इंग्लिश स्कुल (कथा) भाग-२


इंग्लिश स्कुल (कथा)
लेखक © राजेश खाकरे
भाग-२
●●●  
"बेटा, नाव काय तुझं?" वर्ल्डक्लास इंग्लिश स्कुलमधल्या त्या शिंदे मॅडमने विचारले.
"अवी, मॅडमला नाव सांग तुपलं" नंदू अविनाशला समजावत म्हणाला.
‎"अ$$वी..." तोंडात बोट घालत काहीशा संकोचनेच अविनाश म्हणाला
‎"ते तोंडातलं बोट काढ बघू..!" शिंदे मॅडम गोड आवाजात बोलल्या.
त्या दिवशी जूनची दहा तारीख होती. भल्या ‎सकाळीच नंदू आणि गंगू अवीला घेऊन संग्रामपुरच्या इंग्लिश स्कुलमध्ये दाखल झाले होते.गावात मुलांना घेण्यासाठी आलेल्या स्कुलबसमध्ये बसूनच ते आले होते. बसमध्ये बसल्यावर गंगूने बसमध्ये नजर फिरवली. तशी ती हरखूनच गेली. ३ ते ६ वर्षाची ती छोटी-छोटी मुले, किती गोंडस दिसत होती. गडद निळा आणि फिक्कट आकाशी रंगाचा युनिफॉर्म, त्यावर टाय, पायात सॉक्स आणि पांढऱ्या रंगाचे बूट, पाठीवर छानशी बॅग, बॅगेच्या एका बाजूला टिफिन आणि पाण्याची बाटली सगळ्याच मुलांनी असा पोशाख केलेला होता. तिला सर्व नवलच वाटत होते. आपला अविपण असाच दिसेल गोंडस, सुंदर, टापटीप, तिच्या नजरेसमोर चित्र तरळले, नकळत चेहऱ्यावर हास्य उमटले. सगळे काही स्वप्नवत... आणि सकाळी गावात बस आली तेव्हाची आठवण तिला झाली. सर्व मुलांच्या आया आपल्या मुलांना गावच्या मंदिराच्या शेजारी जिथे बस थांबे तिथे घेऊन आल्या होत्या. मुलांना बसमध्ये बसवून झाल्यावर आपल्या आईला टाटा-बायबाय करणारी मुले तिला दिसायला लागली. तिथेच त्या आईच्या घोळक्यात ती स्वतः ला बघू लागली, अवीला टाटा-बाय-बाय करण्यासाठी तिने  उंचावलेला हात तिला दिसू लागला. 

"अवी, हात खाली घे, तोंडात नको घालू" नंदू अविचा हात खाली करत म्हणाला.
" अच्छा, बोला सर, मी आपली काय मदत करु शकते?" शिंदे मॅडमच्या या  बोलण्याने नंदू थोडासा गोंधळला.
"स$$र..अहो, सर नका म्हणू, काबाडकष्ट करणारे आम्ही आम्ही कसले सर." नंदू थोडासा सावरत म्हणाला.
" म्हणजे मला असं म्हणायचं की, बोला,काय काम होतं?" 
" आता बघा, मॅडम इथे दुसरं काय काम असणार, आमच्या अविला तुमच्या इंग्लिश स्कुलात घालायचा होता."
"अच्छा, किती वर्षांचा झाला तो आता"
"कालच्या उन्हाळ्यात तीन वरीस झाले बघा त्याला पूर्ण... तीन वर्षांपूर्वी गावच्या देवीच्या यात्रेवेळीच झालता तो" गंगू म्हणाली.
"म्हणजे त्याला प्ले ग्रुपला टाकता येईल" मॅडम मंदस्मित करत म्हणाली. नंदूला तिचे बोलणे काही समजले नाही
"म्हणजे इंग्लिश स्कुलला नाही टाकता येणार का?" नंदूने पृच्छा केली.
"अहो, तसं नाही, इंग्लिश स्कुललाच असेल तो, प्ले ग्रुप,ज्युनियर केजी, सिनियर केजी, फस्ट, सेकंड असं असतं, म्हणजे हे वर्ग असतात, जसं, बालवाडी, पहिली, दुसरी असतं ना तसं.."
"होय का,, बर,, बर,, आम्हा ४ थी शिकलेल्याला काय समजणार त्यातलं" नंदू थोडंसं हसत म्हणाला
" बरं ते, फीस किती लागल ते पण सांगा ना..!" गंगूने विचारणा केली.
शिंदे मॅडमने कागदावर काहीशी आकडेमोड केली.
"तुम्हाला शाळेची फीस दहा हजार प्लस ड्रेस, स्कुलबॅग, आयकार्ड, बूट, स्कुल ट्रिप, याचे पाच हजार आणि जर तुम्ही स्कुलबस वापरणार असाल तर त्याचे परमंथ सहाशे म्हणजे दहा महिन्याचे पकडले तरी वर्षाला सहा हजार असे एकूण एकवीस हजार वर्षाला लागतील" शिंदे मॅडम सावकाशपणे म्हणाल्या. 
आकडा ऐकून गंगू आणि नंदू काहीसे दचकलेच. घरच्या एक दीड एकर शेतीत फारसे काही पिकायचे नाही. दोघेही वर्षातले काही दिवस स्वतः च्या शेतात काम करून बाकीचे दिवस लोकांच्या शेतात मोलमजुरी करून गुजराण करत. त्यातून जे काही मिळे त्यातच घरखर्च भागवायचा. वर्षाला एकवीस हजार ही रक्कम त्यांच्या दृष्टीने जरा जास्तच होती. घरखर्च आणि काही इतर खर्च कमी करून, आणि काही अधिकची कामे करून कसं का होईना शाळेचा खर्च भागवू असा त्यांचा मनसुबा होता.
"ह्या एकवीस हजारात काही कमीजास्त होईल का..?" नंदूने विचारले.
"म्हणजे असं आहे की, आम्ही सांगतांना उगीच जास्त सांगतच नाही, जास्त सांगायचे आणि मग कमी करायचे असं आम्ही करत नाही. त्यामुळे जो खर्च आहे तो आपल्याला सांगितला मी"
" ते ड्रेस, स्कुलबॅग आम्ही बाहेरून घेतले तर पाच हजार कमी होतील का?" गंगूने विचारले
" तसं नाही करता येत, ते स्कुलमार्फतच घ्यावे लागतील, किंवा स्कुलने ठरविलेल्या दुकानातच ती घ्यावी लागतात." शिंदे मॅडम ने माहिती दिली
" बरं मॅडम, येतो आम्ही,नमस्कार" 
"ठीक आहे, विचार करा आणि अँडमिशन घ्यायचे असल्यास पुढील तीन चार दिवसात घेऊन टाका,नंतर परत फुल होतील, अडमिशन फीस २-३ हप्त्यात भरू शकता" 
शिंदे मॅडमचा निरोप घेऊन नंदू आणि गंगू अविला सोबत घेऊन गावी परतले.
●●● 
" अगं, झाल्या का भाकरी? मला भूक लागली" नंदूने घरात शिरत आवाज दिला.
" हो,हो थांबा पाच मिनिट" गंगू हातातली भाकर तव्यावर टाकत म्हणाली. 
आकाश शाळेत जाण्याची तयारी करत होता. यावर्षी तो दुसरीला गेला होता.
"आक्या, जेवला का तू?"
"हो पप्पा, मी चाललो शाळात" 
आकाशने वायरच्या पिशवीत पुस्तके कोंबली आणि तो शाळेला निघून गेला. गंगूने नंदूसाठी ताट वाढून आणले. नंदू जेवायला बसला. गंगूही जवळच बसली.
" काही तजवीज झाली का..पैशाची?" गंगूने न राहवून विचारले
" आताच सोमीनाथ कडून जाऊन आलो, चार-पाच हजाराचं करेन म्हणाला, बुधवारपर्यंत देईन म्हणाला" 
"बरंच झालं मग, घरात आहेत तीन साडेतीन, कसंही करून सात हजाराचा पहिला हप्ता भरता येईल." गंगू उत्साहाने म्हणाली.
सोमीनाथ नंदूचा मित्रच होता. त्याच्याकडे बरीच जमीन होती.जवळच्या बाजाराच्या गावी सोमीनाथचे एक दुकानही होते. सोमीनाथच्या शेतात बऱ्याच वेळा नंदू कामाला जायचा. सकाळीच तो त्याच्याकडे जाऊन आला होता. आणि काही अडव्हान्स पैशाची मागणी केली होती. मजूरीतून वळती करून घेता येईल या विचाराने सोमीनाथने त्याला चार-पाच हजार देण्याचे कबूल केले होते.
त्या दिवशी इंग्लिश स्कुलमधून परत आल्यापासून नंदू आणि गंगूने काहीही करून अविला इंग्लिश स्कुलला घालायचेच असे ठरविले होते. एकवीस हजार खरं तर त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम होती. परंतु मुलाच्या सुखासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. 
"आपल्याकडे जास्त पैसे असते तर आकाशला पण इंग्लिश स्कुललाच घातला असता आपण!" नंदू काहीशा विचाराने म्हणाला.
"आता गं बाई, आज लईच मोठमोठ्या बाता मारत आहात, बस करा, लई मोठ्या गोष्टी करू नका, तेव्हढं अवीच्या खर्चाचं बघा, तेव्हढं भागलं तरी लई झालं" गंगू नंदूला जाणीव करून देत म्हणाली
"अगं, ह्या झेडपीच्या शाळेचं काही खरं नसतं, उगीच लोकं आपल्या पो-हाला इंग्लिश स्कुलला टाकू नाई ऱ्हायली" 
आणि नंदूच्या नजरेसमोर त्या दिवशीचा प्रसंग तरळला.
(क्रमशः)
●●●

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...