब पण होतंया...!" नंदू आकाशाकडे नजर टाकून बोलत होता.त्याच्या मनाला जणू स्वप्नांचे पंखच फुटले होते. त्याच पंखाच्या जोराने तो स्वप्नांच्या आकाशात उंचच उंच भरारी घेत होता. 
देवाने गरीबाला स्वप्न बघण्याची मोकळीक दिली ते एक्या अर्थाने बरेच झाले म्हणायचे. कित्येक गरिबांना स्वप्नांच्या राज्यात स्वतः ला काही क्षण गुंतवून आपल्या इच्छा पूर्ण होत असल्याचे बघता तरी येते.
दिवे लागणीची वेळ झाली होती. गंगूने घरासमोरच्या तुळशीवृंदावनला दिवा लावला. नंदू मारोतीच्या दर्शनासाठी निघून गेला.
(क्रमशः)

इंग्लिश स्कुल (कथा) पूर्वसूचना

नमस्कार मित्रांनो,
"इंग्लिश स्कुल" ही एक नवीन कथा आपल्या भेटीला आणत आहे.साधारणतः एक वर्षांपूर्वी अर्धी कथा लिहिली होती.आणि तशीच पडून होती.काल ही कथा पूर्ण करण्यासाठी लिहायला घेतली आणि आज ती पूर्ण झाली. ही कथा लिहिता- लिहिता कधी दीर्घ झाली ते समजले सुद्धा नाही. ती साधारणतः पाच भागात पोस्ट करणार आहे.
मी प्रसिध्द केलेल्या कथेमधील ही माझी दुसरी कथा आहे.
उद्यापासून एक एक भाग एक दिवसाआड पोस्ट करेल. वाचून आपल्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात, हीच विनंती.
आपला- राजेश खाकरे

इंग्लिश स्कुल (कथा) पूर्वसूचना

नमस्कार मित्रांनो,
"इंग्लिश स्कुल" ही एक नवीन कथा आपल्या भेटीला आणत आहे.साधारणतः एक वर्षांपूर्वी अर्धी कथा लिहिली होती.आणि तशीच पडून होती.काल ही कथा पूर्ण करण्यासाठी लिहायला घेतली आणि आज ती पूर्ण झाली. ही कथा लिहिता- लिहिता कधी दीर्घ झाली ते समजले सुद्धा नाही. ती साधारणतः पाच भागात पोस्ट करणार आहे.
मी प्रसिध्द केलेल्या कथेमधील ही माझी दुसरी कथा आहे.
उद्यापासून एक एक भाग एक दिवसाआड पोस्ट करेल. वाचून आपल्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात, हीच विनंती.
आपला- राजेश खाकरे

दहा रुपयांची गोष्ट

दहा रुपयांची गोष्ट
●●●
अगदी परवा परवा ची गोष्ट.दुपारची वेळ होती. मटका कुल्फीवाला दुपारच्या भयंकर उन्हात थंडगार कुल्फी विकण्यासाठी फिरत होता. त्याच्या घंटीचा आवाज ऐकला तसा मी कुल्फी घेण्यासाठी त्याला आवाज दिला. तो त्याच्या हातगाडीवरील मटक्याच्या आकाराच्या भांड्यातून कुल्फी काढत होताच तेवढ्यात ड्युटीवर असलेले दोन साहेब फोर व्हीलरमधून तिथे येऊन पोचले.त्यांनी अगदी खेटूनच गाडी उभी केली. गाडी बंद न करता त्यांनी त्या कुल्फीवाल्या भाऊला ऑर्डर फर्मावली.
"हो साहेब, म्हणून त्यांनी दोन कुलफ्या काढल्या आणि त्यांच्या हातात दिल्या."
"त्यांना द्याना आधी," त्यातील एक साहेब माझ्याकडे निर्देश करत म्हणाला.
"नाही साहेब, तुमची गाडी पण चालूच आहे, तुम्हीच घ्या आधी" कुल्फीवाला नम्रपणे म्हणाला.
मला तशी अजिबात घाई नव्हती, आणि त्यांच्या गाडीचे इंजिन चालू असल्याने त्यांनाच आधी द्यावी असे मलाही वाटले.
त्यांनी कुलफ्या हातात घेतल्या आणि गाडी थोडीशी पुढे घेतली.
आता माझ्या मनात एक उत्सुकता निर्माण झाली,
मी अगदी हळू आवाजात कुल्फीवाल्या भैयाला म्हणालो,
"पैसे देतील का,ते?"
"क्या मालूम, देखते है!"
एखाददोन मिनिटे निघून गेले असतील, त्यांची कुल्फी बहुतेक खाऊन झाली होती, त्यांनी गाडीला गियर टाकला आणि निघून गेले. मी तिथेच उभा होतो.
"भैया, पैसे तर दिले नाही त्यांनी..!"
"जाने दो साहब, क्या करते"
"लेकीन सिर्फ दस रुपये की तो बात है ना, और तुम इतनी धूप में..."
माझं वाक्य तोडतच चेहऱ्यावर एकाचवेळी औदार्य अगतिकता आणि हास्य आणत तो बोलला,
"साहब, ऐसेही लोगो के बच्चे कभी टेढे-बिडे हाथ पैर लेके पैदा होते है"
मी काय म्हणणार होतो कारण गोष्ट फक्त दहा रुपयाचीच होती.
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४

काय करु रामा,पुन्हा निवडणूक आली

काय करु रामा,पुन्हा निवडणूक आली

रामा रामा रामा, तुझी आठवण झाली
काय करु रामा,पुन्हा निवडणूक आली

तुझे आणि माझे आहे अजब नाते
दर इलेक्शनला तुझे मंदिर आठवते
तुझ्याशिवाय रामा कोण आम्हा वाली
काय करु रामा,पुन्हा निवडणूक आली

मंदिराच्या मुद्द्याला जरी साठ वर्ष झाली
धर्माची जखम आम्हांला करता येते ओली
भावनिक होते दरवेळी जनता ही भोळी
काय करु रामा,पुन्हा निवडणूक आली

त्यांना ना तुझी चिंता ना तुझ्या मंदिराची
फक्त तुंबडी भरायची आहे जनतेच्या मताची
कोर्टाची पायरी आहे रामा तुझ्या भाळी
काय करु रामा,पुन्हा निवडणूक आली
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...