इंग्लिश स्कुल (कथा) भाग-५ (अंतिम भाग)

इंग्लिश स्कुल (कथा)
लेखक © राजेश खाकरे
भाग-५ (अंतिम भाग)

दूरवरून येणाऱ्या गाड्यांच्या ताफ्याकडे सर्वांची नजर गेली; तसे सर्वांनी तिकडे आश्चर्याने बघितले. नंदू आणि त्याचे सहकारी दुपारच्या जेवणानंतर विहिरीच्या बाजूला असलेल्या झाडाच्या सावलीत गप्पा करत बसले होते. सूर्य आग ओकत होता. त्या कडक उन्हात कच्च्या रस्त्याने आलेल्या गाड्या आपल्या सभोवताली धुळीचा लोट पसरवत होत्या. थोड्याच वेळात तो ताफा बांधाजवळ येऊन थांबला. लाल दिव्याच्या गाडीतून तरुण वयाचे कलेक्टर खाली उतरले. तसे सर्वजण आदबीने आपापल्या गाड्यातून खाली उतरुन त्यांच्या सभोवताली चालू लागले.
जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळ आणि बोंडअळी यांची पाहणी करण्यासाठी कलेक्टर साहेब वेगवेगळ्या गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करत होते. लवकरच शासनाला त्यासंदर्भात त्यांना एक अहवाल सादर करायचा होता.
नंदू आणि त्याचे सहकारी लगोलग उठून त्यांच्यात जाऊन सामील झाले.
जवळच्याच एका कापसाच्या शेतात सर्वजण शिरले. कलेक्टर स्वतः कापसाची बोंडे उघडून बघत होते. नुकसानीचा अंदाज घेत होते.गावातील सरपंच व ज्येष्ठ मंडळी त्यांना नम्रतेने माहिती देत होती.  त्यांनी आपला मोर्चा विहिरीकडे वळवला. तळ गाठलेल्या विहिरी त्यांना दुष्काळाच्या दाहकतेची साक्ष देत होत्या.
थोड्या वेळाने सर्वजण तिथल्याच एका झाडाखाली जमले. समोर कलेक्टर साहेब, बाजूला काही अधिकारी मंडळी, सरपंच आणि काही ग्रामस्थ. कलेक्टर साहेबांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. समस्या जाणून घेतल्या. लवकरच त्याबाबत शासनाला कळवून उपाय केले जातील असेही सांगितले.
"अजून कुणाचे काही प्रश्न असतील तर सांगा?" कलेक्टर साहेब समोरील ग्रामस्थाकडे निर्देश करत म्हणाले. तसा नंदूने हात वर केला.
"साहेब माझा एक प्रश्न होता!" नंदू उभा राहत म्हणाला.
"हो,हो, विचार" कलेक्टर साहेबांनी परवानगी देत म्हटले.
"साहेब, आपण एवढे मोठे कलेक्टर झालात, जिल्ह्याचे बॉस झालात, तुम्ही इंग्लिश स्कुललाच शिकले असतान ना?" नंदूच्या या अनपेक्षित प्रश्नाने कलेक्टर साहेबांना काहीसे आश्चर्य वाटले. समोर थोडासा हशाही पिकला. पण कलेक्टर असल्याने कुठलीही परिस्थिती आणि प्रश्न  सकारात्मकतेने हाताळण्याची कला त्यांच्याकडे होती. थोडेसे स्मितहास्य करत ते म्हणाले,
"नाही, माझे शिक्षण मराठी शाळेत झाले.पण तुला असा प्रश्न का पडला?"
"साहेब, लोक असं म्हणतात की मराठी शाळेपेक्षा इंग्लिश स्कुल भारी असते म्हणून विचारलं" नंदू म्हणाला.
"त्याच काय आहे, एखादी शाळा हलकी की भारी हे आपण नाही ठरवू शकत. म्हणजे,शिक्षण म्हणजे काय असतं, 'टू ड्रॉ  आऊट' म्हणजे आपल्या आत जे आहे ना ते बाहेर काढणं... आता तुला कसं समजावू,..मला सांग तू काय काम करतो?"
" साहेब, ही विहीर आहे ना, तिच्यात आडवे बोर घेण्याचे काम करतो मी सध्या"
"ओके गुड..आता बघ, तू आता बोर घेतला तर पाणी येते का?" कलेक्टर साहेबांनी विचारले.
"साहेब, आतच पाणी नाही तर बाहेर कुठून येणार" नंदू सहजतेने बोलून गेला.
"Exactly, जर आत असेल तरच बाहेर येणार. शिक्षण,शाळा, आपल्या आत असलेल्या कला, गुण, यांना बाहेर काढते, फुलविते आणि आपल्याला एक चांगला माणूस बनविते. ती आपल्याला लायक बनविते. आणि शिक्षणाच्या माध्यमाबद्दल अधिक विचार करायचा तर प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून असावे असे रवींद्रनाथ टागोर म्हणतात..! मला सांगा आपण स्वप्न कोणत्या भाषेत बघतो..आपल्या मातृभाषेत..मुले इंग्लिश माध्यमात जरी शिकत असली तरी प्रश्नांचे उत्तर देताना ती विचार मात्र स्वतःच्या मातृभाषेतच करतात.. कारण जन्मापासून ते मातृभाषेशी जोडलेले असतात. याचा अर्थ असा नाही की त्यांना इतर भाषा शिकवायच्या नाहीत; नक्कीच शिकवायच्या. मात्र शिक्षणाचा उद्देश आणि बाल मानसशास्राचा विचार करायचा झाल्यास प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे असेच कुणालाही वाटेल." कलेक्टर साहेबांच्या अभ्यासपूर्ण बोलण्याने सर्वचजण भारावून गेले होते. नंदूच्या मनातील शंकेच्या निमित्ताने सर्वानाच अतिशय मौलिक ज्ञान मिळाले होते.

नंदूला यापूर्वीही अनेकवेळा हा प्रश्न पडला होता आणि त्यांनी तो बर्याचजणांना विचारला सुद्धा होता. मागे एकदा बाहेर गावाहून येतांनी जिल्हा परिषद शाळेच्या देशमुख सरांनी त्यांच्या मोटार सायकलवर नंदूला लिफ्ट दिली होती. तेव्हा गप्पाच्या ओघात तो देशमुख सरांना म्हणाला होता,
"तुमची मुले, इंग्लिश स्कुललाच असतील, नाही सर"
"हो नंदू, पण का बरं विचारलं?"
"म्हणजे इंग्लिश स्कुल मराठी शाळेपेक्षा भारी असते ना म्हणून"
" तसं काही नाही नसतं..उलट मला तर मराठी शाळाच जास्त आवडते."
"खोटं सांगता सर तुम्ही, तसं असतं तर मग तुमची मुलं मराठी शाळेत नसती घातली का तुम्ही!"
"खरं सांगू का नंदू...आम्ही हे जे शिकलेले, नोकरीवाले, मोठमोठे पगारवाले लोकं आहोत ना...आमच्या प्रतिष्ठा, मोठेपणा याच्या काही कल्पना रूढ झालेल्या आहेत. एका बेगडी व्यवस्थेचे आम्ही बळी झालेलो आहे.मी ज्या गल्लीत राहतो, तिथल्या सगळ्या पालकांनी त्यांची मुले इंग्लिश स्कुलला घातली म्हणून मीही घालतो. आमचे एक परिमाण आम्ही ठरवून टाकले, जेवढी जास्त फीस तेवढी मोठी शाळा, तेवढाच आमचा मोठेपणा आणि तेवढे आमच्या मुलाचे शिक्षण भारी. उद्या जर मी माझ्या मुलाला मराठी शाळेत घातले तर माझ्या आजूबाजूची लोकं मला हसतील.मी कंजूष आहे म्हणून हिणवतील.अरे बाहेरचं जाऊदे 'तुम्हांला मुलाच्या भवितव्याची पर्वा नाही' म्हणून माझी बायकोच मला टोमणे मारील. एवढी हिंमत नाही रे माझ्यात या सर्वांचा विरोध पत्करण्याची."
देशमुख सर पोटतिडकीने बोलत होते..कितीतरी दिवसांनी त्यांच्या पोटातल्या जाणिवा ओठावर येत होत्या. ते पुढे म्हणाले,
" नंदू, शिक्षणाचा नुसता बाजार होऊन बसला आहे. एक चांगला माणूस तयार व्हावा, हा शिक्षणाचा उद्देश शिकवला आम्हांला आमच्या डि.एडच्या अभ्यासक्रमात..पण आज शिक्षण म्हणजे नोकरी मिळवण्यासाठीची खटाटोप. अशीच परिस्थिती होऊन बसलीय. प्रत्येकाला इंग्लिश शिकायची ती इंग्लिशवर फार प्रेम आहे म्हणून नाही तर इंग्लिश शिकून चांगली नोकरी आणि चांगला पैसा मिळेल म्हणून"
"मग सर त्यात काय वाईट आहे, पैशासाठी तर चालू आहे ना हे सर्व?"
" पैसा हे साधन आहे, ते जीवनाचे साध्य नाही. शिक्षण करून नोकरी मिळेल, रोजगार मिळेल, किंवा कामधंदा करावा लागेल पण तो आपल्याला आवडणारा असावा, त्यात आपले मन रमावे, ते काम करतांना थकवा, त्रागा नाही तर आनंद मिळावा. पण आज तसे होते काय? ज्याला रक्त बघून चक्कर येते; त्याचा बाप त्याला डॉक्टर होण्यासाठी रेसमध्ये उतरवतो, गणित ज्याच्या डोक्यावरून जाते त्याला इंजिनीयर बनविण्यासाठी त्याचा बाप धडपडतो. हा सर्व घोडेबाजार चालू आहे. आमच्या सर्व मुलांना आम्ही रेसचे घोडे आणि पाठांतराचे पोपट बनवत आहोत."
"मग नेमके काय व्हायला पाहिजे सर?"
"नंदू, आपण आपल्या मुलांना फक्त चांगले शिक्षण द्यायला पाहिजे, पुढे त्यांनी काय बनायचे हे आपण त्यांच्यावर सोडून द्यायला पाहिजे. म्हणजे तो डॉक्टर बनो, इंजिनीयर बनो, वकील बनो, शिक्षक बनो, कलाकार बनो, शेतकरी बनो, किंवा एखादा व्यवसायिक बनो, मग तो जे काही बनेल, जे काही शिकेल त्यातून पैसा तर कमवेलच पण त्याहीपेक्षा त्याने निवडलेल्या कामात त्याला आवड असेल आणि त्याला समाधान मिळेल."
"बरोबर आहे सर तुमचं म्हणणं" नंदू मान डोलवत म्हणाला.
"सर आणखी एक प्रश्न होता, ईचारू का?" नंदूने पृच्छा केली.
"हो विचार ना..!"
"सर मला एक कळत नाही, आपल्या कडल्या पोरांना इंग्लिश कठीण जातं, मग हे डॉक्टर इंजिनीयर होण्यासाठी जे शिक्षण लागतं ते मराठीत, हिंदीत नाही का? म्हणजे नसेल तर, तशी व्यवस्था नाही होऊ शकत का? आता बघा मी दवाखान्यात गेलो की डॉक्टर मला इंजेक्शन टोचतो, त्याची कुठली भाषा थोडी असते की मला त्यांनी अमुक भाषेत इंजेक्शन दिल म्हणून,आणि त्याला फक्त एवढंच शिकावं लागेल ना की इंजेक्शन कसं द्यायचं ते.मला ज्या गोळ्या देतात त्यावर इंग्रजीत लिहिलेले असते ते मराठीत, हिंदीत लिहिता येणार नाही का? .आणि मी पण माझं दुखणं त्यांना मराठीतच तर सांगतो.!"
एका चौथी शिकलेल्या नंदूच्या बुद्धीची विचार करण्याची क्षमता बघून देशमुख सरांनाही आश्चर्य वाटले. असा प्रश्न त्यांनाही आजपर्यंत कधी पडला नव्हता.
त्यांना ती कल्पनाही भन्नाट वाटली. ती कल्पनाच पुढे वाढवत ते मनाशीच विचार करू लागले  'समजा जो अभ्यासक्रम असेल तो तिन्ही भाषेत उपलब्ध केला, इंग्रजी, हिंदी, मराठी, जो मराठी भाषेतून शिकेल त्याला महाराष्ट्रापुरते डॉक्टर होता येईल, जो हिंदीत शिकेल त्याला भारतापूरते आणि जो इंग्रजीमध्ये शिकेल त्याला भारत आणि कदाचित बाहेरदेशात डॉक्टर होता येईल. आणि एका भाषेतील अभ्यासक्रम, नवनवीन संकल्पना भाषांतरित करणे आजच्या काळात अवघड तर नक्कीच नाही. मग आम्ही विद्यार्थ्यांना उगीच वेठीस तर धरत नाही ना याचा पण कुठेतरी विचार व्हायलाच हवा.'

गाव आले तसे देशमुख सरांचा निरोप घेऊन नंदू घरी गेला आणि देशमुख सर शाळेत.
●●●

"अहो,ऐकलत का?" गंगू काहीशी धावतच नंदू बसला होता त्या खोलीत आली.
"क्क..काय झाले?" नंदू गडबडीने उठला.
"अहो, एक खुशखबर हाय...आता आपले सगळे प्रॉब्लेम संपतील...!"
"का$$ य?" नंदूने आश्चर्याने विचारले.
"आत्ताच दादाचा फोन आलता...त्याची दोन एकर जमीन एमआयडीसीत नव्हती गेली का..त्याचे चेक मिळणार आहेत म्हणे उद्या! आम्हा दोघीही बहिणीला खुशीने दोन-दोन लाख रुपये देणार आहे म्हणे तो..! पुढच्या आठवड्यात पैसे पण घेऊन येतो म्हणाला." आनंदाची बातमी सांगून गंगू पुढच्या घरात निघून गेली.

काही वेळ मध्ये निघून गेला असेल.

"अगं ये ऐक ना! " त्याने गंगूला आवाज दिला तशी ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. त्याचा चेहरा प्रचंड खुलला होता. त्या पणतीच्या प्रकाशात तो अधिकच तेजस्वी भासत होता. ती त्याच्या चेहऱ्याकडे नुसती पाहतच राहिली.
"अगं, आपण अविनाशच्या इंग्लिश स्कुलचा राहिलेला एक हप्ता या आठ-दहा दिवसांत भरु. त्याचे हे वर्षही लवकरच संपेन. थोडेसे थांबत दूरवर नजर टाकत तो पुढे बोलला,
"पुढच्या वर्षी आकाश आणि अविनाश दोघांनाही दोन शाळेचे ड्रेस, स्कुलबॅग, वह्या-पुस्तके, बूट-सॉक्स आणू..!" नंदूच्या बोलण्यावर गंगूने मान डोलावली.
"आणि ऐक ना..पुढच्यावर्षी आपण दोघांनाही मराठी शाळात घालणार आहोत." नंदू आत्मविश्वासाने म्हणाला.
आपण मुलांना मराठी शाळात घालणार हे ऐकून गंगूला आश्चर्य वाटले;मात्र क्षणभरच. त्याने घेतलेला निर्णय नक्कीच योग्य असणार हा तिला विश्वास होता. दुसऱ्याच क्षणी गंगूने त्याचा हात हातात घेत संमती दर्शविली.

समस्त मानवजातीला आपला जीवनरुपी प्रकाश देणारा भास्कर विश्रांतीसाठी निघाला होता. पुन्हा रात्रभर सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरणार होते. छोटीसी पणती मात्र आपल्या ज्योतीने आपला सभोवतालचा परिसर उजळवून टाकत होती. त्या प्रकाशातच त्याची दोन्ही मुले आकाश आणि अविनाश निद्रिस्त झालेली होती.
नंदू कसल्याशा विचारचक्रात गुंतला होता.त्याची नजर त्या अंधाऱ्या रात्रीत तेवणाऱ्या पणतीकडे गेली. 
'किती छोटीसी पणती, पण साऱ्या घराचा अंधार घालवते, जसं शिक्षणाने अज्ञानाचा नाश होतो तसा, तसा ही पणती अंधाराचा नाश करते. पणतीच्या उजेडाचं पण तसं काही असेल का म्हणजे इंग्लिश- मराठी असं काही??' त्याच्या विचाराचे त्याला स्वतःलाच हसू आले. 'उगीच आपलं काहीतरी' असं मनाशी म्हणाला. त्याला तो विचार विचित्र वाटला, 
'पणतीचं तसं काही नसतं, इंग्लिश-मराठी, ती कोणत्याही भाषेत उजेड देते' त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमलले.त्याच्या कुशीत शिरून गंगू ते स्मितहास्य कितीतरी वेळ  न्याहाळत होती.
●●● समाप्त●●●


No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...