इंग्लिश स्कुल (कथा) भाग-१

इंग्लिश स्कुल (कथा)
लेखक © राजेश खाकरे
भाग-१
(सूचना: कथेतील पात्रांची आणि ठिकाणांची नावे काल्पनिक आहेत.बाकी घटना मात्र कुठेही घडलेल्या असू शकतात, किंवा घडूही शकतात.)
●●●
पारालगतच्या रस्त्याने आलेली बस धुराळा उडवतच गावात शिरली. धुळीचे काही लोट पारावर गप्पा मारत बसलेल्या लोकांच्या अंगावरही गेले. मात्र ते वडाचे झाड आणि त्याभोवतीचा दगडी पार हे रस्त्याच्या अगदीच लगत असल्याने रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांच्या पायधूळीचा लाभ पारावर बसणाऱ्यांच्या नित्याचाच होता. ही जागा म्हणजे गावातील खबरबातीची, पोकळ चर्चेची, रिकाम्या भानगडीची, नुसत्या उठाठेवीचे जणू केंद्रच होती. 
"अरे त्या संग्रामपूरच्या इंग्लिश स्कुलची बस ना ही?" पाठमोऱ्या स्कुलबसकडे बघत गणपतने विचारणा केली 
"व्हय तीच ती" नाम्याने माहिती पुरवली "मागच्या वर्षापासून येते ना ती गावात तुला माहीत नाही व्हय?"
" माहित म्हणजे तसं माहित व्हतं रे, पण नेमकी हीच का म्हणून विचारलं" 
"माझा हर्ष टाकला ना मागच्या वर्षांपासून इंग्लिश स्कुलला" रमेशने अभिमानाने सांगितले
"खरं की काय? किती खर्च येतो रे वर्षाला?" नंदूने न राहवून विचारले. 
" खर्चाला भीत नाही आपण, अरे होऊन दे खर्च, मुलगा कुणाचा आहे..! त्याच्यासाठी वाट्टेल ते पण मुलगा इंग्लिश स्कुललाच जाणार..!" रमेश श्रीमंतीच्या थाटात म्हणाला. नंदूला मात्र त्याच्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने त्याच्या चेहऱ्यावर काहीशी अस्वस्थता जाणवत होती. नेमकी तीच हेरून रमेश नंदूला म्हणाला,
" नंदया, पण नसत्या चौकशा करून तुला काय उपयोग?" 
"उपयोगाचं नाही तसं,पण माझा अविनाश येत्या पावसाळ्यात तीन वर्षांचा होईल, जमलं तर-"
"जमलं तर काय?" रमेशने हसतच विचारले
"...म्हणजे जमलं तर अविला टाकू म्हणलं इंग्लिश स्कुलला यावर्षी.." नंदूच्या या बोलण्यावर रमेश मोठमोठ्याने हसायला लागला. 
"अरे, बघ गण्या, धोंड्या, राम्या, नंदूचा पोरगा इंग्लिश स्कुलला जाणार" रमेशच्या या उपहासात्मक बोलण्याने पारावर एकच हशा पिकला. नंदू मनातल्या मनात वरमला. रमेशच्या बोलण्याने आतून दुःखी पण झाला. त्याला रमेशला उलट बोलणे शक्य नसल्याने तो तसाच शांत बसून राहिला. एव्हाना मुलांना गावात सोडून इंग्लिश स्कुलची बस परत निघून गेली. हवेत धुळींचे लोट उंचच उंच पसरले होते.
●●●

"काय?" 
"अगं, हो तेच म्हटलंय मी!"
"डोकं तर ठिकाणावर आहे ना तुमचं?" 
"हो, सगळं ठिकाणावर आहे, आपण येत्या पावसाळ्यात अविला इंग्लिश स्कुलला टाकू" नंदूने पुन्हा ठासून सांगितले. 
" मला तर वाटते बाई, तुम्ही आज पुन्हा ढोसून आलात, त्यामुळंच काहीबाही बडबड करत आहात" नंदूची बायको वैतागाने बोलत होती. 
" अगं माझे आई, मी आज पिलेलो नाही, पूर्ण शुद्धीत बोलतोय,समजलं " 
"अहो पण तुम्ही काय बोलताय ते तरी समजतंय का तुम्हाला, इंग्लिश स्कुलला पोरगं टाकणं आपल्या सारख्या गरीबाचं काम नाही, घरच्या शेतीवर पोट भरत नाही म्हणून रोज मोलमजुरी करणारे आपण, कधी काम मिळतं,कधी मिळत नाही, कसेबसे दोन घास पोटात ढकलतो,एव्हढा पैसा कुठून आणायचा आपण? "
"तू नको चिंता करू, मी काहीपण करेल, जास्त मेहनत करेल, पण टाकुच आपण त्याला इंग्लिश स्कुलला..!" 
"मला बाई, काही समजेनासं झालं!!"
"गंगू,आपण सालं-महिने घालून, मोलमजुरी करून दिवस काढले, गरिबीत का असेना, जसा जमेल तसा संसार केला, देवाच्या दयेनं दोन मुलं झाली, आपण त्यांना चांगलं शिक्षण नको का द्यायला?" 
"मी कुठं नाही म्हणते, आता आपला आकाश दुसरीला गेला अन पुढं पण शिकवणारच हाय ना आपण त्याला, अविला पण शिकवू.."
"हो पण आता आपला आकाश झेड पीच्या शाळात जातो. अगं इंग्लिश स्कुल लई भारी असते म्हणी, तिथं शिकलं म्हणजे पोरगं कसं फाडफाड इंग्लिश बोलतं म्हणे, मोठा सायब पण होतंया...!" नंदू आकाशाकडे नजर टाकून बोलत होता.त्याच्या मनाला जणू स्वप्नांचे पंखच फुटले होते. त्याच पंखाच्या जोराने तो स्वप्नांच्या आकाशात उंचच उंच भरारी घेत होता. 
देवाने गरीबाला स्वप्न बघण्याची मोकळीक दिली ते एक्या अर्थाने बरेच झाले म्हणायचे. कित्येक गरिबांना स्वप्नांच्या राज्यात स्वतः ला काही क्षण गुंतवून आपल्या इच्छा पूर्ण होत असल्याचे बघता तरी येते.
दिवे लागणीची वेळ झाली होती. गंगूने घरासमोरच्या तुळशीवृंदावनला दिवा लावला. नंदू मारोतीच्या दर्शनासाठी निघून गेला.
(क्रमशः)

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...