इंग्लिश स्कुल (कथा) भाग-४

इंग्लिश स्कुल (कथा)
लेखक © राजेश खाकरे
भाग-४
●●● 
"मम्मी, मला वही आणायची, वीस रुपये देना." आकाश गंगूला म्हणाला.
आकाश यावर्षी दुसरीला गेला होता. जिल्हापरिषदेची शाळा घरापासून जवळच होती. शाळेची वेळ झाली म्हणून आकाश पिशवीत पुस्तके भरून शाळेत निघाला होता. काल मोरे सरांनी चित्रकलेची वही आणायला सर्वांना सांगितले होते. त्याची आठवण झाली म्हणून आकाशने आईकडे पैशाची मागणी केली.
"बेटा, तोहे पप्पा येतील आता, त्यांच्याकडून घे हा, मह्याजवळ नाही सध्या." गंगू म्हणाली,
नंदूची वाट बघत आकाश तिथेच झाडाखाली गोट्या खेळत बसला. सोबतीला त्याच्या वर्गातला उमेशही होता. थोड्या वेळाने नंदू घरी आला तशी गंगू त्याला म्हणाली,
"अहो, आक्याला, काय वही का काय आणायची होती, त्याला पैसे पायजे होते." 
" कारे, आक्या, कसली वही घ्यायची होती तुला"
"पप्पा, चित्रकलेची वही घ्यायची, मोरे सरांनी सांगीतली.
"काय मास्तरं आहेत, शिकवायचं सोडून चित्र काढायला सांगतात व्हय, जा, त्यांना म्हणावं उद्या आणीन."
"अहो, पण लेकरू मागतंय तर द्याना वीस रुपये, लागत असेल." 
"गंगू तुला पण समजत नाही का, पैसे काय झाडाला लागतात का? अगं हे मास्तर लोकं काही पण काढतात. हे आणा, ते आणा, याचे पैसे द्या, त्याचे पैसे द्या, आन तुला माहित नाही का, आता असे पैसे उधळून चालणार नाही. अविच्या इंग्लिश स्कुलचा खर्च, घरचा खर्च, त्यामुळे आता इतर खर्च कमी केलेच पाहिजे, धकतंच ना, निदान आजचं उद्यावर तरी जातं."
" हो, पण मागे तो स्कुलबॅग घ्या म्हणाला तेव्हा पण तुम्ही असंच काही सांगून टाळलं" गंगू त्याला आठवण करून देत म्हणाली.
" अगं, त्याला काय करायची स्कुलबॅग, झेडपी शाळेतल्या किती पोरांकडे स्कुलबॅग आहे? अशीही शाळा जवळ तर आहे मग काय पिशवीत पुस्तके जात नाहीत व्हय, अगं आम्ही पण गेलो होतो शाळात, चौथीपर्यंत का होईना, आम्हाला साध्या पाट्या पण नाही मिळायच्या, फुटलेल्या पाट्यावर शिक्षण केलं आम्ही, आता तर हे पायजे ते पायजे,अवघडच झालं सगळं. "
" हो ते खरंय, पण या मंगळवारी त्याला त्यो शाळेचा ड्रेस आणा तेव्हढा, चौधरी मॅडम दोनदा घरी येऊन गेल्या"
" ह्या मंगळवारी जमतका नाही माहित नाही, पण लवकरच आणीन." 
गंगू पुढे काही बोलली नाही. तिने मानेनेच होकार दिला आणि ती आपल्या कामाला लागली. 
●●● 

अविला इंग्लिश शाळेत घालून सहा-सात महिने झाले होते.अवी पण शाळेत बराच रुळला होता. शाळेत शिकविलेले विविध खेळ, पोएम्स,बडबडगीते तो इंग्लिश मध्ये म्हणून दाखवायचा, नंदू आणि गंगुला पण त्याचे कौतुक वाटायचे. अविला इंग्लिश स्कुलला घातले हे योग्यच केले असे त्यांना वाटत होते. आतापर्यंत दोन हप्त्याने सात-सात हजार याप्रमाणे त्यांनी चौदा हजार रुपये फीस जमा केली होती. हे करतांना त्यांना बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या होत्या. एकतर यावर्षी दुष्काळ,त्यातही कापसावर बोण्डअळी पडली होती. स्वतः च्या एकदीड एकर शेतीत तीन कुंटल कापूस निघाला होता. खत-बियाणांचा खर्चही भागला नव्हता. सोमिनाथची उसनवारी, घरखर्च आणि अधून मधूनचा किरकोळ दवाखाना, यामुळे हातात दिडकी शिल्लक नव्हती. दुष्काळामुळे मजुरीही मिळत नव्हती. शाम पाटलांच्या विहिरीवर आडवे बोर घेण्याचे काम चालू होते. गेल्या दोन दिवसांपासून बळे-बळे विचारणा करून तो तिथे कामाला जात होता. आज उद्या करून त्याने इंग्लिश स्कुलचा हप्ता पुढे ढकलला होता. शाळेतून निरोपावर निरोप येत होते. नंदू काहीसा वैतागून गेला होता. गंगूलाही त्याची चिंता समजत होती. मात्र ती बिचारी तरी काय करणार होती. शब्दांच्या आधाराशिवाय तिच्याकडे दुसरे होते तरी काय. गळ्यातले आणि कानातले किडुक मिडुक तर केव्हाच गरिबीच्या अग्नीत भस्मसात झाले होते. ती लंकेची पार्वती आपल्या शंकराला- नंदूला आधार देत होती. त्याच्यासोबत राबत होती. त्या दिवशी चहा घेता घेता गंगूने विषय काढला,
"मला वाटतं तुम्ही रावसाहेबांकडे तरी जाऊन या, काही व्याजाने जर भेटले तर एवढा राहिलेला एक हप्ता तरी भरता येईल. वायदा करून महिना वर झाला, त्यांना कधीपर्यंत आज-उद्या करणार!"
"मलाबी तेच वाटतं..दुसरा काही मार्ग पण दिसत नाही, सकाळीच जाऊन येतो" नंदू कप खाली ठेवत म्हणाला.
रावसाहेब ही गावातली बडी आसामी होती. व्याजाने पैसे देणे हा त्यांच्या अनेक व्यवसायांपैकी एक प्रमुख व्यवसाय होता. सावकारीच्या जोरावर त्यांनी आतापर्यंत कित्येक एकर जमीन कमावली होती. गावात आरसीसीचा टोलेजंग बंगला, फिरायला गाड्या. रावसाहेब काही भला माणूस वगैरे नव्हता. मग्रुरी त्याच्या नसा-नसात दौडत होती. सारे गाव त्यांना 'आबा' या नावानेच हाक मारायचे.  कुणीही त्याच्याकडे शेवटचा पर्याय म्हणूनच जात होते.
दुसऱ्या दिवशी सकाळीच नंदू रावसाहेबांच्या बंगल्यावर गेला. आरामखुर्चीत बसून रावसाहेब वर्तमानपत्र चाळत होते.
"राम-राम आबासाहेब"
नंदूच्या राम-राम ला प्रत्युत्तर म्हणून रावसाहेबांनी नुसते हूं केले.आणि पुढे म्हणाले,
"बोल नंदया, आज सकाळी-सकाळीच"
"होय साहेब, काम होतं थोडं!"
खरं तर रावसाहेबांना येणाऱ्या व्यक्तीला कशासाठी आलात हे विचारायची गरजच नव्हती. आपल्याकडे एखादा माणूस का येतो हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. नंदू कशाला आला होता हे त्यांना कळले नसते तरच नवल.त्यांनी नजरेनेच विचारले तसे नंदू पुढे बोलला,
"साहेब, पैशाचं काम होतं थोडं, सात हजार पाहिजे होते, येणाऱ्या जुनमधी परत करीन.!"
"कशाला पाहिजे होते, एवढ्या दुष्काळात काय काम काढलं?"
"ते माझं पोरगं इंग्लिश स्कुलला टाकलय ना..!त्याच्या फिसचा हप्ता भरायचा होता.तुम्ही विश्वास ठेवा, जुनमधी व्याजासगट परत करीन.!"
"ख्य$$$ख्य$$$$ ख्य$$$$" रावसाहेब कुत्सितपणे हसले मग काहीसे थांबून दीर्घ श्वास घेत म्हणाले,
"तुम्ही भीकारडे लोक नाही सुधारणार...खायची पंचाईत आणि चालले पोरं इंग्लिश स्कुलला टाकायला, म्हणे जुनमधी परत करतो, जुनमधी तुझ्या बापाची शेती पिकणार हाय व्हय? काही पण भिकारचोट चाळे..!"
कुणीतरी कानात गरम तेल ओतावे तसे नंदूला ते शब्द ऐकून झाले. त्याचा चेहरा लालबुंद झाला होता. रावसाहेबांच्या दोन कानशिलात ठेऊन द्याव्या असेही त्याला वाटून गेले. पण तो तसे करू शकत नव्हता. तो गरिबीचे प्रतिनिधित्व करत होता आणि रावसाहेब श्रीमंतीचे. श्रीमंताने गरीबाला छळावे, राबवावे, शोषण करावे हा जणू अलिखित नियमच झालेला. इथल्या समाजात एखाद्या हरळीप्रमाणे खोलवर शिरलेला. गरीब आवाज उठवू शकत नाही कारण त्याचा गळा परिस्थिती दाबून ठेवते. फक्त अश्रूला वाहण्याची परवानगी असते. आसू मात्र मुके असतात.त्यांना बोलता येत नाही.
नंदू उलट्या पावलाने घरी परतला. "काम झाले का?" या गंगूच्या प्रश्नालाही त्याने उत्तर दिले नाही. त्याने हातात डबा घेतला आणि तो तडक शाम पाटलांच्या विहिरीवर गेला.
●●●
नंदूचे डोके अजूनही गरगरत होते.. रावसाहेबाचे शब्द त्याला पुन्हा पुन्हा ऐकू येत होते. डबा वर ठेऊन तो विहिरीत उतरला. अजून त्याचे इतर सहकारी आलेले नव्हते. त्याने बोरचे मशीन चालू केले.पहारी घातल्या, हातांनी जोरात मशीन दाबत तो पहारी ढकलत होता. कोरड्या जमिनीतुन दगड-मुरुमाचा चुरा बाहेर पडत होता. नंदूचे डोके मात्र अजून शांत झाले नव्हते. त्याने मशीन बंद केले. समोर घण आणि हातोडी पडलेली होती. त्याने ती हातोडी हातात घेतली. समोरच्या मोठ्या शिळेवर ती हातोडी बेभान होऊन मोठ्या त्वेषाने तो मारू लागला...दण$ दण$$ दण$$$ दण$$$$$$"
अखेर ती दगडी शिळा तुटली त्याने एक आर्त किंकाळी फोडली. डोळ्यातून घळाघळा अश्रू खाली आले. तो मटकन खाली बसला. त्याचा श्वास जोराने चालू होता. घामाने सर्वांग भिजले होते. त्याचे डोके मात्र कमालीचे शांत झाले होते. बराचवेळ तो तसाच बसून होता.
"
(क्रमशः)
●●●

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...