इंग्लिश स्कुल (कथा) भाग-३


इंग्लिश स्कुल (कथा)
लेखक © राजेश खाकरे
भाग-३
●●●
तो १ मे महाराष्ट्र दिनाचा दिवस होता.ध्वजारोहणासाठी गावातील लोकं मोठ्या संख्येने झेडपीच्या शाळेत जमा झालेले होते. ध्वजारोहण, निकाल आणि इतर कार्यक्रम झाल्यावर माईकचा ताबा जोशी सरांनी घेतला होता. 
"गावकरी मंडळी, नमस्कार!
आता जूनमध्ये शाळा सुरू होईल, तेव्हा ज्या मुलांचे वय सहा वर्षे पूर्ण होईल त्यांनी आपल्या मुलांना झेडपीच्या शाळेत घालावे. हल्ली इंग्लिश स्कुलचे पेव फुटलेले आहे. पावसाळ्यात दगड उचलल्यावर जसा प्रत्येक दगडाखाली विंचू सापडतो ना तशा गावोगावी इंग्लिश स्कुल झाल्या आहेत. आपण पण दिखाव्याला भुलतो आणि पदरमोड करून आपल्या मुलांना इंग्लिश शाळेत घालतो. वर्ष दोन वर्षे झाली की आपल्या लक्षात येते.तोपर्यंत मुलांचे एक दोन वर्षे वाया जातात." मोठ्या त्वेषाने जोशी सर सांगत होते. जोशी सर पुढे म्हणाले,
"आपल्याला असे वाटते की, इंग्लिश स्कुल म्हणजे चांगले शिक्षण, पण खरंच तसं आहे का..? तिथल्या शिकवणाऱ्या शिक्षकांचे शिक्षण बघा,त्यांना देण्यात येणारा पगार बघा, बारावी, डि.एड, झालेल्या मुली चार-पाच हजार पगारात तिथे शिकवतात. इतक्या कमी पगारात त्या तुमच्या मुलांना किती चांगले शिक्षण देणार, याचाही विचार करा. तेथे शिकवणारे बहुतांशी शिक्षकही मराठी शाळांतूनच शिक्षण घेतलेले असतात.आजकाल कुणीपण उठतो आणि इंग्लिश स्कुल सुरू करतो; त्यामुळे पालकांनो वेळीच जागे व्हा, आणि आपल्या मुलांना झेडपीच्या शाळेत घाला." 
मुलांची जिल्हा परिषदेच्या शाळेतील कमी होत जाणारी संख्या ही चिंतेची बाब होती. जोशी सरांच्या चेहऱ्यावर सुद्धा ती स्पष्ट जाणवत होतीच; त्यामुळेच त्यांना जास्तीत जास्त मुलांचे अडमिशन झेडपीच्या शाळेत व्हावे असे वाटणे साहजिक होते. संख्या कमी होत जाण्याने जोशी सरांच्या नोकरीला प्रत्यक्ष धोका नसला तरी अप्रत्यक्षपणे शिक्षकी पेशासाठी ती धोक्याची घंटा होती. इंग्लिश स्कुलमुळे सरकारी मराठी, झेडपी शाळा बंद पडल्याच्या बातम्या अधूनमधून पेपरात छापून येतच होत्या. 
जोशी सरांचे भाषण नंदूला पुन्हा आठवले. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता आठवली. त्यांना वाटणारी चिंता ही त्यांच्या नोकरीच्या प्रेमापोटी होती? मराठीच्या प्रेमापोटी होती? की त्यांच्या मनात इंग्लिश स्कुल विषयी आकस होता? नंदूला काही समजेनासे झाले पण त्यापैकी काही जरी असेल तरी जोशी सर आपली स्वतःची मुले इंग्लिश स्कुलला कशाला टाकतील. त्या दिवशीच्या भाषणानंतर पारावर झालेल्या गप्पात तर सदा म्हणत होता. 
"हा जोशी सर म्हणजे नुसता पोपट आहे, इकडे लोकांना तत्वज्ञान सांगतो की मुलांना मराठी शाळेत घाला आणि स्वतः च्या मुलांना शहरातल्या मोठ्या इंग्लिश स्कुलममधी घातलेले आहे." 
'म्हणजे सदा म्हणतो ते खरंच असेल तर..इंग्लिश स्कुल खराब असत्या तर जोशी सरांनी आपल्या मुलांना कशाला इंग्लिश स्कुलला टाकले असते..!, शिवाय गावातल्या इतक्या लोकांनी आपली मुले घातली ते काय येडे आहे का?' नंदू स्वतः शीच म्हणाला, त्याने हात धुतला आणि शेताकडे निघून गेला.
●●● 
"अहो नंदूराव, या ना इकडे गप्पा मारायला.." सदाने आवाज दिला. 
नंदू पराजवळच्या रस्त्याने हातात डबा घेऊन पंडितरावांच्या शेतावर कामासाठी निघाला होता. पारावर सदा आणि आणखी तीन-चार माणसे बसलेली होती.
"नको सदा, अरे मी शेतावर चाललो, आता टाइम नई" 
"अरे तंबाकू तर खाऊन जा.." 
तंबाखू म्हटल्यावर नंदू पाराजवळ आला. हातातला डबा ओट्यावर ठेवून त्याने सदाने पुढे केलेली तंबाखूची पुडी घेतली. त्यातून थोडीशी तंबाखू काढून हातावर घेतली. तंबाखूला किंचित चुना लावला आणि विडा चोळायला सुरवात केली.
" मग नंदू, टाकले का पोराला इंग्लिश स्कुलला?" सदाने तंबाखू चोळत विचारले.
" हो बाबा, टाकले एकदाचे, महिना होत आला." 
"हो का, चांगलं केलं यार!" सदाने विशिष्ट पद्धतीने तंबाखूवर थाप मारली. काहीशी भुकटी बाहेर उडाली. उर्वरित तंबाखूची पुरचुंडी तीन बोटात पकडून त्याने खालच्या ओठात टाकली.
" चल बाबा सदा, जातो मी उशीर होतोय मला, भेटू रात्री." असे म्हणत नंदूने तंबाखू तोंडात टाकत डबा उचलला आणि तो शेताच्या दिशेने चालू लागला. 

अवीची इंग्लिश शाळा सुरू झाली होती. पहिला सात हजारांचा हप्ता भरून त्याचे अडमिशन केले होते. दुसरा सात हजारांचा हप्ता आणखी तीन महिन्यांने भरायचा होता. त्यासाठी घरखर्च भागवून, खर्चात कपात करून काही पैसे मागे टाकणे भाग होते. सोमीनाथने दिलेले चार हजार पण त्याच्याकडे काम करून फेडायचे होते. त्यामुळे गंगू आणि नंदू कामात एकदिवससुद्धा खंड पडू देत नव्हती. त्यांना जास्तीचे श्रम पडत होते पण मुलाला इंग्लिश स्कुलला टाकल्याच्या आनंदापुढे त्यांना त्याचे काही वाटत नव्हते.
(क्रमशः)
●●● 

No comments:

Post a Comment

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...